बांगलादेशातील शरणार्थी रोहिंग्यांचे बंगालच्या खाडीतील बेटावर स्थलांतर !

बेटाला चक्रीवादळाचा धोका असल्याने मानवाधिकार संघटनेचा विरोध

भारतातील घुसखोर रोहिंग्या आणि बांगलादेशी यांनाही भारताने या बेटावर पाठवून द्यावे, अशी कुणी मागणी केल्यास त्यात चुकीचे काय ?

ढाका (बांगलादेश) – म्यानमारमधील धार्मिक हिंसाचारामुळे पलायन केलेले १ लाख रोहिंग्या मुसलमान बांगलादेशमध्ये शरणार्थी म्हणून रहात आहेत. आता बांगलादेश त्यांना बंगालच्या खाडीमध्ये भसन-४ या बेटावर (याला बांगला भाषेत ‘तरंगते बेट’ म्हटले जाते) रहाण्यासाठी पाठवणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात १ सहस्र ६४० रोहिंग्यांना तेथे पाठवण्यात आले आहे; मात्र बांगलादेशाच्या या निर्णयाचा विरोध केला जात आहे; कारण हे बेट चक्रीवादळ आले, तर पूर्णपणे पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामुळेच गेल्या वर्षभरापासून या बेटावर कुणीही रहात नाही.

१. ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे दक्षिण आशियातील समन्वयक साद हम्मादी यांनी म्हटले आहे की, अशा बेटावर रोहिंग्यांना पाठवणे मानवाधिकाराविषयी चिंता निर्माण करणारे आहे. येथे पत्रकारही विना अनुमती जाऊ शकत नाही. अनेक रोहिंग्यांना त्यांच्या मनाविरुद्ध तेथे पाठवण्यात येत आहे.

२. बांगलादेशचा दावा आहे की, अनेक रोहिंग्या बेटावर जाण्यास सिद्ध आहेत. त्यांना मोठी घरे आणि सुविधा देण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे. या बेटावर आपत्काळात बचाव होण्याच्या मूलभूत सुविधा आहेत.