पुनर्अन्वेषणाचा आदेश वैयक्तिक द्वेषापोटी, प्रकरण सी.बी.आय्.कडे हस्तांतरित करावे !

अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णव गोस्वामी यांची न्यायालयात याचिकेद्वारे मागणी

मुंबई – वास्तूसजावटकार अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी मला अनधिकृत आणि सूडबुद्धीने अटक करण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अधिकार नसतांनाही केवळ माझी छळवणूक करण्याच्या उद्देशाने या प्रकरणाच्या पुनर्अन्वेषणाचा आदेश दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे अन्वेषण केंद्रीय अन्वेषण यंत्रणा किंवा स्वतंत्र अन्वेषण यंत्रणा यांकडे सोपवावे, या मागणीची याचिका ‘रिपब्लिक टी.व्ही.’चे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांनी ३ डिसेंबर या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.

वर्ष २०१८ मध्ये या प्रकरणी पोलिसांनी महानगर दंडाधिकार्‍यांकडे दिलेल्या अहवालामध्ये अन्वय नाईक आणि त्यांची आई यांच्या आत्महत्येचे अन्वेषण बंद करण्याची मागणी केली होती. मे २०२० मध्ये राज्यशासनाने या प्रकरणाचे पुन्हा अन्वेषण करण्याचा आदेश दिला होता. याविषयी अर्णव गोस्वामी यांनी ‘गृहविभागाच्या पुनर्अन्वेषणाच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी याचिका करण्याची अनुमती मिळावी’, अशी विनंतीही न्यायालयाकडे केली आहे.