मी हिंदु, धर्माचा प्रश्‍न येईल तेव्हा धर्माच्या बाजूने बोलेन !

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे वक्तव्य

मुंबई, १ डिसेंबर (वार्ता.) – मी कर्माने आणि धर्मानेही हिंदु आहे. हिंदुत्व हा माझ्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. मी हिंदु धर्माविषयी बोलू शकते; मात्र आतापर्यंत बोलण्याची आवश्यकता भासली नाही; मात्र जेव्हा धर्माचा प्रश्‍न येईल, तेव्हा हिंदु धर्माच्या बाजूने बोलेन, असे वक्तव्य अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केले. उर्मिला मातोंडकर यांनी १ डिसेंबर या दिवशी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री येथे सौ. रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्या हातात शिवबंधन बांधले.

पत्रकार परिषदेत बोलतांना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, ‘‘मी ८-९ वर्षे योगसाधना केली आहे. हिंदुत्व हा पत्रकार परिषदेत किंवा वेशीवर ओरडून सांगण्याचा विषय नाही. हिंदु धर्म सर्वसमावेशक आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ची शिकवण देणारा आहे. हिंदु धर्माला आध्यात्मिक पार्श्‍वभूमी आहे. हे मी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळीही म्हटले होते; मात्र माझे वक्तव्य तोडूनमोडून प्रसारित करण्यात आले.’’

उत्तरप्रदेश येथे चित्रपटसृष्टी वसवण्याविषयी चित्रपट कलाकारांची भेट घेण्यासाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई येथे येत असल्याविषयी विचारलेल्या प्रश्‍नावर उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, ‘‘उत्तरप्रदेशमध्ये चित्रपटसृष्टी उभारण्यासाठी शुभेच्छा आहेत; मात्र हिंदी चित्रपटसृष्टीचे मुंबईशी रक्ताचे नाते आहे. हिंदी चित्रपटसृष्टी मुंबईपासून वेगळी होऊ शकत नाही.’’

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करण्याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर उत्तर देण्यास त्यांनी टाळले.