मुंबई, २८ नोव्हेंबर (वार्ता.) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दसर्याचे भाषण किंवा दैनिक सामना साठी दिलेली मुलाखत या वेळी त्यांनी वापरलेली भाषा मुख्यमंत्रीपदाला शोभणारी नाही. ते घटनात्मक पदावर बसले आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतांना कुणावर कायदेशीर कारवाई करतांना राग किंवा द्वेष यांतून करणार नाही, अशी त्यांनी शपथ घेतली आहे. हात धुवून मागे लागू, खिमा करू, अशी भाषा नाक्यावर वापरली जाते. अशा प्रकारे चिरडण्याची भाषा करणारे फार टिकले नाहीत. महाराष्ट्राच्या इतिहासात असे धमकावणारे मुख्यमंत्री पाहिले नाहीत, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पत्रकार परिषदेत केली. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन १ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपकडून महाविकास आघाडीच्या अपयशाची माहिती देणार्या पुस्तकाचे प्रकाशन २८ नोव्हेंबर या दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे मुंबईचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा हे उपस्थित होते.
या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की,
१. सरकारविरोधी विचार मांडल्यावर ते चिरडून टाकू, या वृत्तीशी आम्ही मूळीच सहमत नाही. अर्णव गोस्वामी आणि कंगना राणावत यांच्या प्रकरणात अनुक्रमे सर्वोच्च न्यायालय अन् उच्च न्यायालय यांनी केलेली टीपणी शासनाच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये सरकारच्या विरोधात बोलाल, तर कारागृहात टाकू, ही दमनकारीवृत्ती प्रगट झाली आहे.
२. न्यायालयाच्या टीपणीनंतर या प्रकरणांमध्ये मुख्यमंत्री क्षमा मागणार, गृहमंत्र्यांवर कारवाई करणार की, संबंधित अधिकार्यांवर कारवाई करणार ? हे स्पष्ट झाले पाहिजे.
३. मूळात हे शासन जनतेचा विश्वासघात करून स्थापन करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नावाने मते मागितली आणि विरोधकांशी हातमिळवणी केली.
४. आरे येथील कारशेडच्या स्थगितीच्या निर्णयामध्ये काही प्रशासकीय अधिकार्यांनी स्वत:च्या लाभासाठी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली आहे. याविषयी आम्ही पुस्तक प्रकाशित करून प्रत्येक मुंबईकरापर्यंत यामागील सत्य पोचवणार आहोत.
५. देशात कोरोनामुळे झालेल्या १ लाख ३४ सहस्र मृत्यूंपैकी ४६ सहस्र मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. कुठेही सरकारचे नियंत्रण पहायला मिळालेले नाही. केवळ ईश्वराच्या आशीर्वादामुळे कोरोनाची दुसरी लाट थोपवली गेली, असे असतांना शासन कोरोनाला थोपवल्याची वल्गना करत आहे.
६. कोरोनाच्या कालावधीत राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. हा भ्रष्टाचार आम्ही उघड करणार आहोत.
७. मराठा आरक्षणाविषयी शासनाचे धोरण वेळकाढूपणाचे आहे. याविषयी शासनामध्ये समन्वय नाही. महाविकास आघाडीमधील काही नेते इतर मागावसर्गीय आणि मराठा समाज यांमध्ये वाद निर्माण करणारी वक्तव्ये करत आहेत.
८. शासन समाजातील कोणत्याही घटकाचे समाधान करू शकलेले नाही. १ वर्षात शासन पूर्णत: अपयशी ठरले आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नाही.
९. अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई ही पुराव्यांच्या आधारे होत आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी आमची मागणी नाही.
१०. राज्यात महाविकास आघाडीचे शासन असले, तरी या सत्तेचा उपयोग स्वत:च्या पक्षवाढीसाठी कसा करायचा, हे शरद पवार यांना चांगलेच माहीत आहे. त्यानुसार ते करत आहेत.