अणुशास्त्रज्ञाच्या हत्येचा सूड घेणार ! – इराणची इस्रायलला धमकी

इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रौहानी

तेहरान (इराण) – इराणसाठी अणूबॉम्ब बनवण्याचा प्रयत्न करणारे अणुशास्त्रज्ञ मोहसीन फाखरीजादेह यांची २७ नोव्हेंबर या दिवशी तेहरानमध्ये गोळ्या झाडून आणि नंतर त्यांच्या वाहनावर बॉम्बस्फोट घडवून हत्या करण्यात आली. यात त्यांच्यासह अन्य काही जण ठार झाले. या हत्येमागे इस्रायलचा हात असल्याचा आरोप करत ‘या हत्येचा सूड घेण्यात येईल’, अशी धमकी इराणने इस्रायलला दिली आहे. ‘या हत्येमध्ये इस्रायलचा सहभाग असल्याचे पुरावे सापडले आहेत’, असे इराणचे परराष्ट्रमंत्री महंमद जवाद जरीफ यांनी सांगितले. जरीफ यांच्या आरोपावर इस्रायलने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. कुठल्याही आतंकवादी संघटनेने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारलेले नाही. मोहसीन फाखरीजादेह यांना ‘द फादर ऑफ इराणी बॉम्ब’ असे संबोधले जात होते.

जरीफ म्हणाले की, या हत्येमुळे इस्रायल युद्धासाठी उत्सुक आहे, असे दिसून येते. हत्या करण्यात आलेल्या शास्त्रज्ञाचे नाव यापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी एका कार्यक्रमात घेतले होते.