पाकमधील व्यवसाय बंद करू ! – गूगल, फेसबूक आदींची पंतप्रधान इम्रान खान यांना चेतावणी

सामाजिक माध्यमे आणि संकेतस्थळे यांवरील लिखाणाविषयी नवे नियम लावण्याला विरोध

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाक सरकारने संकेतस्थळे आणि सामाजिक माध्यमे यांवर असलेल्या लिखाणाविषयी नवे नियम लागू केले आहेत. हे लिखाण सेन्सॉर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे फेसबूक, गूगल आणि ट्विटर यांनी पाकमधील त्यांचा व्यवसाय बंद करण्याची धमकी दिली आहे.

नवीन नियमांतर्गत इस्लामचा निषेध करणारे, आतंकवादाला चालना देणारे, द्वेषयुक्त भाषा, अश्‍लील साहित्य किंवा अशा आशयाचे साहित्य आढळून आल्यास ३.१४ मिलियन डॉलरचा दंड ठोठावण्यात येणार आहे. त्याशिवाय हे कृत्य राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी धोक्याचे असल्याचे समजण्यात येणार आहे. नवीन नियमांनुसार सामाजिक माध्यमांवरील आस्थापनांना सूचना केल्यानंतर २४ घंट्यांमध्ये संबंधित मजकूर हटवणे बंधनकारक असणार आहे.