विनंतीनंतर केवळ महिलांनाच छठ पूजा करण्यास दिली अनुमती
बार चालू, रेस्टॉरंट चालू, कॅसिनो चालू. मग हिंदूंचे सण-उत्सव बंद का ? भाविक हिंदू कोरोनाची मार्गदर्शक तत्त्वे पाळत नाहीत आणि दारूडे पाळतात, असे प्रशासनाला वाटते का ?
वास्को, २१ नोव्हेंबर (वार्ता.) – येथील बायणा समुद्रकिनार्यावर गोव्यात स्थायिक झालेल्या उत्तर भारतीय नागरिकांना शुक्रवारी छठ पूजा करण्यास वास्को पोलिसांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता अडवले. पोलिसांच्या या अचानक झालेल्या विरोधामुळे समुद्रकिनार्यावर काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर वास्को पोलिसांकडे छठ पूजा करण्यास विनंती करण्यात आल्यानंतर पोलिसांनी केवळ महिलांनाच पूजा करण्यास अनुमती दिली. अनुमती दिल्याविषयी ‘राष्ट्रीय युवा हिंदु वाहिनी’चे अध्यक्ष अविनाश तिवारी यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
वास्को येथे स्थायिक झालेले उत्तर भारतीय नागरिक बायणा आणि बोगमाळो समुद्रकिनार्यांवर गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिवर्ष छठ पूजा करतात; मात्र यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बायणा समुद्रकिनार्यावर छठ पूजा करू नये, यासाठी वास्को पोलिसांनी मोठ्या प्रमाणवर पोलीस फौजफाटा नेमला होता. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी टाळण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न होता.
याविषयी पत्रकारांना ‘राष्ट्रीय युवा हिंदु वाहिनी’चे अध्यक्ष अविनाश तिवारी म्हणाले, ‘छठ पूजा करण्यास कोणत्याही संघटनेला अनुमती नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी बलप्रयोग करून छठ पूजेसाठी आलेल्या महिलांना किनार्यावरून हटवले. पोलिसांची ही कृती खूप दु:खदायक वाटली. छठ पूजा ही कोणतीही संघटना करत नाही, तर ती प्रत्येक जण वैयक्तिक स्तरावर करत असतो. पोलिसांनी छठ पूजा करण्यास मनाई असल्याविषयी पूर्वकल्पना देणे अपेक्षित होते. यासाठी प्रसारमाध्यमांचा आधार पोलीस घेऊ शकले असते. पोलिसांचा निर्णय पूर्वीच समजल्यास भाविकांमध्ये याविषयी जागृती झाली असती. अखेर महिलांना सामाजिक अंतर राखून छठ पूजा करण्यास अनुमती दिल्याने परंपरा कायम राखण्यास साहाय्य केल्याविषयी मी वास्को पोलिसांचे आभार मानतो.’’