कु. मानसी प्रभु यांना स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाच्या आढाव्यात शिकायला मिळालेली सूत्रे आणि देवाने करवून घेतलेले प्रयत्न !

कु. मानसी प्रभु यांना सौ. सुप्रिया माथूर घेत असलेल्या स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या आढाव्यात शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांच्याकडून देवाने करवून घेतलेले प्रयत्न !

रामनाथी, गोवा येथील आश्रमात सेवा करणार्‍या कु. मानसी प्रभु यांचा आज कार्तिक शुक्ल पक्ष चतुर्थी (१८.११.२०२०) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांना स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवतांना लक्षात आलेली सूत्रे येथे देत आहोत.

कु. मानसी प्रभु

कु. मानसी प्रभु हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !

१. आढाव्यात ‘लिखाण जमत नाही’ असे सांगणे आणि त्यावर सौ. सुप्रियाताईने ‘लिखाण जमले नाही, तर प्रायश्‍चित्त घे’, असे सांगितल्यावर प्रयत्नांना प्रारंभ होणे

सौ. सुप्रिया माथूर

‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेच्या कालावधीत मला सौ. सुप्रिया माथूर यांच्याकडून ‘विविध प्रसंगांत कशा पद्धतीने चिंतन करायचे ? कोणता प्रसंग घडला की, कोणत्या दृष्टीने बघायचे आणि ते कृतीत कसे आणायचे ?’, हे पुष्कळ सोप्या आणि सरळ शब्दांत शिकायला मिळाले.

प्रारंभी १ – २ मास मला वाटायचे, ‘ताईने मला समजून घ्यायला हवे. मला आध्यात्मिक त्रासही होतो ना !’ एकदा मी ताईला सांगितले होते, ‘‘ताई, मला लिखाण करायला जमत नाही. त्रास होतो.’’ तेव्हा ताईने सांगितले, ‘‘हा त्रास नाही. मनाचा भाग आहे, या आधी कधी व्यष्टी केली नाही. त्यामुळे आता करायला त्रास होत आहे.’’ मी काही आढाव्यांत ‘मला लिखाण जमत नाही’, असे सांगायचे. एकदा ताईने सांगितले, ‘‘यापुढे लिखाण जमले नाही, तर प्रायश्‍चित्त घे.’’ त्यानंतर माझ्या प्रयत्नांना प्रारंभ झाला. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘त्रास होतो; म्हणून केले नाही की, ते होत नाही.’ ‘प्रयत्न करायचे आहेत’, या विचाराने प्रारंभ केला की, ‘देव साहाय्य करतो.’

२. काही दिवस दैनंदिनी न लिहिल्याने सुप्रियाताईने ‘८ दिवस भ्रमणभाष हाताळणार नाही’, असे प्रायश्‍चित्त घेण्यास सांगणे, व्यष्टी साधनेची घडी न बसल्याने याच प्रायश्‍चित्तात आणखी वाढ होणे आणि त्यामुळे लवकर अंतर्मुख होण्यास साहाय्य होणे

माझे मध्ये काही दिवस व्यष्टी साधनेचे प्रयत्न अल्प झाले होते. मी काही दिवस दैनंदिनी लिहिली नव्हती. त्यावर ताईने मला ‘८ दिवस भ्रमणभाष हाताळणार नाही’, असे प्रायश्‍चित्त घेण्यास सांगितले. ‘ठीक आहे’, असे म्हणून मी गेले. ८ दिवसानंतर मी तिला भ्रमणभाष वापरण्याविषयी विचारायला गेले. तेव्हा ताईने मला पुष्कळ प्रेमाने विचारले, ‘‘तुझी व्यष्टी साधनेची घडी बसली का ?’’ मी ‘नाही’, असे म्हणाले. तेव्हा ताईने ‘आणखी ८ दिवस भ्रमणभाष वापरू नकोस’, असे सांगितले. असे करत ४ मास मी भ्रमणभाष वापरला नाही. त्यामुळे मला लवकर अंतर्मुख होण्यास साहाय्य झाले; कारण पुष्कळदा आढाव्याच्या वेळी माझ्या मनात विचार यायचा, ‘जर माझ्याकडे भ्रमणभाष असता, तर हे प्रयत्न झाले नसते. माझ्या चुकाच झाल्या असत्या.’ त्या वेळी ‘ताई जे सांगते, ते चांगल्यासाठीच आहे’, याची मला जाणीव झाली.

३. आढाव्यात ताई कठोर आणि तत्त्वनिष्ठ असली, तरी आढाव्यानंतर तिचे प्रेमळ रूप अनुभवायला मिळणे

‘ताई हे सर्व मला घडवण्यासाठी सांगत आहे. ताईच्या सांगण्यात कठोरपणा असला, तरी आतमध्ये प्रेम असल्यामुळे तिच्या बोलण्याचा राग येत नाही. ती मला अगदी आईप्रमाणे घडवत आहे’, असे मला वाटत होते. आढाव्यात जरी ती कठोर आणि तत्त्वनिष्ठ असली, तरी आढाव्यानंतर तिचे वेगळेच रूप अनुभवायला मिळायचे. एरव्ही ती माझ्याकडे बघून पुष्कळ गोड हसायची. त्यामुळे तिच्याविषयी माझ्या मनात आणखी प्रेम निर्माण व्हायचे.

४. मौनाचे प्रायश्‍चित्त पूर्ण केले जात नसल्याचे सांगितल्यावर सुप्रियाताईने ‘काय प्रयत्न करायचे ?’, हे समजावून सांगणे आणि ‘एखादी चूक पुन्हा न होण्यासाठी आपण काय करायला हवे ?’, या उद्देशाने तिला एखादे सूत्र सांगितल्यास ती प्रेमानेच सांगते’, हे लक्षात येणे

माझ्या काही चुकांमुळे तिने मला मौनाचे प्रायश्‍चित्त घ्यायला सांगितले होते. ते जेव्हा जेव्हा माझ्याकडून पाळले जायचे नाही, तेवढ्या वेळा मी तिच्याकडे जाऊन सांगायचे, ‘‘ताई, माझ्याकडून प्रायश्‍चित्त पूणे केले जात नाही.’’ तेव्हा ‘त्यावर काय प्रयत्न करायचे ?’, हे ती मला समजून घेऊन सांगायची. जर आपण प्रामाणिक राहिलो आणि ‘ती चूक पुन्हा न होण्यासाठी आपण काय करायला हवे ?’, या उद्देशाने सांगितले, तर ताई प्रेमानेच सांगते. यावरून लक्षात येते, ‘ताईमुळे केवळ स्थुलातील नव्हे, तर सूक्ष्मातील जाणूनही साधनेत पुढे जाण्यास साहाय्य होते.’

५. ‘ताई सांगत असलेला एक एक शब्द मनात कोरून ठेवावा’, असे वाटणे, ३ – ४ मास स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यावर विचारांमध्ये पालट होणेे

मी माझ्या मनातले जेवढे सांगायला जमेल, तेवढे सगळ काही तिला सांगायचे. ‘ती सांगत असलेले एक एक शब्द मनात कोरून ठेवावा’, असे मला वाटायचे. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवून ३ – ४ मास झाल्यानंतर माझ्या विचारांमध्ये पालट होत गेला. आढाव्याच्या वेळी सर्वांत आधी आढावा द्यायची माझी इच्छा असायची. ‘कधी एकदा मी तिला माझ्या चुका सांगीन आणि मला हलके वाटेल’, असे मला होत असे. तिच्या आढाव्याला बसण्यानेच माझ्यावरचे त्रासदायक आवरण दूर होत असल्याचे मला जाणवायचे. ‘माझ्या तोंडवळ्यात चांगला पालट झाला आहे’, असे अन्य साधक सांगायचे. तेव्हाही माझ्या मनात विचार यायचा, ‘केवळ सुप्रियाताईच्या आढाव्यामुळेच !’ पूर्वी मी नामजपादी उपायांना बसायचे. तेव्हा माझा नामजप व्हायचा नाही; पण प्रक्रियेमुळे े माझा नामजप चांगला होऊ लागला.

६. कोणत्याही प्रसंगात संघर्ष होत असेल, तेव्हा ‘त्यातून बाहेर पडण्यासाठी सुप्रियाताईने काय सांगितले असते ?’, असा विचार केल्यावर तिचे शब्द आठवून त्या प्रसंगात स्थिर रहाण्यास आणि योग्य कृती करण्यास साहाय्य होणे

आताही मी लिखाण करत असतांना पुष्कळ वेळा मला ‘काय सूचना घ्यायची किंवा कोणता दृष्टीकोन ठेवायचा ?’, ते समजत नाही. तेव्हा मी विचार करते, ‘हा प्रसंग जर मी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सुप्रियाताईसमोर मांडला असता, तर तिनेे काय सांगितले असते ?’ असा विचार करताक्षणी सुप्रियाताई माझ्या डोळ्यांसमोर येते. मला तिचा आवाज ऐकू येतो. ती सांगत असलेला दृष्टीकोन ऐकू येतो आणि तो मी माझ्या सारणीत लिहून काढते. असे एरव्हीही होते. कोणताही प्रसंग घडला किंवा कोणत्याही प्रसंगात संघर्ष होत असेल, तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी ‘यावर सुप्रियाताईने मला काय सांगितले असते ?’, असा विचार केल्यावर मला तिचे शब्द आठवतात आणि त्या प्रसंगात स्थिर रहाण्यास अन् योग्य कृती करण्यास साहाय्य होते.

‘हे गुरुदेव, मला घडवण्यासाठी तुम्ही मला प्रक्रिया शिकण्याची संधी दिलीत. त्यात मला सुप्रियाताईच्या आढाव्यात बसण्याची संधी मिळाली’, यासाठी कोटीशः कृतज्ञता !

आजपर्यंत परात्पर गुरु डॉक्टरांनी मला जसे घडवले आणि शिकवले, त्याप्रतीची कृतज्ञता मी शब्दांत वर्णू शकत नाही. देवाने मला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मी त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. मानसी प्रभु (वय १९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.११.२०२०)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक