शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून पुण्यातील चतु:श्रृंगी मंदिरात साधेपणाने नवरात्रोत्सव

पुण्यातील चतु:श्रृंगी मंदिरात साधेपणाने नवरात्रोत्सव

पुणे – यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सण साजरे करण्यासाठी सरकारने नियमावली सिद्ध केली आहे. राज्य सरकारने घोषित केलेल्या सर्व नियमांचे पालन करून चतु:श्रृंगीदेवीच्या मंदिरात यावर्षीचा १७ ते २५ ऑक्टोबर या कालावधीतील नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा केला जाणार आहे. भाविकांना मंदिराच्या आवारात प्रवेश मिळणार नाही; मात्र ऑनलाईन पद्धतीने देवीच्या दर्शनाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे, अशी माहिती श्री देवी चतु:श्रृंगी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष किरण अनगळ आणि कार्यकारी विश्‍वस्त देवेंद्र अनगळ यांनी दिली आहे.

नवरात्रोत्सवातील सर्व धार्मिक कार्यक्रम पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरे केले जाणार आहेत. १७ ऑक्टोबरला सकाळी देवीचा अभिषेक, षोडशोपचार पद्धतीने महापूजा, महावस्त्र अर्पण करून मंदिरात घटस्थापना करण्यात येणार असून नरेंद्र अनगळ यांच्याकडे या वर्षीच्या पूजेचे दायित्व आहे. २५ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ८ ते ११ या वेळेत नवचंडी होम करण्यात येणार आहे. चतु:श्रृंगी मंदिराच्या जीर्णोद्धार प्रकल्पाला फेब्रुवारी मासात महापालिकेच्या हेरिटेज विभागाने मान्यता दिली आहे. बांधकाम विभागाची अनुमती मिळताच जीर्णोद्धाराचे काम चालू केले जाणार आहे, अशी माहिती अनगळ यांनी दिली.