नावीन्यपूर्ण आध्यात्मिक संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
सनातनचे ‘दुसरे बालसंत’ पू. वामन राजंदेकर (वय २ वर्षे) यांचे ‘जावळ’ (डोक्यावरील केस) काढल्यावर त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्या चैतन्यात पुष्कळ वाढ होणे आणि त्यांचे जावळ काढण्यासाठी वापरलेल्या वस्तू (कंगवा, वस्तरा, कात्री इत्यादी) चैतन्याने भारित होणे
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया‘ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘गर्भधारणेपासून विवाहापर्यंतच्या काळात आई, वडील आणि आचार्य यांच्याकडून पुत्र किंवा कन्या यांच्यावर त्यांच्याकडून सम्यक (सात्त्विक) कृती व्हावी; म्हणून वैदिक पद्धतीने जे विधी केले जातात, त्यांना ‘संस्कार’ असे म्हणतात. यांपैकी प्रमुख सोळा संस्कार आहेत. (सोळा संस्कारांची माहिती सनातनचा ग्रंथ ‘सोळा संस्कार’ यात दिली आहे.) ‘जावळ (प्रथमकेशखंडन)’ ही चौलकर्माशी संबंधित एक कृती आहे. (चौलकर्म संस्काराची माहिती लेखातील सूत्र ‘३ अ’ मध्ये दिली आहे.) रूढीप्रमाणे बाळ एक वर्षाचे होते, त्या सुमारास त्याचे जावळ काढतात. त्या वेळी डोक्याच्या पुढच्या भागावर थोडेसे केस ठेवतात.
५.३.२०२० या दिवशी सनातनचे ‘दुसरे बालसंत’ पू. वामन राजंदेकर यांचे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘जावळ’ (डोक्यावरील केस) काढण्यात आले. पू. वामन राजंदेकर यांचे जावळ काढल्याने त्यांच्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.
१. चाचणीचे स्वरूप
या चाचणीत पुढील घटकांच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या.
अ. पू. वामन राजंदेकर : जावळ काढण्यापूर्वी आणि जावळ काढल्यानंतर त्यांच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या.
आ. पू. वामन राजंदेकर यांच्या डोक्यावरील काढलेले केस (जावळ)
इ. जावळ काढण्यासाठी वापरण्यात आलेल्या वस्तू (फणी, कंगवा, वस्तरा, वस्तर्याचे पाते (ब्लेड) आणि कात्री) : जावळ काढण्यासाठी वस्तू वापरण्यापूर्वी आणि वापरल्यानंतर त्यांच्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या.
या सर्व मोजण्यांच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.
वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ (‘यू.टी.एस्.)’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत आणि चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत. |
२. केलेल्या मोजणांच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन
२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन
२ अ १. पू. वामन राजंदेकर यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.
२ अ २. पू. वामन राजंदेकर यांच्या डोक्यावरील काढलेल्या केसांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.
२ अ ३. पू. वामन राजंदेकर यांचे जावळ काढण्यासाठी वापरण्यात आलेल्या वस्तूंमधील ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा नाहीशी होणे : पू. वामन राजंदेकर यांचे जावळ काढण्यासाठी वापरण्यात आलेल्या वस्तूंमध्ये आरंभी (जावळ काढण्यासाठी वस्तू वापरण्यापूर्वी) ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा होती. त्यांची प्रभावळ पुढे दिली आहे.
टीप – वस्तर्याच्या पात्यामध्ये ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा होती; पण तिची प्रभावळ नव्हती. पात्याच्या संदर्भात ‘ऑरा स्कॅनर’ने १२० अंशाचा कोन केला. (‘ऑरा स्कॅनर’ने १८० अंशाचा कोन केला, तरच प्रभावळ मोजता येते.)
पू. वामन यांचे जावळ काढण्यासाठी वस्तू वापरल्यानंतर त्यांतील नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाल्याचे आढळले. तेव्हा सर्व वस्तूंच्या संदर्भात ‘ऑरा स्कॅनर’ने ० अंशाचा कोन केला. (वस्तूंच्या संदर्भात ‘ऑरा स्कॅनर’ने ० अंशाचा दर्शवणे हे त्या वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा नसल्याचे निर्देशक आहे.)
२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन : सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही.
२ आ १. जावळ काढल्यानंतर पू. वामन राजंदेकर यांच्या सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होणे : पू. वामन राजंदेकर यांच्यामध्ये आरंभी पुष्कळ सकारात्मक ऊर्जा होती आणि तिची प्रभावळ १६२.४० मीटर होती. त्यांचे जावळ काढल्यानंतर त्यांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत ५६.६५ मीटरने वाढ होऊन ती २१९.०५ मीटर झाली.
२ आ २. पू. वामन राजंदेकर यांच्या डोक्यावरील काढलेल्या केसांमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असून तिची प्रभावळ ९२.२० मीटर होती.
२ आ ३. पू. वामन राजंदेकर यांचे जावळ काढण्यासाठी वापरण्यात आलेल्या वस्तूंमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे : पू. वामन यांचे जावळ काढण्यासाठी वापरण्यात आलेल्या वस्तूंमध्ये (वस्तर्याचे पाते सोडून अन्य वस्तूंमध्ये) आरंभी (जावळ काढण्यासाठी वस्तू वापरण्यापूर्वी) सकारात्मक ऊर्जा नव्हती. वस्तर्याच्या पात्यामध्ये अत्यल्प सकारात्मक ऊर्जा होती; पण तिची प्रभावळ नव्हती. पात्याच्या संदर्भात ‘ऑरा स्कॅनर’ने ६० अंशाचा कोन केला. (‘ऑरा स्कॅनर’ने १८० अंशाचा कोन केला, तरच प्रभावळ मोजता येते.) पू. वामन यांचे जावळ काढण्यासाठी वस्तू वापरल्यानंतर त्यांमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळली. त्यांची प्रभावळ पुढे दिली आहे.
२ इ. एकूण प्रभावळीच्या (ऑरा) (टीप) संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन : सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते.
टीप – एकूण प्रभावळ (ऑरा) : व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ, तसेच वस्तूच्या संदर्भात तिच्यावरील धुलीकण किंवा तिचा थोडासा भाग यांचा नमुना म्हणून उपयोग करून त्या व्यक्तीची वा वस्तूची एकूण प्रभावळ मोजतात.
२ इ १. जावळ काढल्यानंतर पू. वामन राजंदेकर यांच्या एकूण प्रभावळीत पुष्कळ वाढ होणे : जावळ काढण्यापूर्वी पू. वामन राजंदेकर यांची एकूण प्रभावळ २०३.३५ मीटर होती. त्यांचे जावळ काढल्यानंतर त्यांच्या एकूण प्रभावळीत ६९.२१ मीटरने वाढ होऊन ती २७२.५६ मीटर झाली.
२ इ २. पू. वामन राजंदेकर यांच्या डोक्यावरील काढलेल्या केसांची एकूण प्रभावळ १२२.६५ मीटर होती.
२ इ ३. पू. वामन राजंदेकर यांचे जावळ काढण्यासाठी वापरण्यात आलेल्या वस्तूंच्या एकूण प्रभावळीत पुष्कळ वाढ होणे
वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण सूत्र ‘३’ मध्ये दिले आहे.
३. केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
३ अ. चौलकर्म (चूडाकर्म, शेंडी ठेवणे) : ‘चूडा’ म्हणजे शेंडी. डोक्यावर शेंडीच्या चक्राच्या ठिकाणी सहस्रारचक्र असते. तिथे शेंडी ठेवून बाकीचे केस काढणे, याला ‘चौलकर्म’ किंवा ‘चूडाकर्म’ असे म्हणतात. उपनयन आणि प्रत्येक विधीमध्ये शेंडीला महत्त्व आहे. आयुष्य, बल आणि तेज यांची वृद्धी व्हावी; म्हणून चौलकर्म (शेंडी ठेवणे) हा संस्कार करतात. शेंडीमुळे विश्वातील सत्त्वलहरी ब्रह्मरंध्रातून आत येण्यास साहाय्य मिळते. दूरदर्शनचा अँटेना जसे कार्य करते, तसे शेंडी कार्य करते.
३ अ १. चौलकर्म करण्याचा उद्देश : शेंडीच्या ठिकाणी मेधा शक्ती जागृत झाली की, तिने तेथेच नित्य (कायम) रहावे (आमचा विवेक नेहमी जागृत रहावा), हा चौलकर्म करण्याचा उद्देश आहे. हा संस्कार तिसर्या, चौथ्या किंवा पाचव्या वर्षी (पाठभेद पहिल्या, दुसर्या, तिसर्या किंवा पाचव्या वर्षी) शुभघटिका पाहून करण्याची वहिवाट आहे. सध्या बहुधा मुंजीच्या वेळी हा विधी करतात.
३ अ २. चौलकर्माशी संबंधित एक कृती – जावळ (जाऊळ, जायवळ, प्रथमकेशखंडन) : शास्त्रानुसार मुलगा असल्यास ६, ८, १० इत्यादी सम मासात, तर मुलगी असल्यास १, ३, ५ इत्यादी विषम मासात जावळ काढावे. रूढीप्रमाणे बाळ एक वर्षाचे होते, त्या सुमारास त्याचे जावळ काढतात. त्या वेळी डोक्याच्या पुढच्या भागावर थोडेसे केस ठेवतात. थोडे केस ठेवण्याचे महत्त्व सूत्र ‘३ अ १’ यातील ‘उद्देश’ यावरून लक्षात येईल. एक वर्षाच्या आत जावळ काढले पाहिजे, नाहीतर तीन वर्षे काढता येत नाही, अशी अनेकांची समजूत आहे; पण त्यास शास्त्राधार नाही. तीन वर्षांपर्यंत केव्हाही सममासात (शास्त्रानुसार मुलांचे जावळ हे जन्मापासून ६, ८, १० इत्यादी सममासात केले जाते.) योग्य दिवस पाहून जावळ काढावे. जावळ काढणे म्हणजे चौलकर्म नाही. (जावळ काढतांना शेंडी ठेवत नाहीत.)’ (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सोळा संस्कार’)
३ आ. जावळ काढल्यानंतर पू. वामन राजंदेकर यांच्यातील सकारात्मक ऊर्जा आणि त्यांची एकूण प्रभावळ यांमध्ये पुष्कळ वाढ होणे : पू. वामन राजंदेकर हे जनलोकातून (टीप) ‘हिंदु राष्ट्रा’संदर्भातील कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आले आहेत. त्यांच्यामध्ये श्रीरामतत्त्व आणि श्रीकृष्णतत्त्व आहे. पू. वामन यांच्याकडून वातावरणात चैतन्य सतत प्रक्षेपित होत असते. त्यामुळे आरंभीही (जावळ काढण्यापूर्वीही) त्यांच्यामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा (१६२.४० मीटर) आढळली आणि त्यांची एकूण प्रभावळही पुष्कळ अधिक (२०३.३५ मीटर) होती. (सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते.) संतांच्या ब्रह्मरंध्रातून सर्वाधिक चैतन्य प्रक्षेपित होते. पू. वामन यांचे जावळ काढल्याने (त्यांच्या डोक्यावरील केस काढल्याने) त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्या चैतन्यात पुष्कळ वाढ झाली.
टीप – भू, भुवर्, स्वर्ग, महर्, जन, तपस् आणि सत्य असे सप्तलोक आहेत. यांपैकी स्वर्ग आणि त्यापुढील लोकांना ‘उच्च लोक’ असे म्हणतात.
३ इ. पू. वामन राजंदेकर यांच्या डोक्यावरील काढलेल्या केसांमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असणे : संतांमध्ये पुष्कळ चैतन्य असल्याने त्यांचा देह, त्यांचे केस आणि नखे यांतूनही चैतन्य प्रक्षेपित होते. (त्यांची कापलेली नखे आणि केस यांतूनही चैतन्य प्रक्षेपित होते.) संतांच्या ब्रह्मरंध्रातून सर्वाधिक चैतन्य प्रक्षेपित होते. पू. वामन यांच्यामध्ये पुष्कळ चैतन्य असल्याने त्यांच्या डोक्यावरील काढलेल्या केसांमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा (९२.२० मीटर) आढळली आणि केसांची एकूण प्रभावळही (१२२.६५ मीटर) पुष्कळ अधिक होती.
३ ई. पू. वामन राजंदेकर यांचे जावळ काढण्यासाठी वापरण्यात आलेल्या वस्तूंतील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यांमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे : पू. वामन यांच्याकडून प्रक्षेपित होणार्या चैतन्याचा चांगला परिणाम त्यांचे जावळ काढण्यासाठी वापरलेल्या वस्तूंवर झाला; त्यामुळे त्यांतील नकारात्मक स्पंदने नष्ट होऊन त्या चैतन्याने भारित झाल्या.’
– डॉ. अमित भोसले, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१५.४.२०२०)
ई-मेल : [email protected]