सिंधुदुर्ग – शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेले प्रशासकीय अधिकारी आणि आमदार नाईक यांचे कार्यकर्ते यांच्या कोरोनाशी संबंधित चाचण्या करण्यात आल्या. या सर्वांचे चाचणी अहवाल नकारात्मक आले आहेत. यामध्ये जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांची कोरोना संबंधीची चाचणी करण्यात आली होती. ‘आमदार वैभव नाईक यांच्या संपर्कात आलेले मालवणमधील कार्यकर्ते आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांचीही कोरोनाशी संबंधित चाचणी करण्यात आली होती. अहवाल नकारात्मक आल्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये’, असे आवाहन शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरि खोबरेकर यांनी केले आहे.
कणकवली – शिवसेनेचे कणकवली येथील नेते संदेश पारकर यांचा कोरोनाशी संबंधित चाचणी अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आला आहे.
लोकप्रतिनिधींनी दक्षता बाळगणेच आवश्यक ! – श्री. संजय जोशी, प्रतिनिधी, कुडाळ
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित आहे; मात्र शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड होताच खळबळ उडाली. कोरोना महामारीच्या काळात विविध ठिकाणी भेटी देणार्या लोकप्रतिनिधींसमवेत कार्यकर्त्यांचा गोतावळा असतो, तसेच प्रशासकीय अधिकारीही उपस्थित असतात. या पार्श्वभूमीवर यापुढे लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी यांच्यासह जनतेनेही सावध राहून शासनाने सांगितलेले नियम पाळणे आवश्यक आहे.
या अनुषंगाने लक्षात आलेली काही सूत्रे…
१. लोकप्रतिनिधींनी समूह संसर्ग टाळण्यासाठी सामाजिक अंतराचे भान राखून कार्यक्रम केले पाहिजेत किंबहुना त्या कार्यक्रमांची आवश्यकता किती आहे, हे पाहून टाळता येणारे कार्यक्रम टाळले पाहिजेत.
२. कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी ‘वेबिनार’, ‘झूम मीटिंग’ आदी सामाजिक माध्यमांचा वापर करून काम केले पाहिजे.
३. ५५ वर्षे आणि त्याहून अधिक वय असलेल्या लोकप्रतिनिधींनी विशेष काळजी घेतली पाहिजे.
४. कायम कार्यकर्त्यांच्या गराड्यात वावरण्याची सवय असलेले लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांची लहानशी चूकही सर्वांना महागात पडू शकते. आमदार वैभव नाईक यांना झालेल्या संसर्गाच्या उदाहरणातून दक्षता बाळगणे आवश्यक वाटते.