‘८ दिवसांत न्याय न दिल्यास आत्महत्या करीन !’ – निलंबित अन्न निरीक्षक राजीव कोरडे यांची शासनाला चेतावणी

  • कारकीर्द स्वच्छ असल्याने अन् ते राजकीय दबावाला बळी पडत नसल्याने निलंबनाची कारवाई झाल्याची चर्चा

  • अनेकांचा कोरडे यांना पाठिंबा

पणजी, २९ एप्रिल (वार्ता.) – अन्न आणि औषध प्रशासनाचे एक प्रामाणिक अधिकारी तथा निरीक्षक राजीव कोरडे यांना ४ मासांपूर्वी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. एका प्रकरणात राजकीय दबावाला बळी न पडल्याने त्यांचे निलंबन केल्याची चर्चा आहे. निरीक्षक राजीव कोरडे यांना निलंबित केल्यानंतर मागील ४ मास त्यांचे वेतनही रोखून ठेवण्यात आले आहे. वेतन रोखून ठेवल्याने निरीक्षक राजीव कोरडे अत्यंत अप्रसन्न आहेत. ‘या प्रकरणी ८ दिवसांच्या आत न्याय न मिळाल्यास आपण आत्महत्या करू आणि याला आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे अन् अन्न आणि औषध प्रशासन हे उत्तरदायी रहातील’, अशी चेतावणी निरीक्षक राजीव कोरडे यांनी दिली आहे. यानंतर त्यांची वेतनासंबंधीची धारिका शासनाने त्वरित हातावेगळी केली आहे.

यासंबंधी आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे म्हणाले, ‘‘ निरीक्षक राजीव कोरडे यांना त्यांचे वेतन मिळेल; मात्र त्यांचे निलंबन मागे घेता येणार नाही. नियमानुसार त्यांच्या कारभाराचे सविस्तर अन्वेषण केले जाईल.’’

प्रशासनात सूड पद्धतीने कारवाई होत असल्याची चर्चा

वास्तविक एखाद्या अधिकार्‍याला सेवेतून निलंबित केल्यानंतर ६ मासांनंतर चौकशीअंती त्याला पुन्हा कामावर घेतले जाते; मात्र निरीक्षक कोरडे यांना पुन्हा कामावर घेऊ नये, असा आदेश अन्न आणि औषध प्रशासनाला आल्याचे समजते. यामुळे निरीक्षक कोरडे यांचे निलंबन झाल्यानंतर आता ४ मास उलटूनही त्यांना पुन्हा कामावर घेण्यासंबंधी कोणत्याच हालचाली अन्न आणि औषध प्रशासनाकडून झालेल्या नाहीत. निरीक्षक राजीव कोरडे यांची आतापर्यंतची कारकीर्द स्वच्छ असल्याने अन् ते राजकीय दबावाला बळी पडले नसल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याची चर्चा आहे. हा विषय अनेकांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यापर्यंत पोचवला असला, तरीही मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी हस्तक्षेप केलेला नाही. निरीक्षक राजीव कोरडे यांनी आत्महत्येचा संदेश दिल्याने राज्यात एकच खळबळ माजली. प्रशासनात अधिकार्‍यांवर सूड पद्धतीने कारवाई होते, अशी चर्चा चालू आहे. हा विषय पंतप्रधानांकडे मांडण्याचा सल्ला अनेकांनी फेसबूकद्वारे निरीक्षक कोरडे यांना दिला आहे.