चिकित्सालये बंद ठेवून नागरिकांची असुविधा करणार्‍या डॉक्टरांचे अनुमतीपत्र रहित करावे ! – मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे निर्देश

मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि पालिका प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे; मात्र झोपडपट्टी अन् वसाहती यांच्या परिसरात अनेक खासगी चिकित्सालयेे जाणीवपूर्वक बंद ठेवून नागरिकांची असुविधा केली जात आहे. अशा दायित्वशून्य डॉक्टरांचे अनुमतीपत्र रहित करावे, असे निर्देश मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले आहेत. २७ मार्च या दिवशी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले. झोपडपट्टी परिसरातील बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांना कारागृहात टाकण्याचा आदेशही जाधव यांनी या वेळी दिला. या वेळी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी उपस्थित होते.