रत्नागिरी जिल्हा प्रशासन आणि ‘हेल्पिंग हँड्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांना किराणा साहित्य घरपोच देण्याची व्यवस्था

रत्नागिरी – जिल्हा प्रशासन आणि अनेक स्वयंसेवी संघटनांचे संघटन असणार्‍या ‘हेल्पिंग हँड्स’च्या संयुक्त विद्यमानेे रत्नागिरी शहरातील नागरिकांना किराणा साहित्य घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी अनुमाने १६० दुकानदारांचे साहाय्य घेतले गेले आहे. जिल्हा प्रशासनाने ‘प्रशासनाला सहकार्य करू, कोरोनाला हद्दपार करू’, असे ध्येय बाळगत ही व्यवस्था केली आहे.

‘नागरिकांनी घरपोच धान्य मिळण्याच्या सुविधेसाठी अत्यावश्यक मागणी नोंदवावी, घरात अनावश्यक धान्यसाठा करण्याचे टाळावे, तसेच या सुविधेसाठी लागणारे पैसे शक्यतो संकेतस्थळाद्वारे (‘ई-पेमेंट’द्वारे) भरावे’, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. अशाच प्रकारची घरपोच सेवा राजापूर, लांजा, मालंगुड, दापोली, पानवळ, निवळी, मंडणगड, गुहागर आदी ठिकाणीही चालू करण्यात आली आहे.