प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा ! सरकारने यातील दोषींवर कठोर कारवाई करणे अपेक्षित !
नवी देहली – गेल्या २ मासांत विदेशांतून १५ लाख नागरिक भारतात आले; पण सर्वांची कोरोनाची पडताळणी झालेली नाही. कोरोनाची पडताळणी केलेल्यांचा अहवाल आणि एकूण प्रवाशांची संख्या यांत मोठी तफावत आहे, अशी माहिती मंत्रीमंडळ (कॅबिनेट) सचिव राजीव गऊबा यांनी दिली. या अनुषंगाने गऊबा यांनी सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश यांना पत्र लिहिले आहे.
गऊबा यांनी या पत्रात म्हटले आहे की, ‘ब्युरो ऑफ इमिग्रेशन’ने १८ जानेवारी ते २३ मार्च २०२० या कालावधीतील एक अहवाल सिद्ध केला आहे. राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश यांच्याकडून मागितलेल्या माहितीच्या आधारावर तो बनवण्यात आला आहे. यात ‘विदेशांतून आलेल्या किती नागरिकांची कोरोनाविषयक पडताळणी झाली ?’, याची माहिती आहे. या अहवालातील संख्या आणि भारतात आलेल्या नागरिकांची संख्या यांमध्ये मोठी तफावत आढळून आली आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांनी आता विदेशांतून आलेल्या सर्व नागरिकांची ओळख पटवून त्यांची कोरोनाची पडताळणी करून घ्यावी, तसेच त्यांना आरोग्य विभागाच्या निरीक्षणाखाली ठेवावे. यासाठी जिल्हा पातळीवरील अधिकार्यांचे साहाय्य घ्यावे.’