मृत कोरोनाग्रस्त महिला नवी मुंबईतील नव्हे, तर मुंबईतील रहिवासी – आयुक्त

नवी मुंबई – ‘व्हाट्सअ‍ॅप’वर वाशीतील निवासी कोरोनाग्रस्त महिला रुग्णाचा मृत्यू ही बातमी प्रसारीत होत आहे, वस्तूतः ही महिला नवी मुंबईतील नसून मुंबईतील गोवंडी येथील होती, असे महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले.

ही महिला आरंभी मुंबईच्या रुग्णालयात भरती होती. त्यानंतर नेरूळच्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात तिच्यावर उपचार चालू होते. त्यानंतर तिला २४ मार्च यादिवशी  नवी मुंबई महानगरपालिका वाशी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्या ठिकाणी तिच्यावर पूर्ण सुरक्षितता बाळगून उपचार करण्यात येत होते. त्या वेळी तातडीने रुग्णाचे सॅम्पल घेऊन कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. ही रुग्ण नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात मृत्यू होण्यापूर्वी केवळ ४ घंटे होती. त्यामुळे सर्व नागरिकांनी वस्तूस्थिती जाणून घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत आणि नागरिकांमध्ये कुठल्याही प्रकारच्या भीतीचे वातावरण निर्माण करू नये, असे आवाहन आयुक्त मिसाळ यांनी केले आहे.

वरील महिलेच्या मृत्यूप्रकरणी डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयाला नोटीस बजावून याची माहिती घेण्यात येत आहे, असे आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.