सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षात नवीन उपक्रमांच्या माध्यमातून धर्मकार्याने घेतलेली गरुडझेप !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

‘कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या दळणवळणबंदीने लोकांचे जीवनमान पालटले आणि प्रत्यक्ष कामाची पद्धत ‘ऑनलाईन’ झाली होती. आजही ती पद्धत ‘वर्क फ्रॉम होम (घरी राहून काम करणे)’, अशी झाली आहे. प्रत्यक्ष कराव्या लागणार्‍या गोष्टी आता ‘ऑनलाईन’ सहजतेने होत आहेत. सनातनचेही अनेक उपक्रम ‘ऑनलाईन’ चालू झाले होते. त्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोक या उपक्रमात जोडले गेले. या माध्यमातून मार्गदर्शन मिळवून ‘सनातन प्रभात’चे वाचक आणि विज्ञापनदाते, तसेच सनातनचे हितचिंतक साधना करू लागले. एकंदरीतच हा काळ साधकांच्या साधनेसाठी, तसेच सनातनच्या कार्यवृद्धीसाठी पर्वणीच ठरला आहे.

‘गेल्या ४ वर्षांच्या काळात सनातनच्या कार्याने घेतलेली गरुडझेप’, ही केवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा आहे. ‘सनातनच्या धर्मकार्याची वृद्धी कशी झाली ?’, याची माहिती लेखातून जाणून घेऊया.

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘कोरोनाच्या काळात साधकांना व्यष्टी साधनेची घडी बसवता येणे, प्रत्येक जिल्ह्यात चालू झालेले ‘ऑनलाईन साधना सत्संग’, श्रेणीनिहाय साधना सत्संग आणि कोरोना काळात विविध वर्गांसाठी ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’, या विषयावरील ऑनलाईन प्रवचन’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज लेखाचा पुढचा भाग देत आहोत.

(भाग ३)  

भाग २ येथे वाचा – https://sanatanprabhat.org/marathi/836270.html

६. सनातनच्या ग्रंथांचे वितरण करणार्‍या ‘ज्ञानशक्ती अभियाना’ला मिळालेला उदंड प्रतिसाद 

कोरोना महामारीच्या काळात सनातनच्या ग्रंथांचे वितरण पूर्णतः थांबलेले होते. सनातनच्या ग्रंथवितरणातून होणार्‍या अध्यात्मप्रसाराला नवसंजीवनी देण्यासाठी सनातन संस्थेने जानेवारी २०२२ मध्ये ‘ज्ञानशक्ती अभियान’ आयोजित केले. या अंतर्गत ‘विविध शाळा-महाविद्यालये, सार्वजनिक वाचनालये, सरकारी कार्यालयातील वाचनालये इत्यादींना संपर्क करणे, आमदार-खासदार निधीतून ग्रंथांच्या वितरणाची प्रक्रिया करणे, कोरोना महामारी काळात नव्याने जोडल्या गेलेल्या जिज्ञासूंपर्यंत सनातनचे ग्रंथ पोचवणे’, असे विविध उपक्रम राबवण्यात आले. प्रथम हा प्रयोग कर्नाटक राज्यात निवडक ग्रंथांच्या संदर्भात करण्यात आला. त्यानंतर हे अभियान संपूर्ण भारतात आणि सर्व भाषिक ग्रंथांसाठी आयोजित करण्यात आले. या अभियानाला ‘न भूतो न भविष्यति ।’, असा प्रतिसाद मिळाला. या अभियानामुळे आज उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांतील सरकारी वाचनालयांत सनातनचे ग्रंथ उपलब्ध झाले आहेत.

७. दानशूर मंडळींना धर्मकार्यासाठी दान करण्यास उद्युक्त करणारे ‘धर्मदान अभियान’

कोरोना महामारीच्या काळात अनेक दानशूर मंडळींनी सामाजिक कार्यार्थ दानधर्म केला होता. कोरोनाच्या आपत्तीमुळे सनातनच्या आश्रमांमध्ये आपत्कालीन उपचारांसाठी आवश्यक उपकरणे, आपत्काळासाठी लागणार्‍या आवश्यक वस्तू, तसेच धर्मकार्यासाठी आवश्यक सामुग्री यांची आवश्यकता निर्माण झाली. यासाठी सनातन संस्थेने वर्ष २०२२ मध्ये ‘मकारसंक्रात ते रथसप्तमी’, या काळात सर्वप्रथम ‘धर्मदान अभियान’ आयोजित केले. या अभियानात अनेक दानशूर मंडळींनी यथाशक्ती सहभाग नोंदवला. या अभियानामुळे आश्रमाला लागणार्‍या आपत्कालीन उपकरणांची पूर्तता झाली. या अभियानाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन वर्ष २०२३ आणि वर्ष २०२४ या वर्षी ‘धर्मदान अभियान’ आयोजित करण्यात आले अन् समाजातील अनेक दानशूर मंडळींनी धर्मकार्यार्थ वस्तू, अन्नधान्य आदी स्वरूपात अर्पण सनातनच्या व्यापक धर्मकार्यात सहभाग नोंदवला.

८. सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या काळात चालू झालेले नवीन उपक्रम

२२.३.२०२४ या दिवशी सनातन संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाली. या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने सनातन संस्थेने काही नवीन उपक्रमांना प्रारंभ केला आहे. या उपक्रमांना अल्पावधीत मिळालेला प्रतिसाद गुरुकार्य विहंगम गतीने वाढत असल्याची पावती आहे.

८ अ. बालकांसाठी ‘बालसंस्कारवर्ग’ आणि किशोरवयीन मुलांसाठी ‘सुसंस्कारवर्ग’ : ‘सर्व वयोगटांत साधनेचा प्रसार करता यावा’, या उद्देशाने एप्रिलमध्ये गुढीपाढव्याच्या शुभमुहूर्तावर बालकांसाठी (वयोगट ६ ते १० वर्षे) ‘बालसंस्कारवर्ग’ आणि किशोरवयातील मुलांसाठी (वयोगट ११ ते १५ वर्षे) ‘सुसंस्कारवर्ग’ हे दोन उपक्रम चालू करण्यात आले. ‘सत्संगातून नव्याने क्रियाशील होऊ शकणार्‍या साधकांना सेवेची संधी मिळावी, तसेच पुढे जाऊन त्यांची सत्संग घेण्याची सिद्धता व्हावी’, या उद्देशाने हे दोन्ही संस्कारवर्ग घेण्याचे दायित्व नवीन साधकांना देण्यात आले. नवीन साधकांच्या माध्यमातून सध्या १३४ बालसंस्कार वर्ग आणि २७ सुसंस्कारवर्ग चालू आहेत. या वर्गांचे वैशिष्ट्य, म्हणजे बालकांचे पालकही संस्कारवर्गाला येतात. पालकांमध्ये साधनेविषयी जिज्ञासा निर्माण झाल्याने तेही नियमित साधना सत्संगाला जोडत आहेत. विविध जिल्ह्यांत प्रगल्भता असलेल्या अन् ‘दैवी बालक’ म्हणून संस्थेने घोषित केलेले बालक आणि किशोरवयीन मुले यांना या उपक्रमामुळे साधनेची दिशा मिळत आहे.

८ आ. युवकांसाठी ‘युवा साधना सत्संग’ : १६ ते २२ वर्षे या वयोगटातील साधना करण्याची इच्छा असलेले आणि संस्थेच्या विविध उपक्रमांतून जोडले गेलेले युवक, साधकांची मुले, तसेच संस्थेशी जोडले गेलेले अर्पणदाते, विज्ञापनदाते, हिंदुत्वनिष्ठ, ‘सनातन प्रभात’चे वाचक आदींच्या तरुण मुलांसाठी हा सत्संग मे मासात ‘अक्षय्य तृतीये’पासून चालू करण्यात आला आहे. सध्या भारतभरात ४० ठिकाणी युवा सत्संग चालू आहेत. या सत्संगाचे वैशिष्ट्य, म्हणजे सनातनचे युवा साधकच हा सत्संग घेतात आणि ‘हा सत्संग कसा घ्यायचा ?’, याविषयीचे अभ्यासवर्गही युवा साधकच घेत आहेत.

९. हिंदूसंघटनाच्या उद्देशाने  ‘हिंदू एकता दिंड्यां’चे आयोजन

९ अ. अनेक राज्यांत दिंडीचे आयोजन करून त्यात सहस्रोंच्या संख्येने लोक सहभागी होणे आणि अनेक संघटनांशी जवळीक होऊन सर्व जण हितचिंतक होणे : वर्ष २०२२ मध्ये सांप्रदायिक संघटनाच्या ऐक्याचा उद्देश ठेवून, तसेच ‘हिंदूंचे शक्तीप्रदर्शन व्हावे’, या दृष्टीने महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, देहली, हरियाणा आणि तेलंगाणा या राज्यात सनातन संस्थेच्या वतीने हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांतील दिंड्यांमध्ये सहस्रोंच्या संख्येने लोक सहभागी झाले, तर उत्तरप्रदेश, देहली, हरियाणा, मध्यप्रदेश, तेलंगाणा या राज्यांत शेकडोंच्या उपस्थितीत हिंदू सहभागी झाले. या दिंड्यांमुळे अनेक धार्मिक संस्था आणि संघटना यांच्याशी जवळीक होऊन ते सर्व जण संस्थेच्या हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्याचे हितचिंतक झाले.

९ आ. ‘सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त पुणे शहरात आयोजित ‘सनातन गौरव दिंडी’मध्ये ९५ हून अधिक पथके आणि ९ सहस्रांहून अधिक लोक सहभागी होणे’, हा समाजाचा सनातनवरील विश्वासच असणे : सनातन संस्थेच्या कार्याला २५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे देशभरात रौप्य महोत्सवानिमित्त कार्यक्रम झाले. पुणे शहरात या वर्षी ‘सनातन गौरव दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. त्याला समाजातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. यात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, वारकरी संप्रदाय, भजनी मंडळे, सांस्कृतिक संस्था आदी संस्थांच्या ९५ हून अधिक पथकांचा सहभाग होता. पुण्यातील ९ सहस्रांहून अधिक लोक यात सहभागी झाले होते.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात स्थानिक माध्यमांनी सातत्याने सनातन संस्थेची अपकीर्ती करूनही या दिंडीला एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून समाजाने एक प्रकारे सनातन संस्थेवरील विश्वासच प्रकट केला.

१०. सनातनच्या अंतर्गत शिबिरांमध्ये वाढ होणे : आरंभीच्या काळात दायित्व सांभाळणार्‍या साधकांचे राष्ट्रीय स्तरावर साधना शिबिर प्रतिवर्षी गोव्यात होत होते. कोरोना महामारीनंतर, म्हणजे वर्ष २०२२ पासून प्रत्येक वर्षी राष्ट्रीय स्तरावर होणार्‍या शिबिरांतील साधकांच्या संख्येत वाढ होत आहे. राष्ट्रीय स्तरावर होणार्‍या युवा साधना शिबिरांमध्ये येणार्‍या युवकांची संख्या वाढली आहे.

१० अ. १० दिवसांच्या ‘आध्यात्मिक व्यक्तीमत्त्व विकास शिबिरा’ला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  ऑगस्ट २०२४ मध्ये नव्याने जोडल्या गेलेल्या साधकांना ‘चांगला साधक कसे बनावे ?’, याचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रथमच १० दिवसांचे ‘आध्यात्मिक व्यक्तीमत्त्व विकास शिबिर (साधकत्व विकास शिबिर)’ आयोजित करण्यात आले. ‘१० दिवसांचे शिबिर’, हा एक प्रयोग असल्याने ‘किती जण सुट्टी काढून येतील ?’, असे वाटत असतांना ४०० नवीन साधकांची या शिबिरासाठी नोंदणी झाली. यांपैकी ९० जण पहिल्या शिबिरासाठी प्रत्यक्ष सहभागी झाले आहेत.

१० आ. समाजातील विविध वर्गांसाठी ‘साधना शिबिरां’चे आयोजन केले जाणे : संस्थेचे कार्य जसजसे वाढत आहे, तसतसे विविध समुदाय किंवा समाजातील घटक कार्याशी जोडले जात आहेत. त्यामुळे वर्ष २०२४ – २५ मध्ये मंदिर विश्वस्त, अधिवक्ता, सीए (सनदी लेखापाल), उद्योगपती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने रामनाथी आश्रमात साधना शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे, तसेच गावागावांत संस्थेचे कार्य सांभाळू शकतील, अशा धर्मप्रेमी युवकांसाठीही सनातनच्या आश्रमात साधना शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. अशा प्रकारची विशिष्ट समुदायासाठी किंवा समाजघटकासाठी होणारी ही शिबिरे सनातन संस्थेच्या इतिहासात प्रथमच होणार आहेत.

११. ‘काळानुसार सनातनच्या साधक-निर्मिती प्रक्रिया गतीमान होणे’, हे गुरुकृपायोगाचे श्रेष्ठत्व !

सनातन संस्था ही समाजाची आध्यात्मिक सेवा करणारी स्वयंसेवी संस्था आहे. सनातन संस्थेची समाजसेवा ही आध्यात्मिक स्वरूपाची आहे. ‘लोकांचे जीवन आनंदी बनवणे, त्यांना तणावमुक्त करणे, व्यसनमुक्त करणे, त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास करणे आणि सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे त्यांची आध्यात्मिक उन्नती करून घेणे’, असे समाजाचे आध्यात्मिक कल्याण करणारे कार्य सनातन संस्था करते. याद्वारे लोकांना आध्यात्मिक अनुभूती येतात, तसेच त्यांचे जीवन आनंदमय होते. सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे पुढे त्यांची आध्यात्मिक उन्नती होते. हे सारे अनुभव आध्यात्मिक असल्याने सनातन संस्थेचा २५ वर्षांच्या प्रवासाचे मूल्यमापन भौतिक कार्याच्या दृष्टीने करणे कठीण आहे, तरीही ‘वर्षभर कार्य केल्याने किती जण खरे साधक बनतात ?’, याचा अभ्यास संस्था म्हणून करणे आवश्यक वाटल्याने संस्थेने या वर्षी म्हणजे ऑगस्ट २०२३ ते मे २०२४ या ९ मासांच्या अवधीत ‘प्रत्येक जिल्ह्यांत आणि प्रत्येक उपक्रमांतून किती साधक बनले ? किती साधक बनण्याच्या मार्गावर आहेत ? आणि किती जण प्राथमिक अवस्थेतील साधक आहेत ?’, हे अभ्यासासाठी कार्यपद्धत विकसित केली. त्यामुळे या ९ मासांच्या अवधीतील खरी आकडेवारी कळू शकली. ती पुढे दिली आहे.

एकूण साधक : ३२९७

‘काळानुसार सनातनची ‘साधक-निर्मिती प्रक्रिया’ गतीमान होत आहे’, हे केवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी शिकवलेल्या गुरुकृपायोगाचे श्रेष्ठत्व आहे’, याची प्रत्यक्ष प्रचीती साधक घेत आहेत !

१२. ‘सनातनच्या व्यापक धर्मकार्याची विहंगम गतीने होणारी गरुडझेप’, हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा द्रष्‍टेपणा !

कोरोना महामारीच्या काळापासून आजपर्यंत पाहिले, तर ‘येणार्‍या काळात सिद्ध साधक मिळणार’, या सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या द्रष्टेपणाची प्रचीती येते. आज सर्वच उपक्रमांतून जोडले जाणारे जिज्ञासू साधक बनत आहेत आणि दायित्व घेऊन सेवा करत आहेत. सच्चिदानंद  परब्रह्म गुरुदेवांनी सांगितले होते, ‘‘ऑनलाईन सेवा या आकाशतत्त्वाशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यांचे व्यापक स्वरूप लवकरच दिसून येईल.’’ आज गुरुवाणीची प्रचीती साधकांना अक्षरशः येत आहे. या आपत्काळात वेग, गुणवत्ता आणि परिणामकारकता यांनी प्रसाराचा उच्चांक गाठला. प्रसार इतक्या वेगाने झाला की, ‘गरुडझेप’ किंवा ‘विहंगम गती’ म्हणजे काय ?’, ते प्रसारातील साधकांना समजले. साधकांना या प्रतिकूल परिस्थितीत ‘मनोवेग’ किंवा ‘वायूवेग’ पहायला मिळाला. ‘सनातनच्या व्यापक धर्मकार्याने विहंगम गतीने घेतलेली गरुडझेप’, ही केवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संकल्प, कृपा आणि आशीर्वाद यांचे फलित आहे’, याबद्दल आम्ही सनातनचे सर्व साधक श्री गुरुचरणी नतमस्तक आहोत !’

(समाप्त)

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी)

कोरोनाचा आपत्काळ आणि त्यानंतरचा काळ, म्हणजे सनातन संस्थेच्या ईश्वरी कार्यासाठीचा समृद्धीचा काळ !

‘कोरोना महामारीचा आपत्काळ हा मानवीय, आर्थिक आणि सामाजिक हानी करणारा काळ होता. अजूनही जग या आपत्तीतून सावरलेले नाही ! परंतु कोरोना महामारीच्या आपत्तीचा काळ आणि त्यानंतरच काळ, हा सनातन संस्थेच्या ईश्वरी कार्यासाठीचा समृद्धीचा काळ ठरला आहे. या काळात सनातनची कार्यात्मक वृद्धी झाली. साधकांच्या व्यष्टी साधनेमध्ये वृद्धी होऊन त्यांच्या व्यष्टी साधनेची घडी बसली. संस्थेच्या कार्यातून नवसाधकांची निर्मिती झाली. त्यामुळे आता यापुढे सनातन संस्थेच्या धर्मकार्याची रचनात्मक घडी बसवण्यासाठी जुलै २०२४ मध्ये देशभरात सर्वत्र ‘संघटनात्मक रचना’ हे अंतर्गत अभियान आयोजित करण्याचे सुनिश्चित करण्यात आले. ‘संस्थेच्या धर्मकार्याची सुरचना करणे’, हे धर्मसंस्थापनेच्या कार्यासम आहे’, याची प्रचीती साधक आता घेऊ लागले आहेत. ‘पिंडी ते ब्रह्मांडी’, या सिद्धांतानुसार ईश्वरी राज्यासाठी समर्पित सनातन संस्थेच्या अंतर्गत रामराज्यासम रचना झाली, तर भविष्यात भारतामध्ये रामराज्यासम हिंदु राष्ट्राची स्थापना होईल’, अशी श्रद्धा ठेवून सनातन संस्थेचे साधक ‘संघटनात्मक रचना’ या अभियानात सहभागी झाले आहेत. हे संघटनात्मक रचना अभियान, म्हणजे साधकांना व्यष्टी जीवनात आध्यात्मिक उन्नती आणि समष्टी जीवनात ईश्वरी राज्याची स्थापना यांचे ध्येय देणार्‍या सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी केलेली अमोल कृपा आहे !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ