नाशिकमध्ये विनाकारण रस्त्यावर आणि चौकात गर्दी करण्यार्‍यांवर पोलिसांची ड्रोन कॅमेर्‍याच्या साहाय्याने टेहळणी

नाशिक – कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात संचारबंदीचे आदेश लागू असतांनाही येथील जुने नाशिक, वडळा, फुलेनगर झोपडपट्टी परिसर अशा अनेक ठिकाणी नागरिक घराबाहेर पडून विनाकारण रस्त्यावर आणि चौकात गर्दी करत आहेत. अशा परिसरावर लक्ष ठेवून नियंत्रण राखण्यासाठी नाशिक शहराचे पोलीस ड्रोन कॅमेर्‍याच्या साहाय्याने संपूर्ण शहरावर लक्ष ठेवणार आहेत. त्याचप्रमाणे गर्दी करणार्‍या नागरिकांना संचारबंदीविषयी सूचना देऊन त्यांच्यावर कारवाईही करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांनी माध्यमांना दिली.

संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सध्या शहरात ८६ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून केवळ अत्यावश्यक आरोग्यसेवा आणि जीवनावश्यक मालाची वाहतूक करणार्‍या वाहनांना अनुमती देण्यात आल्याचेही पोलीस आयुक्तांनी सांगितले.