रामनाथी आश्रमात येतांनाच्या प्रवासात नामजप करतांना सूक्ष्मातून भगवान शिवाचे दर्शन होणे आणि रामनाथी आश्रमात पोचल्यावर तेथील ध्यानमंदिरातील एका संतांनी नुकत्याच पाठवलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेतल्यावर प्रवासात शिवाचे दर्शन होण्याचा उलगडा होणे
‘१६.६.२०१८ या दिवशी मी आगगाडीने रामनाथी आश्रमात येत होते. त्या वेळी प्रवासात नामजप करत असतांना मला पुढील दृश्य दिसले, ‘मी एका जिन्यावरून कुठेतरी उंच उंच जात आहे आणि माझ्यापुढे भगवान शिव आहे. नंतर मी लहान मुलगी झाले आणि भगवान शिवाने मला कडेवर उचलून घेऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे नेऊन त्यांच्या चरणांवर ठेवले.’ खरेतर त्या वेळी मी भगवान शिवाच्या संदर्भात काहीच विचार करत नव्हते, तसेच त्याचा नामजपही करत नव्हते, तरीही ‘मला भगवान शिवाचे दर्शन का झाले ?’, याचे आश्चर्य वाटले.
रामनाथी आश्रमात पोचल्यावर दुसर्या दिवशी आश्रम पहातांना मी ध्यानमंदिरात गेले. तेथील शिवाचा मुखवटा आणि शिवलिंग दाखवतांना एका साधिकेने सांगितले, ‘‘२ – ३ दिवसांपूर्वीच एका संतांनी साधकांच्या रक्षणासाठी हा मुखवटा आणि शिवलिंग आश्रमात पाठवले आहे.’’ सायंकाळी मी ध्यानमंदिरात बसून नामजप करत असतांना माझे डोळे आपोआप उघडले आणि मला ते शिवलिंग दिसले. त्या वेळी मला प्रवासात दिसलेल्या दृश्याची आठवण झाली.
या अनुभूतीच्या माध्यमातून ईश्वरानेच मला ‘तो प्रत्येक क्षणी माझ्या मागे-पुढेच आहे आणि त्याचे सर्व साधकांवर लक्ष आहे’, याची जाणीव करून दिली. त्यानंतर माझ्याकडून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी आपोआपच कृतज्ञता व्यक्त झाली.’
– कु. पूनम किंगर, फरीदाबाद, उत्तरप्रदेश. (२६.६.२०१८)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.