असा झाला श्री भवानीदेवीच्या आगमनाचा अविस्मरणीय सोहळा !

श्री भवानीदेवीच्या स्वागतार्थ भक्तीरसाने सज्ज जाहला रामनाथी येथील सनातनचा आश्रम !

सृष्टिस्थितिविनाशानां शक्तिभूते सनातनि ।
गुणाश्रये गुणमये नारायणि नमोऽस्तु ते ॥

‘श्री भवानीदेवीचे शुभागमन होणार’, या आनंदात आश्रमातील साधक-साधिकांनी पारंपरिक वेशभूषा केली होती. ‘छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी आध्यात्मिक बळ देणारी श्री भवानीदेवी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याला आध्यात्मिक बळ देण्यासाठी आणि साधकांचे आध्यात्मिक त्रास दूर करण्यासाठी प्रत्यक्ष आश्रमात येत आहे’, असा साधकांचा भाव होता. आश्रमात मधे मधे लावण्यात आलेल्या देवीच्या भक्तीगीतांमुळे देवीप्रती शरणागतभाव अन् कृतज्ञताभाव जागृत होत होता. साधक जणू भक्तीभावाच्या अलंकारांनी सजले होते. सर्वजण भगवतीच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होते. आश्रमातील फलकावर देवीप्रती शरणागतभाव वृद्धींगत करणारे लिखाण लिहिण्यात आले होते. प्रवेशद्वारासह आश्रम परिसरातील रस्त्यांवर रांगोळ्या आणि ठिकठिकाणी फुलांची वैशिष्ट्यपूर्ण रचना करण्यात आली होती.

देवीच्या स्वागतासाठी नमस्काराच्या मुद्रेत उभे असलेले संत आणि साधक, तसेच मार्गावर अंथरलेल्या पायघड्या आणि त्याच्यावर रचलेली फुले

देवीच्या मूर्तीसमक्ष आणि आश्रमाच्या परिसरात प्रज्वलित दिव्यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना केली होती. दिव्यांच्या मंगल प्रकाशात देवीची मूर्ती अधिक तेजस्वी दिसत होती. देवीचे आगमन झाल्यानंतर आश्रमातील वातावरण मंगलमय अन् चैतन्यमय झाले होते. देवीच्या मूर्तीमध्ये शक्तीस्वरूपिणी जगदंबेचे तत्त्व जागृत झाल्याची अनुभूती अनेक साधकांना आली.’

१. ‘१९.१.२०२० या दिवशी श्री भवानीदेवीच्या मूर्तीचे आश्रमात आगमन होत असतांना प्रवेशद्वारावर सनातनच्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. वैशाली राजहंस यांनी देवीची दृष्ट काढली. त्यानंतर ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ आणि ‘हर हर महादेव’ या जयघोषांत देवीचे आश्रमाच्या आवारात शुभागमन झाले. साक्षात् जगत्जननी श्री भवानीदेवीचे आगमन होतांना क्षात्रतेज, कृतज्ञता अन् शरणागती अशा विविध भक्तीरसांत उपस्थित साधक न्हाऊन निघाले. या वेळी वातावरणात दैवी चैतन्यशक्ती प्रक्षेपित झाल्याची अनुभूती अनेक साधकांना आली.

२. आश्रमाच्या आवारात देवीची मूर्ती आणल्यावर तिच्यावर साधकांकडून पुष्पवृष्टी करून शंखनाद करण्यात आला. ‘जणू आकाशातून देवताच आदिशक्ती श्री भवानीदेवीवर पुष्पवृष्टी करत आहेत’, असे या वेळी उपस्थित साधकांना जाणवले. हा मनोहारी क्षण साधकांनी अंतरी साठवला.

३. यानंतर देवीची मूर्ती वाहनातून उतरवण्यात आली. सनातनचे पुरोहित श्री. चैतन्य दीक्षित आणि श्री. ईशान जोशी यांनी शंखनाद केला अन् श्री. अमर जोशी यांनी मंत्रोच्चारण केले.

४. ‘प्रत्यक्ष देवीच्या चरणी पुष्पार्चना करत आहोत’, या आर्तभावाने देवीच्या स्वागताच्या वेळी संत आणि साधक यांनी केली पुष्पार्चना !

देवीच्या स्वागतासाठी मुख्य प्रवेशद्वारापासून काही अंतरापर्यंत फुलांनी सजवलेल्या पायघडीच्या दोन्ही बाजूला संत आणि साधक नमस्काराच्या मुद्रेत देवीच्या स्वागतासाठी उभे होते. देवीचे पायघडीवरून मार्गक्रमण होतांना संत आणि साधक यांनी ‘प्रत्यक्ष देवीच्या चरणी पुष्प अर्पण करत आहोत’, या आर्तभावाने तिच्या चरणी पुष्प अर्पण केले.

५. ‘सगुण रूपातील देवीच निर्गुण रूपातील श्री भवानीदेवीचे पूजन करत आहे’, याची अनुभूती साधकांनी घेणे

आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पटलावर देवीची मूर्ती ठेवण्यात आली होती. या वेळी सनातन पुरोहित पाठशाळेचे संचालक श्री. दामोदर वझेगुरुजी यांनी सांगितलेल्या मंत्रोच्चारांत सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी देवीचे पंचोपचार पूजन केले. देवीचे पूजन करतांना सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ अधिक तेजस्वी दिसत होत्या आणि ‘त्यांची पुष्कळ भावजागृती होत आहे’, हे साधकांनी अनुभवले. ‘जणू सगुण रूपातील देवीच (सद्गुरु (सौ.) बिंदाताई) निर्गुण रूपातील देवीचे (श्री भवानीदेवीचे) पूजन करत आहे, म्हणजेच प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनातील ‘निर्गुण संगे सगुण रंगे, अद्वैता द्वैता ठाव नाही’, या पंक्तीची अनुभूती घेत आहोत’, असे साधकांना या वेळी जाणवले.

६. आत्यंतिक शारीरिक त्रास होत असतांनाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्री भवानीदेवीचे दर्शन घेतले आणि पुष्प अर्पण केले. यानंतर प.पू. दास महाराज आणि त्यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी नाईक (माई) यांनी देवीचे दर्शन घेतले.

७. पूजनानंतर साधकांनी श्‍लोकाद्वारे देवीला शरणागतभावाने प्रार्थना केली.

८. देवीकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याच्या झोतामुळे तिच्यासमोर उभे राहिल्यानंतर सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना मागे ढकलल्याप्रमाणे होणे

आश्रमात देवीचे आगमन झाल्यानंतर स्वागतकक्षातील श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीच्या प्रतिमेजवळ देवीची मूर्ती ठेवण्यात आली. यानंतर आश्रमातील संत आणि साधक यांनी देवीचे भावपूर्ण दर्शन घेतले. या वेळी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना जाणवले की, देवीचे चैतन्य एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रक्षेपित होत आहे की, त्या चैतन्याच्या झोतामुळे देवीसमोर उभे राहिल्यानंतर मागे ढकलल्याप्रमाणे होत आहे.

९. श्री भवानीदेवीची मूर्ती आश्रमात ठेवल्यानंतर बालसंत पू. वामन राजंदेकर यांनी देवीला सर्व बाजूंनी ५ वेळा नमस्कार केला.

कृतज्ञता !

जी शक्ती चराचरात व्यापलेली आहे, ज्या शक्तीच्या योगे सारे विश्‍व संचलित होते, जिने हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांना आध्यात्मिक बळ दिले, ती श्री भवानीदेवी सनातनच्या आश्रमात विराजमान झाली. तिच्या आशीर्वादाने हिंदु राष्ट्र (ईश्‍वरी राज्य) स्थापनेतील आध्यात्मिक अडथळे आणि साधकांना होत असलेले आध्यात्मिक त्रास दूर होणार आहेत. त्यामुळे सनातन आश्रम आणि सनातन परिवार कृतार्थ झाला. सनातन परिवाराच्या वतीने भक्तवत्सल श्री भवानीदेवीच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’

श्री भवानीदेवीच्या तेजस्वी रूपाला वंदन करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले, तसेच समवेत छत्र, चामर, अब्दागीर आणि सेवेकरी

परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्री भवानीदेवीचे दर्शन घेत असतांना ‘प्रत्यक्ष शिवच शक्तीस्वरूपिणी श्री भवानीदेवीचे दर्शन घेत आहेत’, याची अनुभूती साधकांनी घेतली !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्री भवानीदेवीचे दर्शन घेतले आणि पुष्प अर्पण केले. त्यांनी देवीला भावपूर्णरित्या नमस्कार केला. त्यांची ही भावावस्था पाहून उपस्थित साधकांना श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीने सांगितलेल्या ‘परात्पर गुरु डॉक्टर शिवस्वरूप आहेत’, या वाक्याचे स्मरण झाले. ‘प्रत्यक्ष शिवच शक्तीस्वरूपिणी श्री भवानीदेवीचे दर्शन घेत आहेत’, असे साधकांना या वेळी जाणवले. साक्षात् शिवस्वरूप परात्पर गुरु आणि श्री भवानीदेवीची मूर्ती यांचे भावस्वरूप पाहून उपस्थित संत अन् साधक यांची भावजागृती होत होती. ईश्‍वरस्वरूप गुरुदेव आदिशक्ती श्री भवानीदेवीला वंदन करतांनाचा अलौकिक क्षण साधकांनी हृदयमंदिरी साठवला.

देवीचे आश्रमात आगमन होत असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले आणि प.पू. दास महाराज यांची भावजागृती होणे

देवीचे आश्रमात आगमन होतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भावजागृती होत असल्याचे उपस्थित साधकांनी अनुभवले, तसेच प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी नाईक (माई) यांचीही भावजागृती होत होती.

• या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक