भारताच्या गौरवशाली हिंदु इतिहासाला पुनरुज्जीवन देणारे डॉ. विक्रम संपत !

कर्नाटकातील बेंगळुरूस्थित डॉ. विक्रम संपत हे भारतीय लोकप्रिय इतिहासकार आणि लेखक आहेत. वर्ष २०२१ मध्ये त्यांची प्रसिद्ध ‘रॉयल हिस्टॉरिकल सोसायटी’चे ‘फेलो’ म्हणून निवड झाली. या सोसायटीचे ‘फेलो’ होणे, हा मान इंग्लंडमध्ये इतिहास क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या आणि उच्च स्तराचे संशोधन करणार्‍या व्यक्तींना दिला जातो. त्यांना साहित्य अकादमीचा पहिला इंग्रजी ‘युवा पुरस्कार’ मिळाला आहे. त्यांच्या ‘माय नेम इज गौहर जान : द लाईफ अँड टाइम्स ऑफ अ म्युझिशियन’ या पुस्तकाला न्यूयॉर्कमधील ‘ए.आर्.एस्.सी. इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन हिस्टॉरिकल रिसर्च’ हा पुरस्कार मिळाला. हे पुस्तक लिलेट दुबे यांच्या ‘गौहर’ नाटकातून रूपांतरित केले आहे.

डॉ. विक्रम संपत

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्‍या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल ! – संपादक

१. डॉ. विक्रम संपत यांनी केलेले संशोधन, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था आणि अन्य माहिती

वर्ष २०१५ मध्ये राष्ट्रपती भवनातील ‘निवासी लेखक’ (राईटर इन रेसिडेन्स) या प्रकल्पासाठी निवड झालेल्या ४ लेखकांमध्ये डॉ. विक्रम संपत यांचा समावेश होता. त्यांनी ऑस्ट्रेलियातील क्विन्सलँड विद्यापिठातून ‘इतिहास आणि संगीत’ या विषयांमध्ये ‘डॉक्टरेट’ पदवी प्राप्त केली आहे. ते नवी देहलीतील ‘नेहरू मेमोरियल लायब्ररी’मध्ये वरिष्ठ संशोधन ‘फेलो’ होते. यासमवेतच ‘ॲस्पेन ग्लोबल लिडरशिप नेटवर्क’, ‘इसनेहॉवर ग्लोबल फेलो’ (Eisenhower Global Fellow) आणि ‘Wissenschaftskolleg zu Berlin’ येथेही ते ‘फेलो’ होते.

शिवासाठी प्रतीक्षा : वाराणसीच्या ‘ज्ञानवापी’चे सत्यदर्शन

वर्ष २०२४ मध्ये ‘Waiting for Shiva : Unearthing the Truth of Kashi’s Gyanvapi’ हे पुस्तक प्रकाशित झाले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी ‘पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय सभागृहा’त याचे प्रकाशन केले. हे पुस्तक इतिहास, धर्म, पुरातत्व आणि कायदा यांच्या दृष्टीकोनातून हिंदूंनी केलेल्या पुनर्संपादनाच्या प्रयत्नांचे विश्लेषण करते. डॉ. संपत यांनी हिंदूंची शिवावरील भक्तीची तुलना मंदिरामध्ये ‘नंदी शिवाची दर्शनासाठी वाट पहात आहे’, याच्याशी केली आहे. अशा प्रकारे त्यांनी भारताचा गौरवशाली इतिहास लोकांसमोर आणला.

सध्या ते ऑस्ट्रेलियातील ‘मोनाश विद्यापिठा’मध्ये ‘ॲडजंट सिनियर फेलो’ आहेत. त्यांनी ‘आर्काइव्ह ऑफ इंडियन म्युझिक’  आणि ‘फाऊंडेशन फॉर इंडियन हिस्टॉरिकल अँड कल्चर रिसर्च’ या संस्थांची स्थापना केली आहे, ज्या भारतीय इतिहासाचे नवीन अध्ययन अन् संशोधन करतात. यासह त्यांनी ‘अर्थ : ए कल्चर फेस्ट’ या महोत्सवाचे आयोजनही केले आहे. ते ’बेंगळुरू साहित्य महोत्सवा’चे संस्थापकही आहेत.

२. डॉ. विक्रम संपत यांचे महत्त्वपूर्ण लेखन

अ. डॉ. विक्रम संपत यांची प्रमुख पुस्तके : ‘Splendours of Royal Mysore : The Untold Story of the Wodeyars’, ‘Voice of the Veena : S. Balachander’, ‘Women of the Records’, ‘Indian Classical Music and the Gramophone’. त्यांचे दोन भागांचे ‘Savarkar : Echoes from a Forgotten Past’ आणि ‘Savarkar: A Contested Legacy’, तसेच अलीकडील Bravehearts of Bharat: Vignettes from Indian History’ आणि ‘Waiting for Shiva : Unearthing the Truth of Kashi’s Gyanvapi’ ही देशभरात सर्वाधिक विक्री झालेली प्रसिद्ध पुस्तके आहेत.

आ. गौहर जान यांच्यावरील जीवनचरित्र लिहिणारे आणि भारतीय परंपरेचे रक्षक डॉ. विक्रम संपत : वर्ष २०१२ मध्ये डॉ. विक्रम संपत यांनी भारताच्या ‘पहिल्या शास्त्रीय गायिका’ आणि ‘ग्रामोफोन रेकॉर्डिंग’ करणारी ‘पहिली महिला गायिका’ गौहर जान यांच्या जीवनावरील चरित्र प्रकाशित केले.

डॉ. विक्रम संपत हे केवळ इतिहासकारच नाहीत, तर ते भारतीय परंपरेचे रक्षकही आहेत. त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीत आणि परंपरा यांवर अनेक लेख लिहिले आहेत. ‘My Name is Gauhar Jaan !’ या पुस्तकात त्यांनी गौहर जान यांच्या जीवनासह भारताच्या संगीत परंपरेला पुनरुज्जीवित करण्याची आवश्यकता प्रतिपादित केली आहे. ‘Voice of the Veena : S. Balachander – A Biography’ या पुस्तकातून त्यांनी शास्त्रीय संगीत आणि वीणा परंपरा यांचा सांस्कृतिक आदर वाढवला आहे. भारतीय कला, संगीत आणि परंपरा यांच्या संरक्षणासाठी त्यांनी सांस्कृतिक चेतना वाढवणे अन् अध्ययन यांना प्रोत्साहन दिले आहे.

इ. डिजिटल संगीत संग्रह : ‘गौहर जान’ या पुस्तकाच्या संशोधनाच्या वेळी डॉ. संपत यांनी प्राचीन ग्रामोफोन रेकॉर्ड्सचे डिजिटलायझेशन करण्यासाठी आणि ते जनतेसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यासाठी ‘मणीपाल विद्यापिठा’समवेत मिळून एका खासगी अन् लाभांशविरहित संस्थेची स्थापना केली. डॉ. संपत यांनी हा संग्रह वर्ष २०१५ मध्ये ‘इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स’ संस्थेला दान केला. वर्ष २०१३ पासून हा संग्रह ‘साऊंडक्लाऊड’ या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध आहे. वर्ष २०२१ पर्यंत १५,००० रेकॉर्ड्सपैकी ७,००० रेकॉर्ड्सचे डिजिटलायझेशन झाले आहे.

‘वीर सावरकर’ यांच्याविषयीच्या पुस्तकाची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देतांना डॉ. विक्रम संपत

३. राष्ट्र आणि हिंदु धर्म यांसाठी योगदान

डॉ. विक्रम संपत हे भारताचे प्रमुख इतिहासकार, लेखक आणि संशोधक म्हणून देशाचे राष्ट्रीयत्व अन् हिंदु परंपरा यांसाठी अद्वितीय, तसेच असाधारण योगदान देत आहेत. इतिहासाचा निष्पक्षपणे अभ्यास करणे आणि हिंदु संस्कृतीचे खरे चित्र लोकांसमोर आणणे, तसेच हिंदु राजांच्या पराक्रमाचा खरा इतिहास सांगणे, हे त्यांचे प्रमुख कार्य आहे.

४. वीर सावरकर यांचे ऐतिहासिक पुनर्मूल्यांकन

विक्रम संपत यांनी ‘Savarkar: Echoes from a Forgotten Past (1883-1924)’ आणि ‘Savarkar : A Contested Legacy (1924-1966)’ हे दोन ग्रंथ लिहिले आहेत. या ग्रंथांमध्ये वीर सावरकर यांचे हिंदुत्व, तत्त्वज्ञान, स्वातंत्र्यलढा आणि सामाजिक समानता यांवरील कार्याचा सखोल अभ्यास आहे. ‘पाश्चात्त्य इतिहासकारांनी सावरकर यांच्या ‘हिंदुत्व’ तत्त्वाचा चुकीचा अर्थ लावला आहे’, हे मत मांडून स्वातंत्र्यलढ्यात वीर सावरकर यांच्या योगदानाचा खरा अर्थ लोकांपर्यंत पोचवण्याचे महान कार्य डॉ. संपत यांनी केले आहे.

५. इतिहासाचा खरा अर्थ पोचवण्याचे कार्य

भारताच्या स्वातंत्र्यानंतर साम्यवादी विचारसरणीच्या काही इतिहासकारांनी देशाचा खरा इतिहास पालटण्याचा प्रयत्न केला होता. डॉ. विक्रम संपत यांनी इतिहासातील ही विकृती सुधारण्याचे महान कार्य केले आहे. उदाहरणार्थ टिपू सुलतानला साम्यवादी विचारसरणीच्या इतिहासकारांनी ‘धर्मसहिष्णू, मंदिरांना साहाय्य करणारा, आदर्श राजा, मैसूरचा वाघ आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात लढणारा’, असे त्याचे उदात्तीकरण करून त्याचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला; पण डॉ. संपत यांनी टिपू सुलतानाचा खरा इतिहास, त्याने उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची माहिती, असा खरा इतिहास लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

‘भारताचा इतिहास अंधश्रद्धेविना, सत्य आधारित आणि भारतीय दृष्टीकोनातून पाहिला पाहिजे’, या विचरण विचारांना त्यांच्या लेखणीने प्रेरणा दिली आहे. यामुळे इतिहास पाश्चात्त्य किंवा साम्यवादी दृष्टीकोनातून न पहाता भारतीय परंपरा आणि खरी ऐतिहासिक माहिती लोकांपर्यंत पोचण्यास साहाय्य झाले आहे.

भारताच्या पराक्रमी शौर्याचा इतिहास जगासमोर उघड करणारे डॉ. विक्रम संपत !

‘टिपू सुलतान’पुस्तकाचे प्रकाशन करतांना (मध्यभागी) परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर आणि उजवीकडे विक्रम संपत

डॉ. विक्रम संपत यांनी भारतीय राष्ट्रप्रेम, हिंदुत्व आणि सांस्कृतिक परंपरा यांच्या पुनरावलोकनासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सावरकर यांच्यावरील अभ्यासातून ‘हिंदु राष्ट्रवादा’च्या संकल्पनेला प्रोत्साहन मिळाले. टिपू सुलतानवरील खर्‍या अभ्यासातून ‘इतिहासाचे शुद्धीकरण’ करण्याचा प्रयत्न झाला. सांस्कृतिक आणि संगीत परंपरा यांवरील अभ्यासातून ‘भारतीय कलेचा आदर’ वाढवण्याचे कार्य झाले. पाश्चात्त्य आणि साम्यवादी विचारसरणीच्या इतिहासातील चुकांविरुद्ध त्यांनी जोरदार युक्तीवाद, तसेच खंडण करून हिंदु धर्माच्या संवर्धनाचा विचार केला. यामुळे डॉ. विक्रम संपत हे राष्ट्र आणि हिंदु धर्मासाठी अतुलनीय योगदान देणारे महत्त्वाचे इतिहासकार आहेत.

अशा प्रकारे भारताच्या इतिहासाचे पुनरुत्थान करण्याचे कार्य करत असतांना अनेक विदेशी इतिहासकार जसे की, ऑड्रे ट्रुश्के, रोहित चोप्रा आणि अनन्या चक्रवर्ती यांनी ‘रॉयल सोसायटी’ला पत्र लिहिले. त्यांनी डॉ. संपत यांच्यावर ‘प्लेगियरिसं’ (साहित्यिक चोरीचा) आरोप केला आणि त्यांच्या सदस्यत्वाची चौकशी करण्याची मागणी केली. परिणामी डॉ. विक्रम संपत यांना अशा खोट्या आरोपांचा सामना करावा लागला. या सर्वांना न जुमानता डॉ. विक्रम संपत यांनी स्वतःचे कार्य पुढे चालू ठेवले, हे कौतुकास्पद आहे. त्यांनी आधुनिक काळात अत्यंत प्रामाणिकपणे भारताचा गौरवशाली इतिहास लिहिला आणि भारताच्या पराक्रमी शौर्याचा इतिहास जगासमोर उघड केला, ज्यामुळे देशाचा इतिहास जसाच्या तसा पुढील पिढीपर्यंत पोचवण्याचे महान कार्य होत आहे. या माध्यमातून त्यांनी भारताच्या इतिहासाला नवचैतन्य दिले आहे. यासाठी प्रत्येकाने डॉ. विक्रम संपत यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे अध्ययन करणे आणि सरकारने ते शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करणे, ही आजच्या काळाची आवश्यकता आहे.

६. पाश्चात्त्य आणि साम्यवादी विचारसरणीच्या संकल्पनांविरुद्ध युक्तीवाद

पाश्चात्त्य इतिहासकारांनी भारताच्या इतिहासाला त्यांच्या दृष्टीकोनातून मांडले आहे. डॉ. विक्रम संपत यांनी त्यांच्या असत्य भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले आणि भारतीय परंपरेच्या पुनरावलोकनाचा ते आग्रह धरतात. त्यांनी हैद्राबादचे निजाम आणि ब्रिटीश प्रशासन यांच्यावरही सखोल अभ्यास केला आहे, ज्यामुळे भारतियांचे शोषण अन् हिंदूंवर झालेल्या अत्याचार यांचे पुनर्मूल्यांकन झाले आहे. यामुळे भारतीय परंपरेच्या महत्त्वपूर्ण अभ्यासाला आणि खरी ऐतिहासिक माहिती मिळवण्यास नवीन विचारांना प्रेरणा मिळाली आहे.

७. ‘बौल’ समुदायावरील चित्रकथा

वर्ष २०२२ मध्ये डॉ. संपत यांनी संगीतकार रिकी केज आणि संशोधक राजीव शर्मा यांच्यासह बंगालमधील विस्मृत ‘बौल’ परंपरेवर आधारित ‘Who is Baul ?’, या माहितीपटाची निर्मिती केली. याचे दिग्दर्शन सायराम सागीराजू यांनी केले होते.

८. भारताचे वीर योद्धे

वर्ष २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या संपत यांच्या ‘Bravehearts of Bharat: Vignettes from Indian History’ या पुस्तकात त्यांनी परदेशी आक्रमणांविरुद्ध यशस्वी लढा दिलेल्या १५ पुरुष आणि महिला विरांच्या शौर्याचा इतिहास सांगितला आहे. भारताच्या इतिहासात त्यांची ओळख लपवून ठेवण्यात आली होती. ‘अज्ञात संस्कृतीचे योद्धे’ या संकल्पनेतून निवडलेल्या १५ व्यक्तींच्या जीवनचरित्रांचा हा संग्रह आहे. या माध्यमातून त्यांनी खरा इतिहास समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.