मथुरा आणि वृंदावन (उत्तरप्रदेश) येथील तीर्थक्षेत्री दर्शनाकरता गेलो असता आलेले विदारक अनुभव !

फेब्रुवारी २०२५ मध्ये मी, माझी पत्नी, तिच्या वयोवृद्ध आई आणि तिचा भाऊ असे आम्ही ४ जण उत्तरप्रदेशातील आगरा, वृंदावन आणि मथुरा येथे यात्रेकरता गेलो होतो. भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमी मथुरा आणि राधामातेचे गाव वृंदावन वास्तविक ही दोन्ही शहरे विश्वातील सनातनी हिंदूंसाठी अत्यंत पवित्र अशी ठिकाणे आहेत. या दौर्‍याच्या वेळी आलेले विदारक अनुभव येथे देत आहे.

अधिवक्ता अनीश परळकर

१. अत्यंत गलिच्छ आणि अस्वच्छ अशी ही शहरे असून कचर्‍याचे ढीग, तसेच उघडी अन् अस्वच्छ गटारे, हे सर्वत्र दिसत असते. सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असते. तेथील रिक्शाचालक आणि स्थानिक लोक अत्यंत उद्दाम अन् अरेरावीने वागणारे आहेत. रिक्शावाले मनमानीपणे भाड्याची रक्कम आकारात असतात.

२. अनेक ठिकाणी भिकार्‍यांच्या टोळ्या भाविकांच्या मागे लागून त्यांना भंडावून सोडत असतात.

३. काही व्यक्ती कपाळाला टिळा लावण्याच्या निमित्ताने भाविकांकडून पैसे उकळत असतात. मंदिरात पुजारी आणि पर्यटन मार्गदर्शक (गाईड) आपल्याकडून पैसे उकळतात.

४. आम्ही वृंदावन बाके बिहारी येथे दर्शनासाठी गेलो असतांना माझ्या पत्नीच्या भावाचा चष्मा एका वानराने पळवला. त्या वेळी स्थानिक व्यक्तींपैकी एकाने ‘आम्ही तो आणून देऊ; पण त्यासाठी आम्हाला काही पैसे द्यावे लागतील’, असे सांगितले. असे करण्याविना आमच्याकडे अन्य कोणताही पर्याय नव्हता. त्यांनी काही मिनिटांतच चष्मा आणून दिला आणि आमच्याकडून ५० रुपये घेतले. काही वेळाने स्थानिक व्यक्तींकडून कळले की, हा त्यांचा धंदा आहे. वानरांना तसे करण्यासाठी त्यांनीच प्रशिक्षण दिलेले असते. आपला जो ऐवज (उदाहरणार्थ पैशाचे पाकीट, भ्रमणभाष संच, इतर मौल्यवान वस्तू) पळवला जातो, त्यानुसार त्यांचे पैसे ठरत असतात.

वरील एकूण सूत्रे पहाता सनातन हिंदूंची या पवित्र भूमी असूनही तेथे नियोजन, प्रशासन याचा पूर्णतः बोजवारा उडालेला आहे. प्रत्येक व्यक्ती कशा प्रकारे भाविकांना लुटता येईल, यातच मग्न झालेला पहायला मिळतो. उलट पक्षी आगरा हे शहर मुसलमानबहुल असूनही आंतरराष्ट्रीय वारसा घोषित झालेले असल्याकारणाने मथुरा आणि वृंदावन यांपेक्षा पुष्कळ प्रमाणात स्वच्छता अन् लोकांची वागणूक यात उजवे भासते.

योगिजींसारखा मुख्यमंत्री सातत्याने राहिल्यास पुढील किमान ३५ ते ४० वर्षे मथुरा आणि वृंदावन या शहरांचा विकास होण्याकरता लागू शकतील; कारण तेथील स्थानिकांमध्ये स्वतःहून सुधारण्याची इच्छा शक्ती फारच अल्प प्रमाणात जाणवते.

– अधिवक्ता अनीश परळकर, मुंबई. (१०.३.२०२५)