काँग्रेसचे राहुल गांधी, आंतरराष्ट्रीय उद्योगपती जॉर्ज सोरोस आणि भारतविरोधी षड्यंत्र !

‘भाजपचे लोकसभा खासदार संबित पात्रा यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी भारतविरोधी षड्यंत्र करणार्‍या त्रिकोणाविषयी माहिती दिली. ‘या त्रिकोणाचा एक कोन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी असून ते देशद्रोही आहेत’, असा आरोप त्यांनी केला. ‘ते देशातील सर्वांत मोठे द्रोही आहेत’, असेही पात्रा म्हणाले. याविषयी सुशांत सिन्हा यांनी त्यांच्या ‘यू ट्यूब वाहिनी’वर खासदार संबित पात्रा यांच्याशी वार्तालाप केला. या वेळी संबित पात्रा यांनी परकीय शक्तींकडून भारताला हानी पोचवण्यासाठी होत असलेल्या षड्यंत्रावर प्रकाश टाकला. याविषयी या लेखात पाहूया.

(भाग ४)

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/892860.html

१७. सत्ता परिवर्तनानंतर भारतीय नागरिकांच्या गांभीर्यात वाढ 

पंतप्रधान मोदी हे या ‘लुटणार्‍या’ टोळीच्या संपूर्ण विरोधात आहेत. यापूर्वी भारताचे पंतप्रधान विदेश दौर्‍यावर जात होते, तेव्हा त्यांच्या समवेत अनेक जण विदेशात जाऊन मौजमजा करत होते; पण आता तसे करणे शक्य नाही. त्यामुळे त्यांना वाईट वाटत असेल. देशाचे केवळ सत्तापरिवर्तन झाले नाही, तर मानसिक परिवर्तनही झाले आहे. ‘कष्ट करायचे आहे, देशासाठी काम करायचे आहे आणि देशाला पुढे न्यायचे आहे’, ही मानसिकता निर्माण झाली आहे. पूर्वी १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी या दिवशी किती लोक सकाळी उठून पंतप्रधानांचे भाषण ऐकत होते ? आता १५ ऑगस्टला मोदी काही तरी नवीन बोलतील, याची सर्वांना निश्चिती असते. ते कधी स्वच्छतेविषयी, कधी गॅसविषयी, तर कधी समान नागरी कायद्याविषयी बोलतात. त्यामुळे लोकांना येणार्‍या काळात काय होईल, याचा अंदाज येतो. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाविषयी जनतेमध्ये गांभीर्य निर्माण झाले आहे. आपल्याला या लहान गोष्टी वाटतात; पण त्यातून मोठे परिवर्तन होत आहे.

१८. विरोधकांच्या खोट्या कथानकाला फसल्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला जागा राखण्यात अपयश

निवडणुकीत कधी कधी विरोधी गटाचा ‘नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) लोकांना खरा वाटतो. विरोधी गटाने भारताला जातींमध्ये विभागण्याचा प्रयत्न केला, तसेच हिंदुत्वाला तुकड्यांमध्ये विभागण्याचा प्रयत्न केला. सत्तेवर आल्यास सहस्रो रुपये देण्यात येतील, अशा प्रकारची आश्वासने देण्यात आली. त्यासाठी लोकांच्या खोट्या अर्जावर स्वाक्षर्‍या घेण्यात आल्या. या खोट्या कथानकाचा परिणाम झाल्यामुळे भाजपच्या जागा निश्चितपणे न्यून झाल्या. असे असले, तरी चुका सुधारण्यात आल्यामुळे त्याचा परिणाम हरियाणा आणि महाराष्ट्र यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये दिसून आला. हे राजकारण आहे. त्याचा रस्ता वाकडातिकडा आहे. या रस्त्यावर धैर्याने चालावे लागते. कधी मते मिळतील, तर कधी नाही. कधी विजयी होऊ, तर कधी पराभूत; पण आम्ही कोणत्याही परिस्थितीत आपल्या लाभासाठी देशहिताला खाली पडू देणार नाही. खासदारकीच्या जागा न्यून निवडून आल्या, हे मान्य आहे; पण त्यासाठी पंतप्रधान मोदी देशासाठी कधीच तडजोड करणार नाहीत.

खासदार संबित पात्रा यांचा बिहारशी संबंध

माझा जन्म ओडिशाचा असला, तरी माझ्यावर बिहारची छाप आहे. माझे वडील बोकारो येथील ‘स्टील प्लांट’मध्ये नोकरीला होते. त्या वेळी अखंड बिहार होता. त्यामुळे मी बिहारमध्ये वाढलो. बिहारचे लोक अतिशय तीक्ष्ण, ज्ञानी आणि गुणी असतात. त्यामुळे मला बिहारपासून पुष्कळ शिकायला मिळाले. भारतीय सभ्यता आणि संस्कृती यांना पैलू पाडण्याचे काम अनेक वर्षे बिहारने केले आहे. चाणक्यपासून मोठमोठे लोक तेथून निर्माण झाले आहेत.

१९. ओडिशातील नवीन पटनायक यांची सत्ता भाजपकडून पादाक्रांत 

ओडिशाच्या लोकांचे एक वैशिष्ट्य आहे. ते कुणावरही अन्याय करत नाहीत. ते आधी पडताळतात आणि वेळ देतात. त्यांना हवे ते मिळाले नाही, असे त्यांना वाटले, तर ते क्षमा करत नाहीत. ओडिशात फार काळ एका पक्षाला संधी देण्यात आली. जेव्हा जनतेला वाटायला लागले की, त्यांच्या ओडिया अस्मितेशी खेळले जात आहे, तेव्हा त्यांनी एका रात्रीत सर्व परिवर्तन केले. त्यांचे पंतप्रधान मोदी यांच्यावर प्रेम होतेच. ओडिया अस्मिता आणि मोदी यांचा चमत्कार हे दोन्ही मिळून ओडिशाचे चमत्कारिक परिणाम बघायला मिळाले. आम्ही निवडणुकीत व्यस्त होतो; पण चांगले परिणाम येणार आहेत, याचा अंदाज आमच्या ज्येष्ठ नेत्यांना होता. त्यांचे अधिकांश जीवन विरोधी बाकावर गेले आहे. ते इतकी वर्षे कष्ट सहन करत करत येथपर्यंत पोचले आहेत. त्यांच्या अनुभवाचा लाभ आताच्या पिढीला मिळत आहे.

२०. कष्ट, तपस्या आणि महाप्रभूंची कृपा यांमुळे जगन्नाथ पुरी येथील लोकसभा निवडणुकीत विजय

माझ्या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘रोड शो’ होता. तो सकाळी ७ वाजता होता; पण ठाऊक नाही की, त्यांना पहाण्यासाठी लक्षावधी लोक कुठून आले ? यश मिळवण्यासाठी निश्चितपणे कष्ट केले पाहिजेत; पण माझी एवढी क्षमता नाही. त्यामुळे आम्ही जे आज आहोत, त्यात आमच्या ज्येष्ठ नेत्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनीच आमचे बोट पकडून आम्हाला समर्थन दिले आहे. लोकसभेच्या मागील निवडणुकीत माझा पराभव झाला होता, तेव्हा साहजिकच मला दु:ख झाले होते. त्यानंतर मी अंतर्मुख झालो. ज्या जगन्नाथपुरी येथून मी निवडणूक हरलो, त्या ठिकाणी निवडणूक जिंकणे मोठी गोष्ट आहे; कारण महाप्रभूंच्या इच्छेने तेथे कुणी प्रवेशही करू शकत नाही. जेव्हाही मी मंदिरात महाप्रभूंकडे जातो, तेव्हा अनेकदा त्यांना आत्मनिवेदन करतो. एकदा त्यांना मनातून संवाद साधतांना म्हटले, ‘‘प्रभो, मी तुमचा बोबडा भक्त आहे, मग लोकसभेत माझा पराभव कसा काय झाला ?’’ तेव्हा प्रभु मला म्हणाले, ‘‘इतक्या सहजपणे निवडून आले, तर या स्थानाची महती तुला कशी कळेल ? कष्ट आणि तपस्या तर करावी लागेलच. सेवा आणि तपस्या करा, नंतर सर्व चांगले होईल.’’ तपस्या केल्यानंतर घाम गाळून मिळालेले फळ गोड वाटते. मला वाटते, ‘जगन्नाथजीने जे केले, ते योग्यच केले आहे.’ भगवंताने प्रथम पराभूत केले, त्यानंतर त्यांनी माझ्याकडून तपस्या करवून घेऊन जिंकवून दिले. त्यासह ज्येष्ठांचे आशीर्वादही दिले.

२१. ‘ओ.सी.सी.आर्.पी.’ आणि राहुल गांधी यांचा देशद्रोह घरोघरी पोचवणे आवश्यक ! 

‘ओ.सी.सी.आर्.पी.’चा संपूर्ण देशद्रोह उघडा पाडून घरोघरी पोचवणे, हा सर्वांत मोठा कार्यक्रम आहे. (‘ओ.सी.सी.आर्.पी.’ (ऑर्गनार्ईज्ड क्राईम करप्शन रिपोर्टींग प्रोजेक्ट) ही शोधपत्रकारिता करणार्‍या २४ संस्थांनी मिळून बनलेली विदेशी संस्था आहे.) काँग्रेसचे राहुल गांधी देशाच्या विरोधात काम करत आहेत. ते सभागृह का चालू देत नाहीत ?, तसेच देशहिताचे कायदे संमत का करू देत नाहीत ?, याचे संपूर्णपणे स्पष्टीकरण होणे आवश्यक आहे.

राहुल गांधी यांच्या विदेशी नागरिकत्वाचे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. न्यायालयाने गृहमंत्रालयाला टिप्पणी मागितली आहे. न्यायालय आणि गृहमंत्रालय यांच्यात प्रकरण चालू असल्यामुळे मीही याविषयी अनभिज्ञ आहे. न्यायालयाला यात काहीतरी तथ्य आढळले असेल. अन्यथा न्यायालयाने याचिका रहित केली असती. न्यायालयाने या याचिकेत रस दाखवला, हीच सर्वांत मोठी गोष्ट आहे, तेवढीच ती धोकादायकही आहे. त्यात तथ्य आढळले, तर त्यासाठी ‘देशद्रोह’ हा पुष्कळ लहान शब्द होईल.

‘नॅशनल हेरॉल्ड घोटाळा’ प्रकरण बंद झाले नाही. या घोटाळ्याप्रकरणी राहुल गांधी आणि सोनिया गांधी सध्या जामिनावर बाहेर आहेत. लालूप्रसाद यादव यांना चारा घाेटाळा प्रकरणी कारागृहात जाण्यासाठी पुष्कळ वर्षे लागली. भारतीय न्यायालये लोकशाही पद्धतीने काळानुसार काम करतात. कुणी निरपराध असतांना ‘तो कारागृहात जावा’, असे न्यायालयाला वाटत नाही. ‘१०० दोषी सुटले, तरी चालतील; पण १ निर्दाेष कारागृहात जाऊ नये’, हे न्यायालयाचे धोरण आहे. वेळ लागेल; पण आमचे सरकार लोकशाही पद्धतीने सत्य जगासमोर आणेल. राहुल गांधी ‘सेन्स ऑफ एन्टायटलमेंट’ने (हक्काची भावना) चालतात.

आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. राहुल गांधी यांच्यावर अतिशय मोठे आरोप आहेत. ते देशद्रोह्यांसह बसले होते. ते अमेरिकेत इलहान उमर यांच्यासमवेत बसले होते. त्याच्याशी राहुल गांधी हात मिळवून आले, तर प्रश्न विचारला गेला पाहिजे. त्यांच्यावर जे काही आरोप केले, त्याविषयी त्यांच्याशी चर्चा करण्यास आम्ही सिद्ध आहोत. त्यांच्यावर केलेले आरोप त्यांनी खोडून काढावेत.

२२. नागरवाला प्रकरणाची सत्यता दडपण्यासाठी काँग्रेसकडून संसद बंद पाडण्याचा प्रयत्न 

मी संसदेत नागरवाला प्रकरण उचलले, तेव्हा माझ्यासमोर बसले असतांनाही राहुल गांधी यांनी उत्तर दिले नाही. संसदेत बॅकिंग सुधारणा विधेयकावर चर्चा चालू आहे. हे विधेयक ज्या पायावर उभे आहे, ते नागरवाला प्रकरण आहे, तरीही नागरवाला प्रकरणावर ते बोलू इच्छित नाहीत. ते बोलले, तर इंदिराजींचे षड्यंत्र उघड होईल, याची त्यांना कल्पना आहे.

२३. काय आहे नागरवाला प्रकरण ? 

२४ नोव्हेंबर १९७१ या दिवशी संसदेच्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत दूरभाष आला. तो बँकेचे मुख्य रोखपाल मलहोत्रा यांनी उचलला. त्यांना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सचिवाने एका विशिष्ट व्यक्तीला ६० लाख रुपये देण्यास सांगितले. नंतर इंदिराजींनी सांगितले, ‘एक गुप्त मिशन आहे. त्यामुळे बांगलादेशाच्या विशिष्ट व्यक्तीला (नागरवाला)

६० लाख रुपये द्या आणि उद्या माझ्याकडून ‘व्हाऊचर’ घेऊन जा.’ ज्या व्यक्तीला हे पैसे द्यायचे होते, त्याच्याशी सांकेतिक शब्दांत बोलणे व्हायचे होते. नागरवाला या व्यक्तीला या लोकांनी ६० लाख रुपये दिले. तेव्हाचे ६० लाख, म्हणजे आजचे १७४ कोटी रुपये होतात. जेव्हा बँकेचे अधिकारी पंतप्रधान निवासाच्या ठिकाणी ‘व्हाऊचर’ घेण्यास गेले, तेव्हा समजले की, पंतप्रधान गांधी संसदेत आहे. त्यानंतर हे तेथे गेले आणि सचिव अक्सर यांना भेटले. ते म्हणाले, ‘‘आम्ही असा काही दूरभाष केलाच नाही.’’ त्यानंतर कसेही करून नागरवाला यांना अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक कश्यप या प्रकरणाचे अन्वेषण अधिकारी होते. हे प्रकरण न्यायालयात गेले. ४ वर्षांचा कारावास ४ दिवसांत संपुष्टात आला आणि नागरवाला सुटले. संपूर्ण भारतात ३ दिवसांची सुनावणी आणि चौथ्या दिवशी निवाडा असे प्रथमच झाले असेल. बँकेचे व्यवस्थापक जर पंतप्रधानांच्या केवळ दूरभाषवरून एवढी रक्कम देत असतील, तर ही गोष्ट यापूर्वीही अनेक वेळा घडली असण्याची शक्यता आहे. त्यानंतर योगायोगाने नागरवाला यांचा मृत्यू झाला. अनेकांनी या मृत्यूला ‘संशयास्पद’ म्हटले आहे. अन्वेषण अधिकार्‍याचाही रस्ते अपघातात मृत्यू झाला. या प्रकरणात रेड्डी आयोग स्थापन करण्यात आला. आयोगाच्या अहवालात इंदिरा गांधी यांना पूर्ण ‘क्लिन चीट’ (निर्दाेषत्व) देण्यात आलेली  नाही. या अहवालात गृह मंत्रालयावर प्रश्न उपस्थित केला आहे.

हा विषय उचलणारी मी पहिली व्यक्ती नाही. यापूर्वी हा विषय मोदी यांनी संसदेत उचलला आहे. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनीही यावर चर्चा केली होती. तेही या प्रकरणी समाधानी नव्हते. नंतर श्रीमती गांधी पंतप्रधान झाल्या आणि हे प्रकरण दाबण्यात आले. आम्ही याची सत्यता विचारली, तर त्यांनी संसदेत गोंधळ घातला. ‘ही संसद आहे, येथे सत्यतेवर चर्चा होईल आणि आम्ही प्रश्न विचारू. हा १८० पानांचा अहवाल आहे. रोखपालला नंतर काय फसवण्यात आले’, हेही मला ठाऊक आहे. दोघांचा मृत्यू झाला आणि एकाला मोठे पद मिळाले. ही त्यांची नेहमीची गोष्ट होती. आम्ही आमची बाजू मांडली, तर ते का पळत आहेत, ते शेअर मार्केट का पाडत होते ?, ते ‘पेगासस’चे खोटे कथानक का बनवत होते ? त्यांना भारताला जातीच्या आधारे का विभाजित करायचे होते ? ‘येथे धार्मिक स्वातंत्र्य नाही’, असे का दाखवण्याचा प्रयत्न करत होते ? येथे भाषण स्वातंत्र्य नाही, हे का दाखवू पहात होते ? भारताच्या शत्रूंना विदेशात जाऊन का भेटत होते ? या प्रश्नांची उत्तरे त्यांना द्यावीच लागणार आहेत.

(समाप्त)

(साभार : सुशांत सिन्हा यू ट्यूब वाहिनी)