काँग्रेसचे राहुल गांधी, आंतरराष्ट्रीय उद्योगपती जॉर्ज सोरोस आणि भारतविरोधी षड्यंत्र !

‘भाजपचे लोकसभा खासदार संबित पात्रा यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी भारतविरोधी षड्यंत्र करणार्‍या त्रिकोणाविषयी माहिती दिली. ‘या त्रिकोणाचा एक कोन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी असून ते देशद्रोही आहेत’, असा आरोप त्यांनी केला. ‘ते देशातील सर्वांत मोठे द्रोही आहेत’, असेही पात्रा म्हणाले. याविषयी सुशांत सिन्हा यांनी त्यांच्या ‘यू ट्यूब वाहिनी’वर खासदार संबित पात्रा यांच्याशी वार्तालाप केला. या वेळी संबित पात्रा यांनी परकीय शक्तींकडून भारताला हानी पोचवण्यासाठी होत असलेल्या षड्यंत्रावर प्रकाश टाकला. याविषयी या लेखात पाहूया.                      

(भाग ३)

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/892516.html

१०. सध्याची आधुनिक युद्धपद्धत

भारताने ‘यूपीआय’ (भ्रमणसंचावरून पैसे हस्तांतरण करण्याची यंत्रणा)ला स्वीकारले. आज भारत सशक्त आणि आत्मनिर्भर होऊ लागला आहे. त्यामुळे अनेक लोकांच्या पोटात दुखत आहे. भारताची अर्थव्यवस्था एवढी पुढे गेली, तर जॉर्ज सोरोस यांसारख्या लोकांचे काय होईल ? त्याच्या आस्थापनाचे काय होईल ? जे जागतिक स्तरावर सर्वांत श्रीमंत आहे, ते अशाच प्रकारे तथाकथित माहिती अहवाल काढून आणतील, ज्याने भारताच्या बाजारतील यंत्रणेवर आक्रमण होईल. आज ‘तोफ चालवा आणि राजाचा राजवाडा पाडा’, अशी वेळ राहिली नाही. ‘शेअर मार्केट (समभाग विक्रीचा बाजार) पाडा. ते पडले, तर देशाची अर्थव्यवस्था डळमळेल’, हे नवीन आक्रमण  आहे.

हे ठाऊक असल्याने ‘ओ.सी.सी.आर्.पी.’ तिच्या माहिती अहवालाने जॉर्ज सोरोस आणि राहुल गांधी यांची चौकडी कसेही करून भारताच्या शेअर मार्केटवर प्रहार करण्याचा प्रयत्न करत आहेत. (‘ओ.सी.सी.आर्.पी.’ (ऑर्गनार्ईज्ड क्राईम करप्शन रिपोर्टींग प्रोजेक्ट) ही शोधपत्रकारिता करणार्‍या २४ संस्थांनी मिळून बनलेली एक विदेशी संस्था आहे.) त्यांना हे समजत नाही की, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारा एक सामान्य व्यक्ती असतो. भारतातील कोट्यवधी लोकांनी लहान लहान गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये केली आहे. जेव्हा राहुल गांधींमुळे एक वेळा शेअर मार्केट पडते, तेव्हा त्यांना दु:ख होते. त्याचा अभिशाप राहुल गांधींनाच लागतो.

११. भारताची अर्थव्यवस्था, समाजमूल्ये आणि देशाचे नेतृत्व संपवणे हे विदेशी शक्तींचे लक्ष्य !

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भारताची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावरून ४ थ्या क्रमांकावर पोचली आहे आणि लवकरच ती तिसर्‍या स्थानी पोचेल. हे जर आधीच झाले असेत, तर आज भारताची अर्थव्यवस्था पहिल्या किंवा दुसर्‍या क्रमांकावर असती. अर्थात् त्यामुळे भारताला अब्जावधी रुपयांचा लाभ होत आहे आणि दुसर्‍या देशाला अब्जावधी रुपयांचा तोटा होत आहे. त्यामुळे विदेशातील उद्योगपतींना भारताला प्रगती करू द्यायची नाही. १२ नोव्हेंबर २०२० या दिवशी ‘फायनान्शियल टाइम्स’मध्ये एक लेख प्रकाशित झाला होता. त्यात ‘अदानी हे मोदी यांचे ‘रॉकफेलर’ (अमेरिकेतील उद्योगपती) आहेत, अदानी यांना संपवल्यास मोदी संपतील’, असे म्हटले होते. अशा प्रकारची त्यांची विचारसरणी आहे. त्यांचे पंतप्रधान मोदी यांना संपवणे, हे एकच लक्ष्य आहे.

वास्तविक हे लोक स्वत: भांडवलदार आहेत; पण बाहेर ‘भांडवलशाही वाईट आहे’, अशा अफवा पसरवतात. त्यांचे संपूर्ण खोटे कथानक भांडवलशाहीच्या विरोधात चालते.  भारताचे उद्योगपती चुकत असतील, तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. त्यासाठी त्यांना न्यायालयात उत्तरही द्यावे लागेल. उद्योगपतींवर चुकीच्या पद्धतीने खटला चालवला जाऊ नये; पण एखाद्या उद्योगपतीच्या पाठीशी राहून त्याचा बचाव करणे, हे आमचे काम नाही. जर एका राजकीय पक्षाच्या रूपात आमच्या पंतप्रधानांना चुकीच्या पद्धतीने, अफवा पसरवून आणि खोटे आरोप करून संपवायचा प्रयत्न करत असाल, तर सत्य समोर आणणे, हे आमचे कर्तव्य आहे. पंतप्रधान मोदी यांना संपवणे, भारताची अर्थव्यवस्था खाली पाडणे, उद्योगपतींवर आक्रमण करणे आणि समाजाची मूल्ये नष्ट करण्यासाठी देशाच्या संस्कृतीवर आक्रमण करणे, हेच या देशविरोधी तत्त्वांचे काम आहे.

काँग्रेसचे राहुल गांधी यांनी सतत सनातन धर्माच्या विरोधात वक्तव्ये केली आहेत. ‘सनातनला संपवायचे आहे’, अशा प्रकारचे वक्तव्य काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिाकार्जुन खरगे यांनी केले आहे. कधी कधी सत्य मुखातून निघून जाते. देशाचे नेतृत्वच संपवले, तर अन्य गोष्टी आपोआप संपतील, असे त्यांना वाटते.

१२. राहुल गांधी यांना ‘देशद्रोही’ म्हटल्यामुळे होणारी चरफड

राहुल गांधी सतत बिनबुडाचे आरोप करत असतात. त्यांच्याकडे पुरावे असतील, तर त्यांना न्यायालयात जाण्यापासून कुणी थांबवले नाही. काँग्रेसचे अधिवक्ता अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटले, तर रात्री १२ वाजताही न्यायालय उघडू शकते. ते ‘पेगॅसस’ आणि ‘राफेल’ लढाऊ विमान प्रकरणांमध्ये न्यायालयात गेले होते; पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यांनी ‘पेगॅसस’ प्रकरणी मोदी यांच्यावर अत्यंत हीन शब्दांत टीका केली आहे. ‘मोदींना जनता लाठीने मारील’, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. राहुल गांधी यांना ‘देशद्रोही’ म्हटले, तर त्यांची चरफड झाली.

१३. भारतातील ‘डीप स्टेट’वर केंद्र सरकार कारवाई का करत नाही ?

लोकशाही पद्धतीनेच भारतातील ‘डीप स्टेट’ला प्रत्युत्तर दिले जाईल. कलम ३७० च्या समर्थनार्थ प्रचंड शक्ती उभी होती, तरीही ते हटवले गेले. (जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७०) पाकिस्तानवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ (तात्पुरत्या स्वरूपात केलेले सैनिकी कारवाई) केल्यावरही तो काही करू शकला नाही. या कारवाईचे जगानेही कौतुक केले. पूर्वी भारतात ‘डीप स्टेट’चे मोठे प्रस्थ होते. पाकिस्तानविषयी बंधुत्व चालू ठेवण्याचा उद्योग चालायचा, तो बंद झाला. पूर्वी कोणत्याही देशाचे राष्ट्राध्यक्ष चुकून भारतात आले की, निश्चितपणे पाकिस्तानलाही भेट देत असत; कारण त्यांना समतोल साधावा लागायचा. एवढेच नाही, तर भारतात येतांना ते काश्मीरच्या फुटीरतावाद्यांशी किंवा हुरियतवाल्यांशी भेटत असत. आता असे काही होतांना दिसत नाही. भाजपचे सरकार काश्मीरमधील कलम ३७० हटवत असतांना ‘तसे केल्यास हिंसाचार माजेल’, अशा धमक्या दिल्या जात होत्या; पण तसे काहीच घडले नाही. काश्मीरमध्ये पूर्वी प्रत्येक दिवशी लहान मुले आणि तरुण यांच्याकडून सैनिकांवर दगडफेक होत होती. आता तेथील लहान मुले शिकत आहेत, तर तरुण नोकर्‍या करत आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे कोणतीही कारवाई लोकशाही पद्धतीने करतात. भारताच्या प्रत्येक यंत्रणेत ७० वर्षांचा खड्डा होता. तो खड्डा आधी आपल्याला भरावे लागेल. त्यानंतर त्याच्यावर आपल्याला १०० माळ्यांची इमारत उभी करावी लागेल. हा खड्डा भरत आला आहे. आता या देशाला प्रगती करायची आहे. देशातील देशद्रोह्यांना निश्चितपणे शिक्षा होईल.

१४. राहुल गांधी यांचे विदेशातील भारतविरोधी लोकांशी संबंध

अ. फॅबिओ मॅसिमो कॅस्टॅल्डो : सप्टेंबर २०२३ मध्ये राहुल गांधी इटलीमध्ये गेले होते. तेथे त्यांनी फॅबिओ मॅसिमो कॅस्टॅल्डो (युरोपियन युनियनच्या पार्लमेंटचे सदस्य) यांची भेट घेतली. कॅस्टॅल्डो यांचे पाकिस्तानी परवेझ इक्बाल लोझर याच्याशी घनिष्ट संबंध आहेत. लोझर हा इटलीतील सुपरिचित व्यक्ती असून पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आय.एस्.आय.’चा हस्तक आहे. तो इटलीतील ‘आय.एस्.आय.’चा विशेष व्यक्ती आहे. त्याने काश्मीर प्रश्नाच्या विरोधात लेख लिहिले, तसेच युरोपीय युनियनमध्ये वक्तव्ये केली आहेत. या दोघांनी संपूर्ण युरोपमध्ये काश्मीरच्या विरोधात दबाव गट निर्माण केला. अशा कॅस्टॅल्डोला राहुल गांधी जाऊन भेटले आणि काँग्रेस पक्षाने त्याचे छायाचित्र त्यांच्या अधिकृत ‘हँडल’वर (सामाजिक माध्यमाच्या खात्यावर) ठेवले.

आ. प्राध्यापक कमल : राहुल गांधी ‘केम्ब्रिज’ विश्वविद्यालयात बोलण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांच्या पाठीमागे एक पाकिस्तानी प्राध्यापक कमल उभा होता. त्याचे छायाचित्रही पुष्कळ प्रसिद्ध झाले होते. तेथे त्यांनी भारत, मोदी, रा.स्व. संघ, सर्वाेच्च न्यायालय यांच्या विरोधात बरीच वक्तव्ये केली. या कार्यक्रमाचा संयोजक पाकिस्तानी होता. त्याला पाकिस्तानचा सर्वाेच्च पुरस्कारही देण्यात आला आहे. यावरून राहुल गांधी कशा प्रकारे बाहेर जाऊन लोकांशी भेटतात, हे दिसते.

इ. ॲलविना अलामेत्सा : या एक महिला असून त्या युरोपियन युनियन पार्लमेंटच्या सदस्या आहेत. ॲलविना अलामेत्सा यांनी म्हटले होते, ‘भारत स्वत:ला सांभाळू शकत नाही. त्यामुळे विदेशी हस्तक्षेप आवश्यक आहे.’ राहुल गांधी त्यांना भेटतात आणि त्यांचा पाठिंबा मिळवतात. ज्या व्यक्तीला हे माहिती नाही की, देशाच्या शत्रू कोण आहे ? यालाच देशद्रोह म्हणतात. तुम्ही शत्रूच्या समवेत उठता-बसता, त्यामुळे हा भोळेपणा नाही.

ज्या व्यक्तीच्या कुटुंबात एवढे पंतप्रधान झाले आहेत की, त्यांना वाटते की, हे पद त्यांचेच राहिले पाहिजे. त्यांना वाटते की, त्यांच्या विरोधात कुणीही काहीही बोलू शकत नाही. ते पंतप्रधान मोदी यांना ‘चौकीदार चोर’, ‘नीच आदमी’ अशा प्रकाच्या १०० हून अधिक शिव्या देत असतील, तर आम्ही तुमच्यावर टीका करू शकतो आणि त्याचेही आमच्याकडे पुरावे आहेत.

१५. भारतविरोधी ‘ओ.सी.सी.आर्.पी.’, जॉर्ज सोरोस आणि राहुल गांधी यांचे त्रिकूट

जॉर्ज सोरोस आणि राहुल गांधी

‘ओ.सी.सी.आर्.पी.’, जॉर्ज सोरोस आणि राहुल गांधी यांचा त्रिकोण बनला आहे. त्यांचा उद्देश ‘भारताला अस्थिर करणे’, हा आहे. त्यांचा प्रत्येक माहिती अहवाल सातत्याने देशविरोधी असतो. ‘ओ.सी.सी.आर्.पी.’ काही लोकांसह विविध विषयांत अहवाल सिद्ध करते आणि भारताविषयी चुकीची माहिती पसरवते. त्यावर डोळे बंद करून विश्वास न ठेवता त्यातील खरी माहिती जनतेसमोर ठेवायची आहे.

१६. भारताविषयीच्या अपप्रचाराचे देशाबाहेरील संबंध

राहुल गांधी उझबेकिस्तान येथे गेले तेव्हा सुपरिचित सामंता जेन पावर नावाच्या ‘ओ.सी.सी.आर्.पी.’ला आर्थिक साहाय्य करणार्‍या महिलेला भेटले. पावर हिचा ‘अर्ली वॉर्निंग प्रोजेक्ट’ आहे. ती या संस्थेला जग मानते. ही संस्था कोणत्या देशात नरसंहार होण्याची शक्यता आहे, याची पूर्वकल्पना देते. या संस्थेनुसार भारत वर्ष २०१७-२०१८ मध्ये या उपक्रमात ८ व्या क्रमांकावर होता. वर्ष २०२१ मध्ये या उपक्रमात भारत जगात २ र्‍या क्रमांकावर होता. त्यांच्यानुसार भारतात सहस्रो लाखो लोकांचा नरसंहार होणार होता. लक्षात घेतले पाहिजे की, त्यांच्या मते सुदान, सोमालिया, सीरिया, इराक, झिम्बॉव्वे यांच्याही वर भारताचा क्रमांक होता. लोकांना खरे काय आहे, हे ठाऊक आहे. आनंद मांगनाले हे ‘ओ.सी.सी.आर्.पी.’चे भारतात काम पहातात आणि ते काँग्रेसशी संंबंधित आहेत. ‘साबरमती एक्सप्रेस’विषयी जो अपप्रचार करण्यात आला, त्याविषयी जनतेला खरी गोष्ट ठाऊक होती. देशविरोधकांची टोळीला असे वाटत होते की, हा देश त्यांचा आहे. ही टोळी देहलीत बसून संपूर्ण देश चालवत होती. त्यांचा संबंध देशाबाहेरही होता.’

(क्रमशः)

(साभार : सुशांत सिन्हा यू ट्यूब वाहिनी)