Train Hijacked In Pakistan : पाकिस्तानमध्ये ‘बलुच लिबरेशन आर्मी’ने प्रवासी रेल्वेचे केले अपहरण

  • १२० प्रवाशांना ठेवले ओलीस !

  • पाकच्या ६ सैनिकांना केले ठार

  • कारवाई केली, तर ओलिसांना ठार करण्याची दिली चेतावणी

प्रतिकात्मक छायाचित्र

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या बलुचिस्तान प्रांताच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा देणार्‍या ‘बलुच लिबरेशन आर्मी’ या संघटनेने ‘जाफर एक्सप्रेस’ या प्रवासी रेल्वेचे अपहरण केले आहे. यातील  १२० प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आले आहे. या रेल्वेतील पाकिस्तानी सैन्यातील ६ सैनिकांना ठार मारण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या रेल्वेमध्ये एकूण ४७० प्रवासी आहेत. जाफर एक्सप्रेस क्वेट्टा आणि पेशावर यांच्यामध्ये धावते.

बलुच लिबरेशन आर्मीने प्रसारित केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमच्या सैनिकांनी मश्काफ, धादर आणि बोलान येथे या कारवाईची योजना आखली. रेल्वे रुळ उडवून दिला आहे, ज्यामुळे जाफर एक्सप्रेस थांबली आहे. यानंतर आमच्या सैनिकांनी ही रेल्वे नियंत्रणात घेतली आणि प्रवाशांना ओलीस ठेवले. ‘जर आमच्याविरुद्ध सैनिकी कारवाईचा प्रयत्न झाला, तर आम्ही सर्व ओलिसांना मारून टाकू. या हत्याकांडाचे दायित्व पाकिस्तानी सैन्याची असेल.