‘भाषा आणि तिची लिपी यांचा परस्परांशी असलेला संबंध’, याविषयी आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखांमध्ये आपण ‘भाषा अन् तिची लिपी यांमध्ये सात्त्विकता निर्माण होण्यासाठी आवश्यक घटक, संस्कृत भाषा पृथ्वीवर कशी अवतरित झाली ? आणि त्या अनुषंगाने आध्यात्मिक विश्लेषण’, वाचले. आज याचा पुढचा भाग येथे दिला आहे.
(भाग ४)
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/889027.html
६. ‘संस्कृत भाषा पृथ्वीवर कशी अवतरित झाली ?’, या संदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण

६ इ. श्री सरस्वतीदेवीचे ६ गण आणि भगवान शिवाचे ६ गण यांनी मिळून संस्कृत भाषेची निर्मिती करणे : ‘संस्कृत भाषा ऋषींच्या माध्यमातून सर्वप्रथम पृथ्वीवर साकार झाली. त्यापूर्वी श्री सरस्वतीचे ६ गण आणि भगवान शिवाचे ६ गण एकत्र आले अन् त्यांनी देवलोकातील संस्कृत भाषेचे रूपांतर पृथ्वीला अनुरूप अशा संस्कृत भाषेत केले.
६ इ १. सरस्वतीचे ६ गण आणि शिवाचे ६ गण यांनी निर्माण केलेल्या संस्कृत भाषेला अंतिम स्वरूप देण्याचे कार्य ‘श्री गणेश’ करत असणे : श्री सरस्वतीचे ६ गण आणि भगवान शिवाचे ६ गण यांनी मिळून निर्माण केलेल्या संस्कृत भाषेचा संकलक ‘श्री गणेश’ आहे. गणांचा ईश तो ‘श्री गणेश’ होय. श्री गणेशाला ‘ज्ञानेश’ किंवा ‘शब्देश’, असेही म्हणतात. श्री गणेशाला ‘ज्ञानाचा ईश्वर’ या अर्थाने ‘ज्ञानेश’ आणि ‘शब्दांचा कर्ता’ या अर्थाने ‘शब्देश’, असे म्हटले आहे.
जेव्हा पृथ्वीवर संस्कृत भाषेच्या निर्मितीचा काळ जवळ येतो, तेव्हा श्री सरस्वतीचे ६ गण आणि भगवान शिवाचे ६ गण वायूमंडलात एकत्र येतात. प्रत्येक गण त्याच्या भाषेशी संबंधित कौशल्यानुसार संस्कृत भाषेच्या निर्मितीत सहभाग घेतो, उदा. शब्द निर्माण करणारा गण शब्दाची निर्मिती करतो. शब्दाचा उच्चार निश्चित करणारा देव त्याचा उच्चार निश्चित करतो. त्या शब्दाचे व्याकरण निश्चित करणारा गण त्याचे व्याकरण निश्चित करतो. या प्रक्रियेतून निर्माण झालेल्या शब्दांच्या पुढे ओळी सिद्ध होतात.
त्या ओळींचे पुढील कार्य ‘स्वराणी’ ही स्त्री गण पहाते. ‘स्वराणी’ ही स्त्री गण प्रत्येक संस्कृत ओळीचा शुद्ध स्वरूपात उच्चार करते. त्यानंतर हे ज्ञान श्री गणेश एकत्रित करतो.
६ इ २. संस्कृत भाषेला अंतिम स्वरूप देण्याचे कार्य श्री गणेश करत असण्यामागील कारण : श्री सरस्वतीचे ६ गण आणि भगवान शिवाचे ६ गण हे संस्कृत भाषेतील शब्दांच्या विविध ओळी निर्माण करतात. त्यांना ‘शब्दमाला’ असे म्हणतात. ‘श्री गणेश’ ही व्यक्तीच्या कुंडलिनीचक्रांशी संबंधित मूळ देवता आहे. श्री सरस्वतीदेवी आणि भगवान शिव यांच्या गणांनी निर्माण केलेल्या संस्कृत भाषेला व्यक्तीच्या कुंडलिनीचक्रांना पूरक बनवण्याचे कार्य श्री गणेश करतो. यातून देवलोकातील संस्कृत ‘शब्दमाले’चे रूपांतर व्यक्तीच्या ‘कुंडलिनीमाले’त होते.
६ इ २ अ. व्यक्तीची ‘कुंडलिनीमाला’ म्हणजे काय ? : व्यक्तीतील कुंडलिनीचक्रांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे आहे.
१. अधोस्थानातील कुंडलिनीचक्रे : मूलाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूर
२. मध्यस्थान : अनाहतचक्र
३. ऊर्ध्वस्थान : विशुद्ध आणि आज्ञाचक्र
४. शिरोस्थान : सहस्रार. त्यालाच ‘मेरुस्थान’, असे म्हणतात. या सर्वांना एकत्रितपणे व्यक्तीची ‘कुंडलिनीमाला’, असे म्हणतात.
६ इ २ आ. संस्कृत भाषेतील ‘शब्दमाले’चे रूपांतर श्री गणेश ‘कुंडलिनीमाले’त का करतो ? : प्रत्येक व्यक्तीच्या शब्दांच्या उच्चारांचा चांगला किंवा वाईट परिणाम तिच्या प्रत्येक चक्रावर चांगल्या किंवा वाईट स्वरूपात होत असतो.
त्यानंतर शब्दांचा परिणाम शरिरातील एक कोटी स्थूल ऊर्जाप्रवाह आणि सूक्ष्म ऊर्जाप्रवाह यांच्यावर होतो. या सर्व ऊर्जाप्रवाहांचा परिणाम व्यक्तीचे शरीर, मन, बुद्धी आणि आध्यात्मिक स्थिती यांच्यावर होतो. त्यामुळे व्यक्तीचेे शब्दप्रयोग जितके शुद्ध आणि सात्त्विक असतील, तेवढे तिचे जीवन आरोग्यवान अन् आध्यात्मिक प्रगतीला पूरक असते.
त्यामुळे श्री सरस्वतीदेवीचे ६ गण आणि भगवान शिवाचे ६ गण यांनी निर्माण केलेली संस्कृत भाषा व्यक्तीच्या कुंडलिनीचक्रांना पूरक, शुद्ध अन् सात्त्विक बनवण्याचे कार्य श्री गणेश करतो. त्यामुळे या प्रक्रियेला ‘श्री गणेशाने देवतांच्या संस्कृत भाषेतील शब्दमालेचे रूपांतर व्यक्तीच्या ‘कुंडलिनीमाले’त करणे’, असे म्हटले आहे. श्री गणेशाला ‘कोटीश’ किंवा ‘कोट्यायन’, असे म्हणतात.
६ इ २ इ. ‘श्री गणेशाला ‘कोटीश’ किंवा ‘कोट्यायन’, असे का म्हणतात ? : श्री गणेश व्यक्तीच्या शरिरातील एक कोटी स्थूल ऊर्जाप्रवाह आणि सूक्ष्म ऊर्जाप्रवाह यांचा ईश्वर आहे; म्हणून त्याला ‘कोटीश’, असे म्हटले आहे, तसेच ‘कोट्यायन’ या शब्दात ‘कोटी’ हा शब्द संख्येशी संबंधित आहे, तर ‘अयन’ हा शब्द ‘प्रगती’शी संबंधित आहे.
श्री गणेश शुद्ध संस्कृतच्या माध्यमातून व्यक्तीच्या शरिरातील एक कोटी स्थूल आणि सूक्ष्म ऊर्जाप्रवाह यांची प्रगती करून घेतो. त्यामुळे श्री गणेशाला ‘कोट्यायन’, असेही म्हणतात.
६ इ ३. पृथ्वीवर संस्कृत भाषा अवतरित होण्याची प्रक्रिया
अ. जेव्हा संस्कृत भाषा सर्वप्रथम पृथ्वीवर अवतरित होण्याची वेळ जवळ येते, तेव्हा श्री सरस्वतीदेवीचे ‘वत्स’, ‘पुलू’, ‘नित’, ‘संवत्स’, ‘केतु’ आणि ‘भार्गव’ हे ६ गण अन् भगवान शिवाचे ‘सर्ग’, ‘विसर्ग’, ‘मालिनी’, ‘बंधिनी’, ‘स्वराणी’ आणि ‘विहर्ग’ हे ६ गण एकत्र येतात.
आ. श्री सरस्वतीदेवी आणि भगवान शिव यांच्या प्रेरणेने त्यांचे ६ – ६ गण संस्कृत भाषेच्या निर्मितीला आरंभ करतात.
इ. श्री सरस्वतीदेवी आणि भगवान शिव यांचा प्रत्येक गण त्याचे कौशल्य अन् क्षमता यांनुसार संस्कृत भाषेच्या निर्मितीत सहभागी होतो. हे गण संस्कृत भाषा सिद्ध करतात. या भाषेचे स्वरूप सूक्ष्म, गूढ आणि सांकेतिक स्वरूपांत असते. त्यानंतर हे ज्ञान श्री गणेशाकडे येते.
ई. श्री गणेश संस्कृत भाषा शब्दबद्ध करून तिला लिपीचे स्वरूप देतो. ही प्रकिया व्यक्तीच्या शरिरातील सर्व कुंडलिनीचक्रे, एक कोटी स्थूल आणि सूक्ष्म ऊर्जाप्रवाह, व्यक्तीचे मन, बुद्धी अन् आध्यात्मिक स्थिती, तसेच निसर्ग आणि वातावरण यांना पूरक असते.
उ. पृथ्वीच्या निर्मितीनंतर श्री गणेश ‘आदि’ ऋषींना (टीप १) संस्कृत भाषा पृथ्वीवर प्रगट करण्याचे संकेत देतो. तेव्हा ‘आदि’ ऋषी वृक्षाच्या पानांवर संस्कृत भाषा उतरवण्यास सिद्ध होतात.
टीप १ – ‘आदि’ ऋषी : ब्रह्मांडात अनंत काळापासून अनेक पृथ्वींची उत्पत्ती, स्थिती आणि लय ही प्रक्रिया चालू आहे. त्यांपैकी ज्या ऋषींना मोक्षप्राप्ती झालेली नाही किंवा त्यांच्याकडून काही कार्य करणे शेष आहे, असे ऋषी वायूमंडलात सूक्ष्म स्वरूपात वास करतात. त्यांतील काही ऋषी एखाद्या पृथ्वीच्या निर्मितीनंतर पृथ्वीवर परत जन्म घेतात. ते ऋषी संस्कृत भाषेला पृथ्वीवर प्रगट करण्याचे कार्य करतात. हे ईश्वरी कार्य केल्यानंतर त्या ऋषींना देहत्यागानंतर मोक्षाची प्राप्ती होते. अशा ऋषींना पृथ्वीवरील ‘आदि’ ऋषी, असे म्हटले आहे. अशा ऋषींना ‘धर्मभास्कर’, असेही म्हणतात. या शब्दातील ‘भास्कर’ म्हणजे सूर्य. जे धर्माचे सूर्याप्रमाणे प्रभावी कार्य करतात, ते ‘धर्मभास्कर’ ऋषी होत.
ऊ. श्री गणेश सूक्ष्मातून एकेका शब्दाचा उच्चार करून संस्कृत भाषेची मांडणी व्याकरणासहित करतो. ही मांडणी आदि ऋषी प्रथम श्रवण करतात आणि त्यानंतर त्याची नोंद करतात.
ए. आदि ऋषींची बुद्धी अतिशय सूक्ष्म असते. त्या बुद्धीला ‘प्रज्ञाबुद्धी’, असे म्हणतात. आदि ऋषी श्री गणेशाकडून आलेले संस्कृत भाषेतील ज्ञान प्रथम स्वतः समजून घेतात आणि त्या ज्ञानाचा टप्प्याटप्प्याने विस्तार करतात. त्यानंतर ते ऋषी या ज्ञानाचा, म्हणजे संस्कृत भाषेचा समाजात हळूहळू प्रसार करतात.
ऐ. आदि ऋषी श्री गणेशाकडून सूक्ष्मातून आलेले संस्कृत भाषेचे ज्ञान जसेच्या तसे पृथ्वीवरील लोकांसाठी स्थुलातून संकलित करण्यास सक्षम असतात. त्यामुळे आदि ऋषींना ‘स्वयंसिद्ध’ असे म्हणतात.
ओ. श्री गणेश संस्कृत भाषेचे स्वरूप सूक्ष्मातून निश्चित करतो. त्यामुळे श्री गणेशाला संस्कृत भाषेचा ‘सूक्ष्म रचनाकार’, असे म्हणतात. आदि ऋषी संस्कृत भाषेला पृथ्वीवर स्थुलातून अवतरित करतात. त्यामुळे त्यांना संस्कृत भाषेचे ‘स्थूल रचनाकार’ असे म्हणतात.
संस्कृत भाषा ही गंगेप्रमाणे पवित्र आणि शुद्ध आहे. त्या भाषेचा प्रवास देवलोकापासून पृथ्वीपर्यंत आहे. त्यामुळे संस्कृत भाषेच्या ज्ञानाला ‘ज्ञानगंगा’, असे संबोधन प्राप्त झाले.’
(समाप्त)
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१०.२०२३)
|