Sambhal CO Anuj Chaudhary : ‘होळीच्या रंगांमुळे तुमचा धर्म खराब होईल’ असे वाटत असेल, तर त्या दिवशी घराबाहेर पडू नका !

संभल (उत्तरप्रदेश) जिल्ह्याचे मुख्य पोलीस अधिकारी अनुज चौधरी यांची मुसलमानांना सूचना !

संभल (उत्तरप्रदेश) जिल्ह्याचे मुख्य पोलीस अधिकारी अनुज चौधरी

संभल (उत्तरप्रदेश) – होळीच्या पार्श्वभूमीवर संभल जिल्ह्यात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्य पोलीस अधिकारी अनुज चौधरी यांनी कठोर शब्दांत सूचना दिल्या. यावर्षी होळी शुक्रवारी येत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी म्हटले की, जुम्मा वर्षातून ५२ वेळा येतो, तर होळी वर्षातून एकदाच येते. जर मुसलमान समाजातील लोकांना असे वाटत असेल की, होळीच्या रंगांमुळे तुमचा धर्म खराब होईल, तर त्या दिवशी घराबाहेर पडू नका. तुम्ही तुमच्या धर्माचा आदर करत असाल, तर इतर धर्माच्या लोकांच्या धर्माचाही आदर करा. शांतता समितीच्या बैठकीत हिंदु आणि मुसलमान अशा दोन्ही समाजातील लोक सहभागी झाले होते.

अनुज चौधरी पुढे म्हणाले की, होळीच्या दिवशी कोणी गैरकृत्य करतांना आढळल्यास त्याला बक्षिस दिले जाणार नाही. आम्ही संभलमध्ये शांतता आणि सुव्यवस्था बिघडू देणार नाही. होळीच्या दिवशी जर लोक घराबाहेर पडत असतील, तर त्यांचे मन एवढे मोठे असावे की, सर्व सारखेच आहेत. ज्याप्रमाणे मुसलमान समाज वर्षभर ईदची वाट पहातो, त्याप्रमाणे हिंदू समाजही होळीची वाट पहातो. रंगांची उधळण करून आणि मिठाई खाऊन होळी साजरी केली जाते आणि ईदच्या वेळी लोक शेवया बनवतात अन् एकमेकांच्या ठिकाणी भेट देतात. त्यामुळे सर्वांनी एकमेकांचा आदर करावा.

संपादकीय भूमिका

योगी आदित्यनाथ यांच्यासारखे मुख्यमंत्री असल्यामुळेच पोलीस कायद्यानुसार जनतेला वागायला सांगू शकतात आणि अवैध वागणार्‍यांना वठणीवर आणू शकतात. यातून ‘राजा कालस्य कारणम्’ (राजा काळाला कारणीभूत आहे) हे वचन सार्थ ठरते ! यामुळेच असे शासनकर्ते सर्वत्र हवेत !