FIR Against Priyanka Bharti : मनुस्मृतीची पाने फाडण्यावरून राष्ट्रीय जनता दलाच्या प्रवक्त्या प्रियांका भारती यांच्यावर नोंदवण्यात आलेला गुन्हा रहित होणार नाही !

अलाहाबाद उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

प्रियांका भारती

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – राष्ट्रीय जनता दलाच्या प्रवक्त्या प्रियांका भारती यांच्यावर वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात मनुस्मृतीची पाने फाडल्यावरून प्रविष्ट (दाखल) करण्यात आलेला गुन्हा रहित करण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने नकार दिला. उच्च न्यायालयाने तो दखलपात्र गुन्हा घोषित केला आहे. अलीगडमध्ये प्रियांका भारती यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाल्यानंतर त्यांनी ही याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. त्यांनी गुन्हा रहित करण्याची मागणी केली होती.

१. उच्च न्यायालयाने म्हटले की, आम्हाला असे आढळून आले आहे की ‘इंडिया टीव्ही’ आणि ‘टीव्ही ९ भारतवर्ष’ या दोन वृत्तवाहिन्यांवर आयोजित केलेल्या थेट चर्चेत एका विशिष्ट धर्माचा ‘मनुस्मृति’ या पवित्र ग्रंथची पाने फाडण्याचे कृत्य याचिकाकर्त्याच्या दुर्दैवी हेतूचे प्रथमदर्शनी प्रदर्शन होते आणि ते कोणत्याही वैध कारणाविना केले गेले होते. याचिकाकर्त्या एक सुशिक्षित आणि उच्चपदस्थ महिला असून त्यांनी एका राजकीय पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून चर्चेत भाग घेतला होता, याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. अशा परिस्थितीत हे कृत्य अजाणतेपणे झाले आहे, यावर विश्वास ठेवता येत नाही. सध्याच्या प्रकरणात एका राजकीय पक्षाच्या प्रवक्त्याने वृत्तवाहिनीवरील थेट प्रक्षेपण होत असलेल्या चर्चेत एका विशिष्ट धर्माचा पवित्र ग्रंथाची काही पाने फाडण्याचे कृत्य, प्रथमदर्शनी असे दर्शवते की, हा दखलपात्र गुन्हा घडला आहे.

२. ‘राष्ट्रीय स्वर्ण परिषदे’चे संघटन मंत्री भरत तिवारी यांनी २८ डिसेंबर २०२४ या दिवशी अलीगडमध्ये त्यांच्याविरुद्ध तक्रार केल्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. भरत तिवारी म्हणाले होते की, ‘प्रियांका भारती यांच्या कृतींमुळे देशात सामाजिक द्वेष पसरेल.’ त्यांनी ‘इंडिया टीव्ही’चे मालक रजत शर्मा आणि ‘टीव्ही ९’चे मालक वरुण दास यांच्यावर टीआरपीसाठी (टेलीव्हिजन रेटिंग पॉईंट – दूरचित्रवाहिन्यांवील एखाद्या कार्यक्रमाची लोकप्रियता मोजण्याचे परिमाण) प्रियांका भारती यांच्या कृतीला प्रोत्साहन दिल्याचा आरोपही केला. या कृत्यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे त्यांनी म्हटले होते.

संपादकीय भूमिका

  • मनुस्मृति फाडणे किंवा जाळणे या गोष्टी आता सवंग लोकप्रियतेसाठी केल्या जाऊ लागल्या आहेत. असे करणार्‍यांपैकी किती जणांनी खर्‍या अर्थाने मनुस्मृतीचा अभ्यास केलेला असतो ?, हा संशोधनाचाच विषय आहे.
  • अशांना कठोर शिक्षा झाल्यावरच इतरांवर असे गुन्हेगारी कृत्य न करण्याविषयी चाप बसेल !