
लंडन (ब्रिटन) – भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर सध्या ब्रिटनच्या अधिकृत दौर्यावर आहेत. त्यांनी ब्रिटीश पंतप्रधान केयर स्टार्मर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी पंतप्रधान स्टार्मर यांनी युक्रेन संघर्षावर ब्रिटनचा दृष्टीकोन मांडला. तसेच द्विपक्षीय आर्थिक सहकार्य वाढवणे आणि उभय देशांतील लोकांमधील देवाणघेवाणीत वृद्धी करणे यांवर चर्चा केली.
१. या अनुषंगाने परराष्ट्रमंत्र्यांनी ब्रिटीश व्यापारमंत्री जोनाथन रेनॉल्ड्स यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी भारत-ब्रिटन मुक्त व्यापार कराराविषयी चर्चा केली.
२. जयशंकर यांनी ब्रिटनचे गृहमंत्री यवेट कूपर यांची भेट घेऊन आतंकवादाचा सामना करण्यासाठी संयुक्त प्रयत्नांवर चर्चा केली.
३. या दौर्यात परराष्ट्रमंत्री ब्रिटनमधील बेलफास्ट आणि मँचेस्टर येथे नवीन भारतीय वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन करणार आहेत. ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डेव्हिड लॅमी यांनी सांगितले की, यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार भागीदारी आणखी सशक्त होईल. ब्रिटनने संरक्षण, तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात भारतासमवेत सहकार्य वाढवण्यावरही भर दिल्याचे लॅमी यांनी या वेळी स्पष्ट केले.