Maharashtra Budget Session 2025 : ‘अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा !’

  • आझमी यांच्या निलंबनासाठी विधानसभेत महायुती आक्रमक

  • औरंगजेबाच्या उदात्तीकरणावरून विधीमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित !

अबू आझमी

मुंबई – औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांना निलंबित करावे, यासाठी ४ मार्च या दिवशी विधानसभेत महायुतीचे आमदार आक्रमक झाले. अध्यक्षांच्या आसनाच्या पुढे येऊन महायुतीच्या आमदारांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’, ‘धर्मवीर संभाजी महाराजांचा विजय असो’, ‘हर हर महादेव’ आदी घोषणा दिल्या. महायुतीच्या आमदारांनी अबू आझमी यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. या वेळी झालेल्या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज अनुक्रमे १० मिनिटे, अर्धा तास, १५ मिनिटे आणि त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

सकाळी ११ वाजता विधानसभेच्या कामकाजाला प्रारंभ होताच महायुतीच्या आमदारांनी अबू आझमी यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. या वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांनीही अबू आझमी यांना निलंबित करण्याची मागणी केली. या वेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्व सदस्यांना शांत रहाण्याचे आवाहन केले; मात्र गोंधळ न थांबल्यामुळे अध्यक्षांनी दिवसभरासाठी कामकाज स्थगित केले.

या देशद्रोह्याला विधीमंडळात बसण्याचा अधिकार नाही ! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

औरंगजेबाने ४० दिवस धर्मवीर संभाजी महाराज यांच्यावर अत्याचार केले. त्यांचा धर्म पालटण्यासाठी प्रयत्न केले. औरंगजेबाने हिंदूंची अनेक मंदिरे पाडली. महिलांवर अत्याचार केले. स्वत:च्या बापाला कारागृहात टाकले आणि भावाची हत्या केली. धर्मवीर संभाजी महाराज यांच्या या मारेकर्‍याचे अबू आझमी याने गोडवे गायले. अबू आझमी याने यापूर्वीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी चुकीचे वक्तव्य केले आहे. अबू आझमी सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचा जाणीवपूर्वक अवमान करतो. या देशद्रोह्याला विधानसभेत बसण्याचा अधिकार नाही.

औरंगजेबाची कबर तोडण्याचा निर्णय आताच व्हायला हवा ! – भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार

मतांच्या तुष्टीकरणासाठी अबू आझमी औरंगजेबाचे उदात्तीकरण करत आहे. अध्यक्षांच्या आसनाच्या वर ‘धर्मचक्र प्रवर्तनाय’ लिहिले आहे आणि सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांचे तैलचित्र आहे. त्यामुळे अध्यक्षांना राज्यघटनेचा दांडपट्टा चालवून अबू आझमी यांच्यावर कारवाई करावी. औरंगजेबाची कबर तोडण्याचा निर्णयही सरकारने आताच घ्यावा.

औरंगजेबाच्या पिलावळीला ठेचून काढा ! – आमदार महेश लांडगे

भाजपचे आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘मुसलमान समाजाची मते मिळावी, यासाठी अबू आझमी औरंगजेबाचे उदात्तीकरण करत आहेत. अशा औरंगजेबाच्या पिलावळीला ठेचून काढले पाहिजे.’

अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा खटला नोंदवा ! – आमदार अतुल भातखळकर

भाजपचे आमदार अतुल भातखळ

भाजपचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले, ‘‘औरंगजेबाने तुळजापूर येथील श्री भवानीमातेचे मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. हिंदूंवर जीझिया कर लावला. काशी विश्‍वनाथाचे मंदिर उद्ध्वस्त केले. अशा औरंगजेबाचे उदात्तीकरण करणार्‍या अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा खटला नोंदवावा आणि अधिवेशनापुरते निलंबित करावे.’’

अबू आझमी यांना विधीमंडळात बसण्याचा अधिकार नाही ! – मंत्री गुलाबराव पाटील

मंत्री गुलाबराव पाटील

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, ‘‘औरंगजेबाचे उदात्तीकरण करणार्‍या अबू आझमी यांना विधीमंडळात बसण्याचा अधिकार नाही.’’

‘हाल हाल करून मारला आमचा छावा…
औरंग्याच्या औलादीला माफी मागायला लावा !’

अबू आझमी यांच्या विधानाच्या निषेधार्थ विधानभवनाच्या पायर्‍यांवर भाजप महायुतीच्या समविचारी आमदारांनी ४ मार्चला आंदोलन केले. या आंदोलनामध्ये ‘हाल हाल करून मारला आमचा छावा… औरंग्याच्या औलादीला माफी मागायला लावा’, अशी मागणी करत आमदार महेश लांडगे सहभागी झाले होते.

विधान परिषदेचे कामकाजही दिवसभरासाठी स्थगित !

विधान परिषदेतही महायुतीच्या आमदारांनी अबू आझमी यांच्या निलंबनाची मागणी केली. या वेळी झालेल्या गोंधळामुळे प्रारंभी १५ मिनिटे, त्यानंतर अर्धा तास आणि त्यानंतर दिवसभरासाठी विधान परिषदेचे कामकाज स्थगित करण्यात आले.

विधान परिषद कामकाज

अबू आझमी याला आजच्या आज देशद्रोहाखाली अटक करा ! – प्रवीण दरेकर, भाजप आमदार

भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर

मुंबई – औरंग्याचे उदात्तीकरण करणार्‍या अबू आझमीवर राजद्रोह आणि देशद्रोहाचे गुन्हे नोंद करून त्यांच्यावर देशद्रोहाखाली तात्काळ अटकेची कारवाई करावी, अशी मागणी भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत केली.

आमदार दरेकर म्हणाले, ‘‘ज्यांनी काल औरंग्याची आरती ओवाळली, त्यांच्याच पिलावळीने मागील वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या स्मृतीदिनी सामाजिक माध्यमांवर औरंगजेब, टिपू सुलतान यांना ‘हिरो’ ठरवणारे आणि महाराजांचा अपमान करणारे ‘स्टेटस’ ठेवले होते. त्यानंतर संभाजीनगर, अकोला, शेवगाव, संगमनेर, कोल्हापूर आणि राज्यातील इतर भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या. राज्यातील कायदा-सुव्यवस्था कोण बिघडवत आहे ? तरुणांची डोकी भडकावून राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न कोण करत आहे ? त्यामुळे औरंग्याचे उदात्तीकरण करणार्‍या अशा सदस्याला आजच्या आज देशद्रोहाखाली अटक करावी.’’