
अमेरिकेने युक्रेनला दिले जाणारे सैन्यसाहाय्य थांबवले आहे. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेंस्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या जगप्रसिद्ध वादावादीनंतरचा हा निर्णय आहे. अमेरिकेने सैन्य साहाय्य थांबवल्याने कमकुवत झालेल्या युक्रेनला युरोपीय देशांचे साहाय्य घेण्याविना पर्याय उरणार नाही. आता अमेरिकेच्या युरोपीय देशांशी असलेल्या संबंधांतही काहीसे तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे युरोपीय देशांचे पारडे युक्रेनकडे झुकण्याची शक्यताही वाढली आहे. रशिया-युक्रेन युद्ध, अमेरिकेतील सत्तापालट आणि युरोपमधील देश अन् संभाव्य तिसरे महायुद्ध या तिन्ही घटना एकमेकांवर सखोल परिणाम करणार्या असून त्यांचा गुंतागुंतीचा संबंध आहे. त्यांचे एकमेकांवरील परिणाम आता येत्या काळात संपूर्ण जगावर परिणाम करणारे ठरणार आहेत.
माध्यमांसमोरील वाद पूर्वनियोजित ?
झेलेंस्की आणि ट्रम्प यांच्यातील वाद हा माध्यमांसमोर झाला; पण जागतिक माध्यमांसमोर ‘तो घडवून आणला का ?’, अशीही एक शंका निर्माण व्हायला मोठा वाव आहे; कारण सहसा राष्ट्राध्यक्षांमधील एवढे महत्त्वाचे संभाषण जागतिक माध्यमांसमोर होत नाही. संभाषणानंतर नेते बाहेर येऊन माध्यमांना ‘काय झाले ?’ याचे वृत्त देतात. युद्धबंदीविषयीचे संभाषण हे साधे नाही. हे थेट तिसर्या महायुद्धावर पर्यायाने संपूर्ण जगावर परिणाम करणारे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ट्र्रम्प यांच्यासारख्या हुशार राष्ट्राध्यक्षाला ‘झेलेंस्की काय बोलू शकतात ?’ हे ठाऊक नसणार, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. आतापर्यंत रशियाने २५ वेळा युद्धविरामाचा तह मोडला आहे, हे ट्रम्प यांना ठाऊक आहेच ना ? तरीही त्यांनी युक्रेनलाच माघार घेण्याची विनंती केल्यावर निकराने झुंज देणारे झेलेंस्की चिडणे, हे स्वाभाविकपणे होणार, हे ट्रम्प जाणून असणार, असे म्हणण्यासही वाव आहे. त्यामुळेच ‘हे संभाषण माध्यमांसमोर घडवून आणले का ?’, असाही प्रश्न निर्माण होत आहे. त्यातून ‘युक्रेनच शांतीसाठी सिद्ध नाही’, असे चित्र जगापुढे गेले. एवढ्या उच्च स्तरावरील व्यक्तींच्या आणि आंतरराष्ट्रीय संबंधांच्या या गोष्टी आहेत. त्यामुळे ‘ट्रम्प यांना केवळ झेलेंस्की यांना उघडे पाडायचे होते, त्यासाठी त्यांनी त्यांच्या दोषांचा लाभ उठवला का ?’, असेही वाटते. अन्यथा आज महासत्ताधीश असलेल्या ट्रम्प यांना एखादी गोष्ट साध्य करून घ्यायची आहे, तर ती कशी करून घ्यायची ? याची नीती आणि शक्ती त्यांच्याजवळ निश्चित आहे; परंतु त्याचा वापर न करता या घटनेत ‘चर्चा वेगळ्या दिशेला भरकटली आहे’, हे त्यांना जगाला दाखवायचे आहे’, असे कुणाला वाटले तर चूक नव्हे ! दोन्ही राष्ट्राध्यक्षांनी वादावादी होऊनही कुठल्याही माध्यमांना प्रसारण बंद करणे भाग पाडलेले नाही. युक्रेनला सर्वतोपरी साहाय्य करण्याची सिद्धता असतांना, तिसरे महायुद्ध टाळण्याचा मोठा विचार करत असतांना ‘युक्रेनने ऐकले नाही’, हे अमेरिकेला जगाला दाखवायचे आहे. असे जर असेल, तर ट्रम्प त्यात जिंकले आहेत. त्यांना जर युक्रेनला काही करून ऐकणे भाग पाडायचेच आहे, तर ते वेगळा दबाव निर्माण करू शकले असते.
प्रसिद्धीची हाव !

‘झेलेंस्की यांना काही प्रमाणात प्रसिद्धीही हवी असते’, असेही म्हटले जाते; शेवटी त्यांची मूलतः कलाकाराची वृत्ती आहे आणि छायाचित्रकाच्या माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी मिळत असेल, तर ती मिळवत रहाणे, ही कुठल्याही कलाकाराची एक प्रकारे वृत्तीच बनून जाते. यापूर्वीही त्यांनी माध्यमांसमोर रहाणे पसंत केल्याचे म्हटले जाते. झेलेंस्की अमेरिकेला जाण्यामागे एक महत्त्वाचे कारण होते, ते म्हणजे त्यांना खनीकर्म प्रकल्पाच्या संदर्भात काही तह करायचे होते; जे प्रत्यक्षात त्यांच्या देशातूनही होणे शक्य होते; मात्र ते अमेरिकेला येऊनच करायचे, असा त्यांचा आग्रह होता. यामागे ‘आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी हाही त्यांचा एक हेतू होता’, असेही राजकीय विश्लेषकांकडून म्हटले जात आहे. हे जर खरे असेल, तर मात्र ट्रम्प यांनी त्यांना आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी देऊन एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. एक म्हणजे त्यांची कडक आणि कठोर भूमिका स्पष्ट केली आहे. दुसरे असे की, युक्रेनची चूक जगापुढे दाखवून ते नामानिराळे झाले आहेत. संभाव्य तिसरे महायुद्ध झाल्यावर या वादावादीच्या घटनेला इतिहासात एक वेगळे महत्त्व येणार आहे. त्यात ‘अमेरिकेने पालकत्वाची, सावध करण्याची भूमिका बजावली होती’, हे असे चित्र निर्माण होणार आहे. तिसरे म्हणजे यातून रशियालाही योग्य तो संदेश गेला आहे आणि अन्य युरोपीय राष्ट्रांनाही गेला आहे.
रशिया-अमेरिका संबंध हाही एक वेगळा मोठा भाग आहे. आतापर्यंत अमेरिकेने युक्रेनलाही पुष्कळ मोठ्या प्रमाणात साहाय्य केले आहे. रशियाने ४ पावले मागे येणे महत्त्वाचे आहे; हेही खरे असले, तरी युक्रेनची न वाकण्याची भूमिकही तितकीच ठाम आहे. या घटनेनंतर लगेच ब्रिटनने युक्रेनला आर्थिक साहाय्य केले आहे. ब्रिटन आता ‘ब्रेक्झिट’ (‘युरोपीय युनियन’ या संघटनेतून बाहेर पडलेला) आहे.
युरोपीय देशांशी वाकडे !

या प्रकरणानंतर ‘अमेरिका युक्रेनवर दबाव टाकून वदवून घेत आहे’, असे चित्रही युरोपीय देशांत गेले आहे. ‘नाटो’ ही ३० युरोपीय देशांची संघटना असल्याने त्यांच्यापैकी कुठल्या देशावर आक्रमण झाले, तर ते एकमेकांना साहाय्य करणार, असा त्यांचा करार आहे; मात्र ‘ट्रम्प आता ‘नाटो’ला जुमानत नाहीत’, असे लक्षात येते. राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ट्रम्प म्हणाले होते की, अमेरिकेकडून वारंवार नाटो देशांची काळजी घेतली जाते; परंतु त्यांच्याकडून अमेरिकेचे संरक्षण केले जात नाही. आतापर्यंत अमेरिकेने युरोपातील अनेक देशांना युद्धसज्जतेसाठी पैसे पुरवले होते; परंतु या देशांनी त्या पैशांतून रस्ते आदी विकासाची कामे केली आहेत आणि त्या माध्यमातून ते मिरवत आहेत. त्यामुळे ट्रम्प त्यांना अमेरिकेकडून मिळणारे आर्थिक साहाय्य कधीही थांबवू शकतात, अशी स्थिती आहे. या सर्वांचा अल्प-अधिक परिणाम युरोपातील देशांवर होऊन त्यांच्या मनात ट्रम्प यांच्या विरोधात काही ना काही खदखद निर्माण होऊ शकते. अमेरिकेने काही युरोपीय देशांची साथ सोडली, तर अर्थकारण आणि शस्त्रसज्जता यांवर त्याचा परिणाम होऊन त्यांना एकतर रशिया किंवा चीन यांचे साहाय्य घ्यावे लागू शकते अन् रशिया किंवा चीन याचा लाभ उठवू शकतात. वरील सर्व घटना संभाव्य तिसर्या महायुद्धावर काही ना काही परिणाम करणार्या कशा ठरू शकतात, हे येणार्या काळात दिसेल.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील घटनांचे एकमेकांवर होणारे परिणाम संभाव्य तिसर्या महायुद्धावर परिणाम करतील ! |