US Stopped Military Aid To Ukraine : अमेरिकेने युक्रेनचे सैनिकी साहाय्य रोखले !

१०० कोटी डॉलर्स (८ सहस्र ७२६ कोटी रुपये) किमतीच्या दारुगोळ्यावर होणार परिणाम

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेकडून युक्रेनला रशियाविरोधात केले जाणारे सैनिकी साहाय्य रोखण्याचा आदेश राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी दिला. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांचा ट्रम्प यांच्यासमवेत नुकत्याच झालेल्या वादाचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर १०० कोटी डॉलसच्या शस्त्रस्त्र आणि दारुगोळा यांच्या पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

१. ‘व्हाईट हाऊस’मधील (अमेरिकेच्या अध्यक्षांचे कार्यालय तथा निवासस्थान येथील) एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, झेलेंस्की यांना शांतता हवी आहे, याची ट्रम्प यांना जोपर्यंत निश्चिती होत नाही, तोपर्यंत हे साहाय्य बंद रहाणार आहे. युक्रेनला आमच्याकडून मिळणारे साहाय्य रोखण्याच्या निर्णयानंतर आम्ही त्या निर्णयाच्या परिणामांवर आणि रशिया-युक्रेनमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.

२. झेलेंस्की यांचे म्हणणे आहे की, त्यांना सुरक्षेची निश्चिती हवी आहे. यापूर्वी झेलेंस्की यांनी म्हटले होते की, सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यातील परिस्थिती पहाता हे युद्ध लवकर थांबेल, असे वाटत नाही.

३. ट्रम्प यावर म्हणाले की, झेलेंस्की यांचे हे वक्तव्य चुकीचे असून मी त्याचा निषेध करतो.