शून्य कार्बन उत्सर्जनाचे ध्येय गाठण्यास होणार मोठे साहाय्य !
नवी देहली – डिझेलविना विद्युतीकरणाकडे वळलेली भारतीय रेल्वे आता आणखी एक नवे तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी सज्ज झाली आहे. रेल्वे मंत्रालय भारतात हायड्रोजनवर चालणारी रेल्वेगाडी चालू करण्याची सिद्धता करत आहे. ही हायड्रोजन रेल्वेगाडी मार्च २०३१ मध्ये भारतामध्ये धावण्याची शक्यता आहे.
१. भारतातील पहिली हायड्रोजन रेल्वेगाडी चेन्नई येथील ‘इंटिग्रल कोच फॅक्टरी’ (आयसीई) येथे सिद्ध केली जात आहे. हायड्रोजनवर धावणार्या रेल्वेगाडीमुळे शून्य कार्बन उत्सर्जनाचे ध्येय गाठण्यास मोठे साहाय्य होणार आहे.
२. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये रेल्वे मंत्रालयाने ३५ ‘हायड्रोजन फ्युअल सेल’ आधारित रेल्वे विकसित करण्यासाठी २ सहस्र ८०० कोटी रुपयांच्या निधीस हिरवा कंदिल दिला होता.
३. भारतातील पहिली हायड्रोजन रेल्वेगाडी हरियाणा राज्यात ८९ किमी लांबीच्या जिंद-सोनीपत विभागात धावण्याची शक्यता आहे.
४. जानेवारीत ‘आयसीई’चे महाव्यवस्थापक यू. सुब्बाराव म्हणाले होते की, भारताने अलीकडेच जगातील सर्वाधिक क्षमतेचे हायड्रोजनवर चालणारे रेल्वेगाडीचे इंजिन विकसित केले आहे. बहुतांश देशांनी ५०० ते ६०० हॉर्सपॉवर क्षमतेची हायड्रोजन रेल्वेगाडी सिद्ध केली आहे, तर भारताने १ सहस्र २०० हॉर्सपॉवर क्षमतेचे इंजिन सिद्ध करून मोठे यश मिळवले आहे.