Bangladesh Is Rewriting Textbooks : महंमद युनूस सरकारने अभ्यासक्रमातून ‘बांगलादेशाच्या स्वातंत्र्यात भारताचे योगदान’ हा धडा वगळला !

बांगलादेशाचा भारतद्वेष !

महंमद युनूस

ढाका – बांगलादेशात पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार उलथवून टाकल्यानंतर, महंमद युनूस यांच्या अंतरिम सरकारने तेथील अभ्यासक्रमातही पालट करणे चालू केले आहे. युनूस सरकारच्या सूचनेनुसार, बांगलादेशाच्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक मंडळाने वर्ष २०२५ च्या शैक्षणिक वर्षात शालेय अभ्यासक्रमातून शेख मुजीबुर रहमान यांच्याशी संबंधित मजकूर अल्प केला आहे. शेख मुजीबुर रहमान हे बांगलादेशाचे संस्थापक आणि पहिले राष्ट्रपती होते. यासह या अभ्यासक्रमातून ‘बांगलादेशाच्या स्वातंत्र्यात भारताचे योगदान’ हा धडा काढून टाकण्यात आले आहे.

१. या पुस्तकात उल्लेख केलेल्या इतर राजकीय व्यक्तींमध्ये मुस्लिम लीग पक्षाचे माजी नेते मौलाना अब्दुल हमीद खान भशानी, अखंड बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि हिंदुविरोधी हुसेन सुहरावर्दी, मुस्लिम लीगचे माजी नेते आणि पूर्व पाकिस्तानचे पंतप्रधान अबुल कासिम फजलुल हक आणि शेख हसीना यांच्या प्रतिस्पर्धी खालिदा झिया आणि त्यांचे पती आणि माजी राष्ट्रपती झियाउर रहमान यांचा समावेश आहे. आता या सर्वांचा इतिहास धड्यामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.

२. इयत्ता चौथीच्या बंगाली पुस्तकांमधून ‘मुजीब माने मुक्ती’ (मुजीब म्हणजे स्वातंत्र्य) हे वाक्य काढून टाकण्यात आले आहे.

३. मागील पुस्तकांमध्ये २६ मार्च १९७१ या दिवशी स्वातंत्र्याची पहिली घोषणा करण्याचे श्रेय शेख मुजीबुर रहमान यांना देण्यात आले होते; मात्र आता हे श्रेय झियाउर रहमान यांना देण्यात आले आहे.

४. बांगलादेश सरकारने सर्व पाठ्यपुस्तकांमधून शेख हसीना यांचे नाव पूर्णपणे काढून टाकले आहेत. पूर्वीच्या पुस्तकांच्या मागील पृष्ठावर शेख हसीना यांचा विद्यार्थ्यांना दिलेला पारंपरिक संदेश छापलेला असायचा, तोही काढून टाकण्यात आला आहे.

५. बांगलादेश शिक्षण मंत्रालयाने नियुक्त केलेल्या ५७ तज्ञांच्या पथकाने हा सुधारित अभ्यासक्रम सिद्ध केला आहे.

बांगलादेशाच्या स्वातंत्र्याला मान्यता देणारा पहिला देश म्हणून भारताचे नाव वगळले !

बांगलादेशाच्या स्वातंत्र्याला मान्यता देणारा पहिला देश म्हणून भारताचे नाव पुस्तकांच्या नवीन आवृत्त्यांमधून काढून टाकण्यात आले आहे. भारताच्या या ठिकाणाचे नाव पालटून भूतान करण्यात आले आहे. बांगलादेशाच्या पाठ्यपुस्तकांच्या सुधारित आवृत्तीत असे म्हटले आहे की, ३ डिसेंबर १९७१ या दिवशी बांगलादेशच्या स्वातंत्र्याला मान्यता देणारा भूतान हा पहिला देश होता.

संपादकीय भूमिका

भारताला इतका पाण्यात पहाणार्‍या बांगलादेशाशी भारत सरकार सर्व संबंध तोडून का टाकत नाही ? बांगलादेशाने हिंदूंवर अत्याचार करत रहायचे, देशाचा अपमान करत रहायचा आणि आपण सर्व निमूटपणे सहन करत रहायचे, हे भारताच्या स्वाभिमानाला धक्का पोचवणारे आहे !