आज जगात जे काही थोडेफार बरे चालले आहे, ते केवळ शिक्षेच्या भीतीपोटी’, असे म्हणतात. साम, दाम, दंड आणि भेद ही चतुःसूत्री राजकारण अन् समाजकारण यांमध्येही उपयुक्त आहे. यातील दंड म्हणजेच शिक्षा हे तत्त्व मात्र शिक्षणव्यवस्थेत गेल्या काही वर्षांमध्ये हेटाळले जाऊ लागले आहे. ‘विनामूल्य आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार’ या कायद्यानुसार शालेय शिक्षणात शारीरिक शिक्षा प्रतिबंधित आहे. ‘छडी लागे छमछम, विद्या येई घमघम’, असे म्हणता म्हणता मानवी मूल्य आणि अधिकार यांसारख्या नावांच्या आडून शालेय शिक्षणातून ‘छडी’ कधी शाळाबाह्य झाली, ते कळलेच नाही. केरळ उच्च न्यायालयाने मात्र छडीविषयी नुकत्याच नोंदवलेल्या निरीक्षणात ‘एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्याला हलकेच मारले, धक्का दिला आणि त्यात दुर्भावना नसेल, तर ते गुन्ह्याचे प्रकरण ठरणार नाही. शिक्षकांना छडी बाळगण्याची अनुमती असावी. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त रहाते’, असे म्हटले आहे.
आजकाल शिक्षेऐवजी समुपदेशन आणि मार्गदर्शन यांचा समावेश शिक्षणात केला जातो. शिक्षेपेक्षाही संवाद, सहानुभूती, समज यांद्वारे विद्यार्थ्यांना घडवावे, असा विचार दृढ होत आहे. हे आवश्यक आहेच; पण चांगले वळण लागण्यासाठी योग्य त्या प्रमाणात शिक्षाही आवश्यक आहे. ‘छडी नको’, असे म्हणणार्यांनी स्वतः शालेय जीवनात शिक्षकांकडून किती छड्या खाल्ल्या आहेत ?, हे प्रामाणिकपणे सांगावे. काही शिक्षकांनी दिलेल्या आततायी शिक्षेमुळे विद्यार्थ्यांना शारीरिक दुखापत होण्याच्या घटना घडल्या आहेत; पण ‘तशा’ काही घटनांचे भांडवल करून ‘शिक्षा किंवा छडी’ नकोच, असे म्हणणे हाही आततायीपणा नाही का ? रस्त्यांवरील काही चुकीच्या दुभाजकांमुळे काही अपघात घडले आहेत; पण म्हणून ‘दुभाजकच नकोत’, असे म्हणणे कितपत योग्य आहे ? मानवी मूल्यांच्या नावाखाली जर आपण विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लागण्यापासून दूर नेणार असू, तर याचा गांभीर्याने विचार होण्याची आवश्यकता आहे, अन्यथा उद्या ‘उशिरा उठणे’, हे मुलांचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे, ‘अपशब्द वापरणे’ हे भाषणस्वातंत्र्य आहे’, असे म्हटले जाईल. असे होऊ नये, यासाठीच ‘तारतम्य’ हा गुण अंगी असणे आवश्यक आहे. संतुलित विचार, योग्य निर्णयक्षमता, तसेच स्वतःवर नियंत्रण यांचे एकत्रीकरण म्हणजे तारतम्य ! हे तारतम्य किंवा इतरही सद्गुण सध्याच्या शिक्षणाने विकसित होतातच, असे नाही; किंबहुना सद्गुणांऐवजी हेकेखोरपणाच अंगी निर्माण होत असल्याचे चित्र आहे. ‘छडी नको’चा विचारप्रवाह, म्हणजे एक प्रकारे पिढी उद्ध्वस्त करणारे ‘टूलकिट’ तर नाही ना ?, अशी शंकाच आहे. त्यामुळे शिक्षणाचे खर्या अर्थाने भारतियीकरण होण्याची आवश्यकता आहे. सरकारने नवे शैक्षणिक धोरण लागू केले असले, तरी त्याची प्रत्यक्ष आणि प्रभावी कार्यवाही होण्यावर त्याची उपयुक्तता अवलंबून आहे. मुले ही मातीचा गोळा असतात. त्यांना आकार देण्यासाठी बाहेरून थापटावे लागते आणि आतून आधार द्यावा लागतो, हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी भारताची प्राचीन गौरवशाली गुरु-शिष्य परंपरा अंगीकारणे उपयुक्त ठरेल. ती परंपरा कायम राखली असती, तर आज असे प्रश्नच उद्भवले नसते.
वाईट सवयी चटकन जडतात; पण चांगल्या सवयींसाठी शिस्त आणि शिस्तीसाठी शिक्षा आवश्यक असते ! |