सनातन संस्थेच्या भाषाशुद्धी आणि सात्त्विक कला यांच्या आग्रहामागील कार्यकारणभाव !

‘सनातन संस्था समाजात अध्यात्मप्रसारासाठी विविध सात्त्विक उत्पादने, उदा. नामपट्ट्या, देवतांची सात्त्विक चित्रे, भेटसंच, पंचांग इत्यादी, तसेच नियतकालिकांतील लेख, विविध ग्रंथ इत्यादींची निर्मिती करते. या सर्व प्रसारसाहित्याची निर्मिती करतांना सात्त्विक आणि शुद्ध भाषा, तसेच सात्त्विक कला यांचा आग्रह धरला जातो. यामागील आध्यात्मिक कारण येथे दिले आहे. 

१. समाजाकडून प्रसारसाहित्याला दिला जाणारा प्रतिसाद

सनातनचे प्रसारसाहित्य पाहून समाज ‘हिंदी भाषेतील प्रसारसाहित्यात क्रियापद जोडून लिहिले जाते, त्यामुळे आम्हाला ते कळत नाही. ती हिंदी ऐवजी मराठी भाषा वाटते, उदा. ‘श्रीरामाने रावणाचा वध केला’, हे वाक्य संस्कृतनिष्ठ हिंदीनुसार ‘श्रीरामने रावणका वध किया ।’, असे लिहिण्यात येईल; पण प्रचलित हिंदीत ‘श्रीराम ने रावण का वध किया ।’, असे लिहिण्यात येते. ‘प्रसारसाहित्यातील कला एकदम साधी आहे, ती थोडी बटबटीत हवी’, ‘प्रसारसाहित्यात प्रचलित उर्दू आणि इंग्रजी भाषेतील शब्द यांचा वापर अल्प असल्यामुळे ते कळण्यात अडचण येते’, उदा. ‘पोलिसांत किंवा न्यायालयात तक्रार दाखल करणे’, यासाठी ‘परिवाद (हिंदी)’ ऐवजी प्रचलित ‘शिकायत (उर्दू)’, ‘अधिवक्ता (संस्कृतनिष्ठ) ऐवजी वकील (उर्दू), सहस्र (संस्कृत) ऐवजी हजार (उर्दू), चरण प्रति चरण (हिंदी) ऐवजी चरण दर चरण (उर्दू), धर्मनिरपेक्ष (हिंदी) ऐवजी सेक्युलर (इंग्रजी) इत्यादी. त्यांना अपेक्षित शब्द नसेल, तर ते ‘भाषा कठीण आहे’, अशी टीका करतात. ती ऐकून अध्यात्मप्रसार करणार्‍या अनेक साधकांच्या मनातही ‘समाजाला हवे तसे प्रसारसाहित्य सिद्ध करायला हवे’, असे विचार येत आहेत.

२. शुद्ध आणि सात्त्विक प्रसारसाहित्य निर्माण करण्यामागील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा दृष्टीकोन 

‘अध्यात्मप्रसाराच्या सेवेसाठी साधक निर्माण करत असलेल्या प्रसारसाहित्यातून त्यांची साधना व्हावी’, असा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा दृष्टीकोन आहे. समाजाकडून होणार्‍या टिकेच्या संदर्भात एकदा एका सत्संगात बोलतांना गुरुदेव म्हणाले, ‘रुग्ण मागतील ती औषधे वैद्य त्यांना देतो का ? नाही ! रुग्णाची प्रकृती बरी होण्यासाठी आवश्यक आहे, तेच औषध वैद्य देतो, तसेच सनातनचे (सनातन संस्थेचे) आहे. ‘समाजाला काय हवे ?’ ते नाही, तर ‘काय आवश्यक आहे ?’ ते आपण द्यायचे आहे.’

श्री. निषाद देशमुख

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी शुद्ध आणि सात्त्विक प्रसारसाहित्य निर्माण करण्यामागील कार्यकारणभाव 

३ अ. कर्म आणि त्याचे मिळणारे फळ : सरकारी अधिकारी, अधिवक्ता, पोलीस, आधुनिक वैद्य (डॉक्टर) इत्यादींचे जनतेला सेवा उपलब्ध करून देण्याचे दायित्व असूनही भ्रष्टाचार करून अधिक पैसे मिळावेत; म्हणून ते त्यांचे दायित्व पार न पाडता जनतेला त्रास देतात. अशा प्रकारे क्रियमाणाचा योग्य उपयोग न केल्याने पुढे त्यांना त्याचे तीव्र त्रास भोगावे लागतात. ‘कर्माचे फळ कसे असते ?’, हे समजण्यासाठी महाभारतातील दोन उदाहरणे बघू.

१. द्रौपदीचे वस्त्रहरण होतांना भीष्मांमध्ये ते थांबवण्याची क्षमता असूनही त्यांनी त्याचा विरोध केला नाही. ‘मौन म्हणजे समर्थन’ या न्यायानुसार भीष्मांना द्रौपदी वस्त्रहरणाचे पाप भोगावे लागले.

२. युद्धभूमीत (आपत्काळात) द्रोणाचार्य यांनी ‘हत्ती कि नर ? कोणता अश्वत्थामा मारला गेला ?’, असे विचारल्यावर युधिष्ठिर त्याचे उत्तर द्यायला उद्युक्त झाला. युधिष्ठिराला पाप करण्यापासून परावृत्त करावे; म्हणून श्रीकृष्णाने मध्येच शंखनाद केला. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाच्या कृपेमुळे युधिष्ठिराने पूर्ण उत्तर दिले नाही. असे असले, तरी या प्रसंगात युधिष्ठिर त्याच्या मनाप्रमाणे वागत होता, परिणामी अधर्माच्या पक्षाला साहाय्य करणारे द्रोणाचार्य बलवान होऊन धर्म पक्षाची हानी झाली असती. युधिष्ठिराच्या या मनाप्रमाणे वागण्याचे पाप त्याला लागले. त्यामुळे त्याचा भूमीहून काही इंच वर हवेत चालणारा रथ भूमीला स्पर्श करून चालू लागला. यातून ‘जरी अर्धे पापकर्म झाले, तरी त्याचे पाप भोगावे लागते’, हे स्पष्ट होते.

३ आ. शुद्ध आणि सात्त्विक प्रसारसाहित्याच्या निर्मितीमुळे साधक आणि समाज यांच्यातील देवाण-घेवाण नष्ट होणे : आध्यात्मिक स्तरावर विचार केल्यास साधकांनी प्रसारसाहित्य बनवून समाजाला देणे आणि त्यासाठी अर्पणमूल्य घेणे, हे देखील एक प्रकारे देवाण-घेवाण कर्मच आहे. या प्रसंगात ‘साधकांनी समाजाला अधिकाधिक सात्त्विकता देणे’, हे त्यांचे आध्यात्मिक कर्तव्य आहे. याच प्रकारे समाजाचीही ‘आध्यात्मिक संस्थांकडून सात्त्विक उत्पादने मिळावीत’, अशीच अपेक्षा असते. असे असतांना समाजाची मागणी आहे; म्हणून साधकांनी शुद्ध भाषा नसलेले लेख आणि ग्रंथ, असात्त्विक कला असलेली उत्पादने यांचे समाजात वितरण केले, तर पूर्ण आयुष्यात त्यांची कधी आध्यात्मिक उन्नती होईल का ? याउलट कितीतरी पट अधिक पाप त्यांना भोगावे लागेल किंवा ते पाप नष्ट करण्यासाठी त्यांची अनेक जन्मांची साधना नष्ट होईल.

कर्माचे हे गूढतत्त्व लक्षात घेऊन सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सनातन संस्थेच्या आरंभापासून शुद्ध आणि सात्त्विक प्रसारसाहित्याच्या निर्मितीचा आग्रह धरला आहे.

३ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना कर्मबंधनातून मुक्त केल्याने त्यांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होणे : अशा प्रकारे शुद्ध आणि सात्त्विक प्रसारसाहित्याची निर्मिती  अन् वितरण यांतून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधक आणि समाज यांच्यातील देवाण-घेवाण नष्ट करून साधकांची साधना घडवून आणत आहेत. यामुळे अध्यात्मप्रसार म्हणून आध्यात्मिक उत्पादनांचे वितरण करणार्‍या इतर संस्थांच्या तुलनेत सनातन संस्थेच्या साधकांची आध्यात्मिक पातळी अधिक असून त्यांची जलद आध्यात्मिक उन्नतीही होत आहे. याउलट इतर आध्यात्मिक संस्थांतील साधक जीवनभर आध्यात्मिक उत्पादनांचे वितरण करतांना अनेक चुका करत असल्याने त्यांची क्वचितच आध्यात्मिक उन्नती होते.

४. गुरूंनी सांगितलेली कृती सर्व स्तरांवर योग्य आहे, याची खात्री बाळगा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी निर्माण केलेली कार्यपद्धत केवळ आध्यात्मिक स्तरावरच योग्य नसून ती शारीरिक, मानसिक, बौद्धिक इत्यादी सर्वच स्तरांवर योग्य आहे, याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अ. आध्यात्मिक क्षेत्रात प्रतिष्ठित समजले जाणारे ‘गीताप्रेस प्रकाशन’ हे गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथून हिंदी भाषेत साहित्य प्रकाशित करते. गीताप्रेस स्थापन झाल्यापासून आजपर्यंत त्यांच्या हिंदी भाषेतील बहुतांश प्रकाशनांत क्रियापद जोडून लिहिले जाते. त्याला आज लोकमान्यताही प्राप्त झाली आहे. याउलट शुद्ध भाषेच्या आग्रहामुळे आज ‘गीताप्रेस’ हे शुद्ध संस्कृत आणि हिंदी भाषा यांचा वापर करणारे संस्थान’, अशी त्याची प्रतिमा निर्माण झाली आहे.

सनातन संस्थेच्या स्थापनेपासून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीही अशाच शुद्ध आणि संस्कृतनिष्ठ हिंदीची शिकवण हिंदी भाषेची सेवा करणार्‍या साधकांना दिली आहे.

आ. पूर्वीच्या काळात संकेतस्थळाचे (Website चे) मुख्य पान भरगच्च भरलेले हवे, अशी मागणी असायची. याउलट मागील काही वर्षांत ‘गूगल’, ‘मायक्रोसॉफ्ट’ यांसारख्या उच्चभ्रू आस्थापनांचाही ‘क्लीन इंटरफेस (Clean Interface)’ म्हणजे संकेतस्थळाचे (Website चे) मुख्य पान खूप भरलेले न ठेवता त्यात अधिक जागा मोकळी ठेवावी, याकडे कल झाला आहे. ‘क्लीन इंटरफेस (Clean Interface)’ असलेले संकेतस्थळ बघणे आणि वापरणे सोपे जाते’, असे तज्ञांचे मत आहे.

वरील उदाहरणांतून लक्षात येते, ‘अध्यात्मशास्त्र हे एक मोठ्या वृक्षासमान असून बौद्धिक विचार, मानसिक संकल्पना, शारीरिक कृती या त्याच्या शाखा आहेत. आपणा सर्व साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासारखे थोर गुरु भेटले आहेत. ते साधकांना अध्यात्मशास्त्राची शिकवण देत असून ती शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक अशा सर्व स्तरांवर योग्य असते. अशा थोर गुरूंच्या चरणी कोटीशः नमन ! ‘लोकेच्छेऐवजी गुरुइच्छा पालनाची तळमळ सर्व साधकांमध्ये निर्माण व्हावी’, अशी श्री गुरुचरणी प्रार्थना !

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.५.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.