प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे नुकत्याच पार पडलेल्या महाकुंभमेळ्यात भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याचा विषय मोठ्या प्रमाणात चर्चिला गेला. हिंदु राष्ट्राविषयी काही प्रमाणात जागृती अनुभवण्यास मिळाली, तसेच काही गैरसमजही जाणवले. महाकुंभमेळ्याच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राविषयी विचारमंथन जोरात चालू असल्याचे या वेळी प्रकर्षाने लक्षात आले.
स्वामी आनंद स्वरूप यांनी हिंदु राष्ट्राविषयी धोरणात्मक पावले उचलणे !

कुंभमेळ्यात काही ठिकाणी हिंदु राष्ट्राविषयी विचारमंथन झाले असले, तरी शांभवी पीठाधिश्वर स्वामी आनंद स्वरूप यांच्यात हिंदु राष्ट्राविषयी वैचारिक सुस्पष्टता जाणवत होती. ते म्हणाले, ‘‘भारतावर जेव्हा पहिल्यांदा इस्लामी आक्रमण झाले, तेव्हा प्रतिकार करणारा आवाहन आखाडा होता. आखाड्यांनी हिंदु धर्मरक्षणार्थ मोठे योगदान दिले आहे; मात्र आता आखाड्यांचे कार्य आखाडे नीट करत नाहीत, त्यामुळे त्यांची नव्याने पुनर्बांधणी केली पाहिजे, जेणेकरून हिंदु धर्मरक्षणाचे कार्य पूर्वीप्रमाणे होईल.’’
हिंदु राष्ट्रासाठी स्वामी आनंद स्वरूप यांनी पुढाकार घेऊन तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ५०० पानांची राज्यघटनाच सिद्ध करून घेतली आहे. त्याला त्यांनी ‘हिंदु राष्ट्र संविधान’, असे नाव दिले आहे. त्यामध्ये हिंदु राष्ट्रातील पोलीस, प्रशासन, सैन्य, अन्य व्यवस्था कशा असतील ? यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. शंकराचार्यांकडून ही राज्यघटना पडताळून घेऊन त्यांनी सुचवलेले पालट करण्याची त्यांची सिद्धता आहे. हिंदु राष्ट्राचा विचार करतांना अनेक हिंदुत्वनिष्ठांना वाटते की, हिंदु राष्ट्र चालवण्याचे काही घटनात्मक नियम असावेत. स्वामी आनंद स्वरूप महाराज यांनी हिंदु धर्माधिष्ठित राज्यप्रणालीसाठी प्रथम राज्यघटना कशी असू शकते ?, याचा एक मोठा प्रयत्न केला. यामुळे काही प्रमाणात चर्चा तर होणारच ! हिंदु राष्ट्राची चर्चा नियम स्वरूपात बांधण्याचा त्यांचा हा चांगला प्रयत्न म्हणावा लागेल. अनेक माध्यमांनी त्यांच्या या कृतीची नोंद घेतली. ही राज्यघटना ते लोकांपुढे ठेवून ती पंतप्रधानांना कार्यवाहीसाठी सुपुर्द करणार आहेत. हिंदु राष्ट्राविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करणार आहेत.
– श्री. यज्ञेश सावंत
१. हिंदु राष्ट्राविषयी अपसमज
काही साधू-महाराजांना हिंदु राष्ट्राविषयी माध्यमांनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी ‘हिंदु राष्ट्र आणायचे असे नसून सध्या भारतात हिंदु राष्ट्र आहेच’, असे सांगितले. त्यांचे म्हणणे होते, हिंदू बहुसंख्य आहेत, केंद्रस्थानी आणि अनेक राज्यांमध्ये हिंदुत्वनिष्ठ पक्षच आहेत, तर हिंदु राष्ट्र आहेच. ‘हिंदु राष्ट्र आणू’, असे म्हणणे अयोग्य आहे.’ एका धर्माचार्यांनी तर ‘हिंदु राष्ट्र वेगळे काय आहे, हे हिंदु राष्ट्र आहेच’, असे सांगितले. एका धर्माचार्यांनी ‘मी घोषित करतो की, आजपासून भारत हिंदु राष्ट्र आहे.’ ‘भारतात वर्तमानात हिंदु राष्ट्राचीच परिस्थिती आहे, त्यामुळे वेगळे काही करण्याची आवश्यकता नाही’, असाच एकंदर काही साधू-संतांचा सूर होता.
२. ‘हिंदु राष्ट्र आहे’, हे सांगणारे सरकार नियुक्त साधू-संत !
महाकुंभमेळ्यातील शांभवी पिठाचे स्वामी आनंद स्वरूप यांच्या पत्रकार परिषदेत विषय आला की, ‘हिंदु राष्ट्र वेगळे नाही, आताचे हिंदु राष्ट्रच आहे’, असे काही जण म्हणत आहेत. तेव्हा स्वामी आनंद स्वरूप महाराज यांचे अनुयायी स्वामी दिनेशानंद यांनी पत्रकार परिषदेतच उत्तर दिले, ‘‘भारतात सध्या हिंदु राष्ट्र आहे’, हे सांगणारे सरकार नियुक्त साधू-संत आहेत. या विषयावरून दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. जे असे सांगत आहेत, त्यांना हिंदु राष्ट्र म्हणजे काय, ते तरी माहिती आहे का ?’’
‘भारतात सध्याच्या घडीला बहुसंख्य हिंदू आहेत; म्हणून भारत हिंदु राष्ट्र आहे’, असे अनेक हिंदू, काही हिंदुत्वनिष्ठ पक्ष आणि संघटना यांना वाटते. यामध्ये त्यांची एकतर हिंदु राष्ट्राविषयी सखोल विचारप्रक्रिया झालेली नाही किंवा तेथपर्यंत पोचण्याचीही त्यांची सिद्धता नाही, असेही लक्षात येते.
३. राजकीयदृष्ट्या हिंदुत्व प्रधान पक्ष सत्तेत आले म्हणजे हिंदु राष्ट्र (?)
‘हिंदुत्वाचा उद्घोष करणारे काही हिंदुत्वनिष्ठ पक्ष सत्तेवर आले, म्हणजे हिंदु राष्ट्र आले किंवा तेवढीच हिंदु राष्ट्राची पोच असू शकते’, असाही मतप्रवाह दिसला. यामध्ये ‘राज्य करणारे हिंदूच आहेत ना ? मग हिंदूंसाठी चांगले निर्णय घेणार, त्यालाच हिंदु राष्ट्र साकारणे, असे मूर्तस्वरूपात नंतर होणार’, असा एक भाबडा आशावाद या हिंदूंमध्ये प्रकर्षाने लक्षात आला. हिंदु राष्ट्रात सरकार, प्रशासन, पोलीस, न्याययंत्रणा, सरकारच्या विविध विभागांची कार्यप्रणाली कशी असणार ? त्यातील आदर्श व्यवस्था कशा साकार होणार ? किंवा तशी आदर्श व्यवस्था, म्हणजे हिंदु राष्ट्र असणार इथपर्यंत अजून समष्टी विचारप्रवाह पोचलेला नाही. ‘एखादे मंदिर बांधले, एखादा हिंदुहितैषी निर्णय घेतला की, त्यांना हिंदूंसाठी चांगले दिवस आले’, असेही वाटते. वैचारिक सुस्पष्टता नसल्यामुळे ‘केवळ राजकीय अथवा हिंदूंसाठी काही निर्णय घेणे, म्हणजे हिंदु राष्ट्र आले’, असे वाटते. त्यामुळे असे हिंदू हे हिंदु राष्ट्राच्या प्रयत्नांविषयी एकदम निष्क्रीय होतात.
४. हिंदु राष्ट्राविषयी गोंधळ कि ठरवून केलेले प्रयत्न ?
हिंदु राष्ट्राविषयी काही करायचे हिंदु समुहाने ठरवले की, स्वामी दिनेशानंद यांनी उल्लेख केल्याप्रमाणे काही ‘सरकारी संतां’कडून (सरकार नियुक्त) ‘नको ते प्रयत्न करू नका, हिंदु राष्ट्र आहेच, सध्या वेगळे काही करण्याची आवश्यकता नाही’, असे सांगून हिंदुत्वनिष्ठांची दिशाभूल केली जाते. त्यामुळे वरकरणी जो उत्साह हिंदुत्वासाठी काम करतांना निर्माण झालेला असतो, तो त्यामुळे काहींचा उणावतो. हिंदु राष्ट्र निर्माण होण्याची प्रक्रिया काही थोड्या थोडक्या वर्षांची नसून ती काही पिढ्या चालणारी आहे, असे असले तरी तिचा प्रारंभच होऊ द्यायचा नाही आणि हिंदूंना वेगळ्याच भ्रामक विश्वात ठेवायचे, हे ठरवून तर होत नाही ना ? प्रशासनाला, सध्याच्या व्यवस्थेला काही आव्हान अथवा स्पर्धा निर्माण होत आहे, समांतर व्यवस्था निर्माण होत आहे, अशी भीती आहे का ? वास्तविक अशी भीती कुणीच बाळगण्याचे कारण नाही. राजकीय अथवा कृतीशील हिंदुत्व जोपासणारे काही तरी हेतू ठेवून हिंदुत्वाचे कार्य करत असले, तरी शेवटी कार्य हिंदु धर्माचेच आहे. उलट ते परस्परपूरक होऊ शकते. यासाठी दोहोंनीही हिंदु राष्ट्र म्हणजे काय ? हे समजून घेतले पाहिजे. ‘हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न म्हणजे कुठल्याही प्रस्थापित व्यवस्थेला तडा देऊन काही तरी वेगळी राजकीय व्यवस्था उभारणार’, असेही नाही.
५. हिंदु राष्ट्राचा काय उपयोग ?
पाकिस्तानातील हिंदूंसाठी कार्य करणार्या एका प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठाने सांगितले, ‘हिंदु राष्ट्राचा हिंदूंसाठी काही उपयोग आहे का ? आताचे श्रीमंत हिंदू पाक आणि बांगलादेश येथील पीडित हिंदूंसाठी काही करत नाहीत. हिंदु राष्ट्र आल्यावर या श्रीमंत हिंदूंच्या मानसिकतेत काही फरक पडणार का ? हिंदूंना साहाय्य करणारे कार्यकर्ते उभे करण्यासाठीच सध्या पैसे खर्च करावे लागत आहेत.
आधी हिंदूंना वाचवा, हिंदूच वाचले नाहीत, तर हिंदु राष्ट्र कुणासाठी निर्माण करायचे ?’ असे हिंदुत्वनिष्ठ हिंदूंना हिंदु साहाय्य करत नाहीत, अन्य धर्मीय मात्र त्यांच्यातील आर्थिक अथवा सामाजिक दृष्ट्या खालच्या स्तरावर असलेल्या धर्मबंधूला वर उचलण्यासाठी प्रयत्नशील असतात, हे मान्य आहे; पण हिंदूंना वाचवायचे झाल्यास उपलब्ध निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बळावर ते किती जणांना वाचवू शकणार ? पाक येथील हिंदूंना वाचवायचे, म्हणजे त्यांना भारतात आश्रय देणेच आहे. हिंदूंना वाचवण्यासाठी किती काळ संस्था अथवा संघटनात्मक पातळीवर संघर्ष करत रहाणार ? त्याऐवजी सरकारला ती जाणीव झाली, सरकारच्या मनात ‘हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व’, ही भावना निर्माण झाली की, सरकारकडे असलेल्या मोठ्या यंत्रणेचा हिंदूंसाठी अनेक पटींनी लाभ होऊ शकतो. केवळ हिंदूंनाच वाचवणे एवढ्या मर्यादित स्वरूपात हिंदु हितरक्षणाचे कार्य न रहाता हिंदूंना शालेय जीवनापासून धर्मशिक्षित करणे, धर्माचरणी करणे, त्यांना सत्त्वगुणी बनवणे केल्यास अनेक पटींनी आणि व्यापक स्तरावर हिंदूंची घरे, कार्यालये, परिसर येथे मोठ्या प्रमाणात पालट होईल. त्यातून हिंदूंचे अनेक प्रश्न सुटतील. हिंदूंची मानसिकता पालटल्यास धर्मबंधुत्व तेव्हाच निर्माण होऊन साहाय्य करण्याचा भाग वाढेल, असे वाटते.

६. हिंदु संघटनांचे अनेक प्रकार आणि त्यांचे कार्य समजून घेणे आवश्यक !
याच मोठ्या हिंदुत्वनिष्ठाने येथे हिंदू मृत्यूमुखी पडत आहेत, हिंदूंवर अत्याचार होत आहेत आणि गायीला वाचवण्याचे आवाहन चालू आहे. गायीपेक्षा हिंदूंच्या प्राणांचे मोल अधिक नाही का ? त्यांचे हे सूत्र योग्य आहे की, हिंदूंचे प्राण जात असतांना त्याकडे लक्ष दिले पाहिजे; मात्र हिंदु संघटनांचे अनेक प्रकार आणि त्यांची कार्य करण्याची पद्धत, ध्येय-धोरणे निरनिराळी आहेत. काहींना कदाचित् कार्याचा आवाका केवढा वाढवू शकतो, याविषयीही अज्ञान असू शकते; मात्र गोरक्षणाच्या कार्याद्वारे ते हिंदु धर्माची सेवा करत आहेत, प्राण जोखमीत घालून ते हे करत आहेत, हे कौतुकास्पद आहे. शेवटी देशी गाय वाचणे, हे हिंदूंसाठी स्ववंश वाचवण्याप्रमाणेच आहे.
७. सर्वत्र हिंदु राष्ट्राचा जयघोष
हिंदु राष्ट्राविषयी सर्वसामान्य हिंदूंमध्ये, काही सांप्रदायिकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे. महाकुंभमेळ्यात ‘जय श्रीराम’, ‘गंगा मैय्या की जय’, या घोषणांसह ‘हिंदु राष्ट्रकी जय’, ‘जय हिंदु राष्ट्र’, अशा घोषणाही कानावर पडल्या. विविध संप्रदायांच्या तंबूंमध्ये सकाळच्या आरतीच्या वेळी देवतांच्या जयघोषासमवेतही हिंदु राष्ट्राचा जयजयकारही ऐकू येत आहे. हा एक चांगला पालट आहे. भारत पारतंत्र्यात असतांना स्वातंत्र्याचा उद्घोष प्रथम क्रांतीकारक, नेते, संघटना आणि शेवटी सर्वसामान्य भारतियांकडून होऊ लागला, तेव्हा काही वर्षांनी स्वातंत्र्य साकार झालेले दिसले. असे या जयघोषाचे महत्त्व आहे.
‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द संप्रदाय, धर्माचार्य यांच्या फलकावर दिसू लागला आहे. सर्वसामान्य हिंदूंची तर हिंदु राष्ट्राची मागणी आहेच, त्याला एक जनआंदोलनाचे स्वरूप आल्यावर स्वातंत्र्याच्या आंदोलनाप्रमाणे त्याला गतीमानता येऊन ते राष्ट्रव्यापी बनेल आणि महाकुंभमेळ्यातील दैवी चैतन्याने, देवता, संत-साधू यांच्या आशीर्वादाने हिंदु राष्ट्र सगुण साकार होईलच होईल, यात शंकाच नाही.
श्री गुरुचरणार्पणमस्तु ।
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल, रायगड. (२६.२.२०२५)
संपादकीय भूमिकामहाकुंभमेळ्याद्वारे हिंदु राष्ट्राच्या मागणीला गतीमानता येऊन ते साकार होण्याचा मार्ग सुलभ झाला आहे, हे निश्चित ! |