Sheikh Hasina : मी बांगलादेशात येईन आणि माझ्या लोकांना न्याय मिळवून देईन ! – शेख हसीना

बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना

नवी देहली – भारतात निर्वासित जीवन जगणार्‍या बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी म्हटले आहे की, त्या लवकरच आपल्या देशात परतू शकतात. त्यांनी बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांच्यावर देशाची व्यवस्था रुळावरून घसरवल्याचा आरोप केला आहे. भारतातून प्रसारित केलेल्या एका व्हिडिओ संदेशात त्यांनी म्हटले आहे की, त्या ढाक्याला परत येतील आणि युनूस यांच्या अवैध कारवायांची चौकशी करतील, तसेच लोकांना न्याय मिळवून देतील.

१. अवामी लीग पक्षाच्या नेत्या शेख हसीना यांनी त्यांच्या देशातील लोकांना एका व्हिडिओ संदेशाद्वारे सांगितले की, महंमद युनूस यांच्या सरकारने आतंकवाद्यांना मोकळीक दिली आहे. ते लोकांना मारत आहेत आणि रस्त्यावर गोंधळ माजवत आहेत. त्यांनी बांगलादेशातील संस्था अवैधपणे कह्यात घेतल्या आहेत.

२. शेख हसीना यांनी युनूस यांवर आतंकवाद्यांना सोडण्याचाही आरोप केला आहे. बांगलादेशाच्या पुढील निवडणुकीत त्या अवामी लीगचे नेतृत्व करू शकतात, असे संकेतही त्यांनी दिले.

३. दुसरीकडे हसीना यांना सत्तेवरून काढून टाकण्यासाठी झालेल्या निदर्शनांचे नेतृत्व करणार्‍या विद्यार्थ्यांनी अलीकडेच एका राजकीय पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. महंमद युनूस यांच्या अंतरिम सरकारमध्ये सल्लागार असलेल्या विद्यार्थी नेत्या नाहिद इस्लाम यांनी नवीन पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी अंतरिम सरकारमधून त्यागपत्र दिले आहे.