संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे ! – मंगल प्रभात लोढा

वाकोला पोलीस ठाण्यात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचे प्रकरण

मुंबई – वाकोला पोलीस ठाण्यात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. त्यांनी या प्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्त मनीष कलवानी यांची भेट घेतली, तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही केली.

मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, ‘‘सामाजिक कार्यकर्त्यावर अन्याय होणे आणि पोलिसांकडून त्यांना नाहक त्रास दिला जाणे हे धोकादायक आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलीस यंत्रणेने तात्काळ योग्य ती सुधारणा करणे आवश्यक आहे. या प्रकरणातील संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी मी जिल्हा पोलीस प्रमुखांना केली आहे, तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्याचीही मागणी केली. यातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे स्थानांतर करण्यात आल्याचे समजते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून तिचा अहवाल आल्यानंतर आम्ही पुढील कारवाईचा विचार करू.’’

बजरंग दल कोकण प्रांत सहसंयोजक गौतम रावरीया यांनी सांगितले की, एका धर्मांध जिहाद्याने दुर्गा वाहिनीच्या संयोजिकेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ती वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यासाठी गेली होती; पोलिसांनी तक्रार प्रविष्ट करून घेतली नाही. तिने जिल्हा संयोजक जयकिशन प्रजापती यांना संपर्क केला. ते पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलिसांनी त्यांना ‘तू कशाला आला ? तू मंत्री आहेस का ?’, असे म्हणून त्यांना बाहेर हाकलले. त्यानंतर पोलिसांनी बाहेर येऊन जयकिशन प्रजापती यांना पुन्हा आत नेऊन बेदम मारहाण केली. त्यामुळे या घटनेशी संबंधित ५ ते ६ अधिकार्‍यांचे निलंबन करण्याची मागणी आम्ही केली आहे. येत्या ६ दिवसांत त्यांचे निलंबन झाले नाही, तर आम्ही पुढची दिशा ठरवू.