पोलीस कसायांविरुद्ध तक्रार घेण्यास नकार देऊन गोरक्षकांवर दबाव टाकतात

मानद पशूकल्याण अधिकारी राहुल कदम यांची तक्रार

पोलिसांचा कसायांविरुद्ध तक्रार घेण्यास नकार (प्रतिकात्मक चित्र)

पुणे – ३ गायी आणि १ बैल यांची अवैध वाहतूक होत असल्याची बातमी २२ फेब्रुवारीला मानद पशूकल्याण अधिकारी राहुल कदम यांना मिळाली. त्यांनी त्यांच्या सहकार्‍यांसह स्थानिक लोकांच्या साहाय्याने सदर गाडी ही कात्रज चौकी येथे आणली. तेथील पोलीस अधिकारी समीर शेंडे यांना सदर वस्तूस्थिती सांगितली. त्यावर समीर शेंडे यांनी, ‘‘तुम्ही कसायांची आणि आमची हानी का करता, येथून पुढे माझ्या हद्दीत काही करायचे नाही, नाहीतर मला तुमच्यावर खंडणीचे खोटे गुन्हे नोंद करावे लागतील’’, अशा प्रकारे गोरक्षकांना धमकावले. (स्वत:चे प्राण धोक्यात घालून गोरक्षण करणार्‍या गोरक्षकांनाच धमकावणार्‍या पोलिसांवर कारवाई केव्हा होणार ? – संपादक) गाडीच्या वाहनचालकास या अधिकार्‍याने शिवीगाळ करून, दमदाटी करून आमच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंद करण्यास भाग पाडले.

यासाठी राहुल कदम यांनी पुणे पोलिसांकडे तक्रार अर्ज केला आहे. ‘पोलीस तक्रार घेण्यास नकार देतात, गोरक्षकांवर दबाव टाकतात’, असे राहुल कदम यांनी पुणे पोलिसांकडे केलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. या तक्रारीची प्रत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प.पू. मोहन भागवत आदींना पाठवण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

पोलीस कसायांविरुद्ध तक्रार घेण्यास नकार देत असतील, तर महाराष्ट्रात कधीतरी गोरक्षण होईल का ?