Pope Francis Critical : ख्रिस्त्यांचे सर्वाेच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांची प्रकृती अद्यापही गंभीर


रोम (इटली) – ख्रिस्त्यांचे सर्वाेच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस (वय ८८ वर्षे) यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. त्यांच्यावर रोमच्या जेमेली रुग्णालयात उपचार चालू आहेत. प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्याच वेळी व्हॅटिकनकडून सांगण्यात आले की, पोप निरोगी आहेत. पोप फ्रान्सिस यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी जगभरात प्रार्थना चालू आहेत. पोप यांनी एक्सवर पोस्ट करत प्रार्थनांसाठी आभार मानले.

पोप फ्रान्सिस १४ फेब्रुवारीपासून रोममधील अगोस्टिनो जेमेली पॉलीक्लिनिक रुग्णालयात दाखल आहेत. रुग्णालयासमोर लोकं पोप फ्रान्सिस यांच्याकरिता प्रार्थना करतांना दिसत आहेत.

आदिवासींना चमत्कार दाखवणार्‍या भारतातील ख्रिस्ती नेत्यांनी पोप यांना बरे करून चमत्कार दाखवावा ! – आमदार राजा भैय्या यांचे आव्हान

भारतातील ख्रिस्त्यांच्या धार्मिक नेत्यांनी, जे आदिवासी आणि अशिक्षित यांना ‘हालेलुइया’ (परमेश्वराची स्तुती करा) असे म्हणत चमत्कार दाखवतात, त्यांनी एकत्र येऊन व्हॅटिकन सिटीमध्ये जीवन आणि मृत्यू यांच्याशी झुंजणार्‍या पोप यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना बरे करावे, अशी पोस्ट उत्तरप्रदेशातील कुंडा येथील आमदार रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैया यांनी ‘X’वर केली आहे.

आमदार राजा भैय्या यांनी पुढे लिहिले की, पोप बर्‍याच काळापासून व्हीलचेअरवर आहेत आणि आता त्यांना रुग्णालयात अत्यंत गंभीर अवस्थेत भरती करण्यात आले आहे. त्यांना ‘हालेलुइया’चा चमत्कार त्वरित हवा आहे.