
चिपळूण, २४ फेब्रुवारी (वार्ता.) – सद्य:स्थितीत देशभरात १५ सहस्र मंदिरांचे संघटन होत असून यापुढे मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात आंदोलनाचा शंखनाद करायचा आहे. रत्नागिरीतील अनेक देवरहाटीच्या भूमी शासनाने परस्पर कह्यात घेतल्या आहेत. या सर्व भूमी शासनाने परत देवस्थानाच्या नावे न केल्यास जनआंदोलन उभारू. मंदिरांच्या संघटनात्मक रचनेचा आणि कार्याचा एक आदर्शवत असा ‘रत्नागिरी पॅटर्न’ सिद्ध करूया, असे आवाहन मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी येथे आयोजित ‘रत्नागिरी जिल्हास्तरीय मंदिर-न्यास अधिवेशना’त केले.

पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवामंडळ, हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने २४ फेब्रुवारी या दिवशी ‘स्वामी मंगल हॉल’, पुष्कर कॉम्प्लेक्स, बहादूरशेख नाका, चिपळूण येथे हे अधिवेशन पार पडले. अधिवेशनाचा शुभारंभ सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम, पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवामंडळाचे कार्याध्यक्ष श्री. जयंतराव देसाई, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा संयोजक ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे, निवृत्त सहधर्मदाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख, अधिवक्ता श्री. जनार्दन करपे आणि श्री. सुनील घनवट यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. अधिवेशनाला रत्नागिरी जिल्ह्यातील मंदिरांचे विशस्त, पदाधिकारी आणि पुजारी असे एकूण ४०० हून अधिक जण उपस्थित होते.
प्रारंभी श्री. ज्ञानदेव पाटील यांनी शंखनाद केला. त्यानंतर वेदमूर्ती श्री. सुरेंद्र जोशी आणि श्री. सौरभ गोंधळेकर यांनी वेदमंत्रपठण केले. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी या अधिवेशनाच्या निमित्ताने दिलेल्या संदेशाचे वाचन श्री. परेश गुजराथी यांनी केले. उपस्थितांचे स्वागत आणि प्रस्तावना श्री. सुरेश शिंदे यांनी केली.
श्री. घनवट पुढे म्हणाले की, मंदिरांच्या अडचणी सोडवण्यासाठी भक्तांनी एकत्र येऊन एक जागृत ‘नेटवर्क’ (यंत्रणा) सिद्ध करूया. सद्य:स्थितीत कोणतेही सरकार मशीद अथवा चर्च कह्यात घेण्याचे धाडस करत नाही, मग हिंदूंच्या मंदिरांकडेच लक्ष का ? मंदिरे कह्यात घेणे सोडाच; पण मंदिरांकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे कुणाचे धाडस होणार नाही, असे संघटन उभे करूया. मंदिर संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी मंदिर महासंघ हे व्यासपीठ आहे. मंदिर सरकारीकरणामुळे तमिळनाडूमध्ये अनेक मंदिरे बंद पडली आहेत. पुरोगाम्यांचे मंदिरांविषयीचे ‘चुकीचे कथानक’ (फेक नॅरेटीव्ह) खोडून काढूया.

धर्मशिक्षणाने निर्माण होणारी सशक्त राष्ट्रभक्त पिढी राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात योगदान देईल ! – सद्गुरु सत्यवान कदम
या वेळी सद्गुरु सत्यवान कदम म्हणाले की, आपला धर्म, तसेच संस्कृती यांना जिवंत ठेवण्याचे कार्य मंदिरांच्या माध्यमातून वेळोवेळी झाले आहे. जन्महिंदूंना कर्महिंदु बनवण्याचे मंदिर अधिवेशन हे प्रभावी माध्यम आहे. मंदिर संस्कृतीचा देशाच्या विकासात मोठा वाटा आहे. मंदिरात येणार्यांना धर्माचा अभ्यास नसतो. त्यामुळे त्यांना मंदिरांविषयी आत्मीयता वाटत नाही. तीर्थक्षेत्रे पर्यटनक्षेत्रे झाली आहेत. त्यामुळे तेथील आध्यात्मिक शक्तीचा येणार्यांना लाभ होत नाही. मंदिरांमधून धर्मशिक्षण दिले गेले, तर श्रद्धा वाढून राष्ट्रभक्ती असणारी सशक्त पिढी निर्माण होईल आणि ती राष्ट्रउभारणीच्या कार्यात योगदान देईल. मंदिरांमधून धर्मशिक्षण देणारे ग्रंथ भेट दिले पाहिजेत. यातून भाविक धर्मशिक्षणाच्या कृती करतील.
पुजार्यांनी मंदिर आदर्श करण्यासाठी झटले पाहिजे ! – जयंत देसाई

आपल्या धर्माचे, मंदिरांचे रक्षण होईल, असा राजाश्रय मिळाला पाहिजे. मंदिरांसाठी आपण एकत्र आलो, तर मंदिरांकडे वाकड्या दृष्टीने पहाण्यास कुणी धजावणार नाही. आपण एक नसल्याने अनेकवेळा आक्रमणे झाली आहेत; मात्र आता मंदिरांचे रक्षण करण्यासाठी सनातन संस्था पुढे आली आहे. आपण मनापासून मंदिरांशी निगडीत असू, तेव्हा मंदिरांचे व्यवस्थापन चांगले होईल. पुजार्यांनी मंदिर आदर्श करण्यासाठी झटले पाहिजे. मंदिरासाठी आपला त्याग असावा. मंदिरात येणार्या भक्तांमध्ये आपुलकीची भावना निर्माण व्हायला हवी आणि मंदिरात सेवा देण्यासाठीही तत्पर रहावे. यामुळे मंदिरात एक वेगळेच वातावरण निर्माण होईल. मंदिरात उपासना होत नसेल, तर तिथे देव कसा राहील ? मंदिरात देवाचा वास असला, तर मानसिक आधार मिळतो.
मंदिरात सामूहिकरित्या उपक्रम राबवून संघटित होऊया ! – संजय जोशी

मंदिरे ही धर्माची आधारशीला आहेत. मंदिरे तोडून तेथील पावित्र्य नष्ट केले जात आहे. मंदिरेच देशाला विश्वगुरु बनवण्याचे मुख्य केंद्र आहे; मात्र मंदिरांचे पावित्र्य टिकवण्यासाठीच्या दृष्टीचा अभाव दिसत आहे. तेथील चैतन्य टिकवून ठेवण्यासाठी अनेक कुप्रथा बंद पाडल्या पाहिजेत. जत्रांमधील जुगाराचे अड्डे बंद करून मंदिर संस्कृतीचे रक्षण करूया. आरती, गदा पूजन, गुढीपूजन असे उपक्रम सामूहिकरित्या राबवून मंदिरे आणि धर्म रक्षणासाठी संघटित होऊया.