Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्यात ३ लाख कोटी रुपयांची उलाढाल ! – भारतीय व्यापारी उद्योग महासंघाचा दावा

प्रयागराज कुंभपर्व २०२५

उजवीकडे महासंघाचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथे १३ जानेवारीपासून प्रारंभ झालेल्या महाकुंभामुळे आतापर्यंत ३ लाख कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती भारतीय व्यापारी उद्योग महासंघाने दिली. हा आजवरचा विक्रम असल्याचा दावाही महासंघाने केला आहे.

महासंघाचे सरचिटणीस असणारे भाजपचे खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, महाकुंभामुळे धार्मिक पर्यटनाबरोबर रोजगारवृद्धीही झाली आहे. या निमित्ताने श्रद्धा आणि आर्थिक विकास यांचा उत्तम संगम झाला. प्रारंभी ४० कोटी भाविक आणि २ लाख कोटी रुपयांची उलाढाल होईल, असा अंदाज होता; मात्र आता भाविकांचा आकडा ६० कोटींवर गेला असून आर्थिक व्यवहारही ३ लाख कोटी रुपयांवर जात आहे. केवळ प्रयागराजच नव्हे, तर वाराणसी आणि अयोध्या येथेही भाविक भेट देत आहेत. त्यामुळे त्या शहरांतील हॉटेलसह संबंधित सेवा क्षेत्राला मोठा लाभ झाला आहे. उत्तरप्रदेशात इतरत्रही महाकुंभाचा लाभ झाला.

साडेसात सहस्र कोटी रुपयांची गुंतवणूक

महाकुंभ निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी उत्तरप्रदेश सरकारने सुमारे साडेसात सहस्र कोटी रुपयांची गुंतवणूक केली. रस्ते, उड्डाणपूल तसेच भुयारी मार्गांची उभारणी करण्यात आली. दीड सहस्र कोटी रुपयांची रक्कम पायाभूत सुविधा भक्कम करण्यावर खर्च करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

  • ‘हिंदूंच्या तीर्थक्षेत्रांवर सरकार खर्च का करते ?’, असे म्हणणार्‍यांना ही चपराकच आहे !
  • हिंदूंच्या धार्मिक तीर्थक्षेत्रांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला प्रचंड लाभ होत आहे, हे तथाकथित निधर्मीवादी यांनी पहायला हवे. हिंदूंचे देव विध्वंसकर्ते नाहीत, तर पालनकर्ते आहेत, हेच यातून लक्षात घ्यायला हवे !