सनातन धर्माच्या रक्षणासाठी कायदेशीर लढा देणार्‍या देहलीतील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्या अमिता सचदेवा यांचा ‘ग्लोबल सनातन एड’कडून सन्मान !

डावीकडून श्री. विवेक कौल, पुरस्कार स्वीकारतांना अधिवक्त्या अमिता सचदेवा, पुरस्कार प्रदान करतांना उत्तराखंडाचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल (निवृत्त) गुरमीत सिंह आणि शेजारी मेजर जनरल (निवृत्त) डॉ. जी.डी. बक्षी

नवी देहली – ‘ग्लोबल सनातन एड’ आणि ‘सनातन एड इंडिया’ यांनी १६ फेब्रुवारी २०२५ या दिवशी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सनातन धर्माच्या रक्षणासाठी काम करणारे विचारवंत आणि कार्यकर्ते यांचा सन्मान केला. या कार्यक्रमाला उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल (निवृत्त) गुरमीत सिंह आणि मेजर जनरल (निवृत्त) डॉ. जी.डी. बक्षी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सनातन धर्माच्या कायदेशीर लढाईत योगदान दिल्याविषयी देहलीच्या अधिवक्त्या अमिता सचदेवा यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात श्री. अनिल धीर, गरुडा प्रकाशनचे श्री. अंकुर पाठक, मोतीलाल बनारसीदास प्रकाशनचे श्री. जैन, लेखिका मानुषी सिन्हा, ‘संगम टॉक्स’चे श्री. राहुल दिवाण, श्री. सूर्या रॉय आणि लेखक वेदवीर आर्या यांचाही सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात हिंदूंना साहाय्य करण्यासाठी सनातन कल्याण मंडळाचा प्रस्ताव मांडण्यात आला. या वेळी बोलतांना ‘ग्लोबल सनातन एड’चे अध्यक्ष श्री. विवेक कौल यांनी मेजर जनरल (निवृत्त) डॉ. जी.डी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच सनातन कल्याण मंडळाची स्थापना होणार असल्याची घोषणा केली.