वैशाख शुक्ल पक्ष सप्तमी, ११ मे २०२३ या दिवशी सप्तर्षींच्या आज्ञेने सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव साजरा झाला. विविध जिल्ह्यांतून आलेल्या १० सहस्र साधकांनी या सोहळ्याचा लाभ घेतला. ब्रह्मोत्सव हा तिरुपति बालाजीचा सर्वोच्च सोहळा आहे. या वेळी सुवर्ण रथातून तिरुपति बालाजी भक्तांना दर्शन देतात. त्याचप्रमाणे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी दिव्य रथावर आरूढ होऊन साधकांना दर्शन दिले. त्याविषयी साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. सौ. मेघमाला संतोष जोशी
१ अ. ब्रह्मोत्सव सोहळ्याला जाण्याविषयी मिळालेली पूर्वसूचना : ‘ब्रह्मोत्सव सोहळ्याला येण्याचा निरोप मिळाल्यावर मला २ दिवसांपूर्वी पडलेल्या स्वप्नाचे स्मरण झाले. स्वप्नात मला ‘आम्ही सहकुटुंब रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दर्शनाला गेलो आहोत आणि ते आम्हाला प्रसाद देत आहेत’, असे दिसले. ‘आम्हाला ब्रह्मोत्सवाला जायचे आहे’, असे समजल्यावर ‘गुरुदेव साधकांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात’, हे लक्षात आले आणि त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
१ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ब्रह्मोत्सवाच्या माध्यमातून श्री बालाजीचा रथोत्सव पहाण्याची इच्छा पूर्ण करणे : आमचे कुलदैवत तिरुपति बालाजी आहे. लहानपणापासून माझे वडील तिरुपतीच्या श्री बालाजीच्या रथोत्सवाविषयी सांगायचे, ‘‘बालाजीचा रथोत्सव बघणे आणि त्यात सहभागी होणे पुष्कळ भाग्याचे असते. रथयात्रा आरंभ झाल्यावर देवाने भक्तांवर कृपाकटाक्ष टाकताच भक्तांची सर्व पापे, दुःख आणि दैन्य नष्ट होतात. सर्व अरिष्ट टळते.’’ तेव्हापासून माझ्या मनात हा रथोत्सव पहाण्याची पुष्कळ इच्छा होती; पण ते शक्य झाले नाही. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव पाहून आज मला श्री तिरुपति बालाजीचा उत्सव अनुभवता आला.
१ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा तिरुपति येथील श्री बालाजीच्या प्रांगणात आणि ब्रह्मांडात चालू आहे’, असे अनुभवता येणे : ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा तिरुपति येथे प्रत्यक्ष श्री बालाजीच्या प्रांगणात चालू आहे’, असे मला अनुभवता आले. काही वेळा मला ‘तो ब्रह्मांडात चालू आहे’, असेही वाटले. तो मला प्रत्यक्ष समोर दिसत होता. तेव्हा सर्वत्र आल्हाददायक वातावरण अनुभवता आले.’
२. श्री. गोपाळ महादेव कदम
२ अ. प्रवेशद्वारात आल्यानंतर साधक स्थानदेवतेच्या रूपात स्वागत करत असल्याचे दिसणे आणि ‘जय गुरुदेव ।’, असा जयघोष होऊ लागणे : ‘ब्रह्मोत्सवाच्या ठिकाणी कोल्हापूर केंद्राचेे प्रवेशद्वार आल्यानंतर ‘प्रत्यक्ष स्थानदेवता आणि तेथील कनिष्ठ देवता साधकांच्या रूपात आपले स्वागत करत आहेत’, असे मला दिसले. प्रवेशद्वारावर ग्रामदेवता साधकांच्या रूपात स्वागत करत आहे’, असे मला दिसले. त्या वेळी ‘जय गुरुदेव । जय गुरुदेव ।’, असा भावपूर्ण जयघोष होऊ लागला.
२ आ. वातावरणात उष्णता असूनही गारवा जाणवणे : कार्यक्रमस्थळी प्रवेश केल्यानंतर मला शांत वाटत होते. आसंदीमध्ये बसल्यावर सतत प्रार्थना आणि नामजप होत होता. त्या वेळी वातावरण उष्ण असूनही गारवा जाणवत होता. माझी एकाग्रता वाढली होती.
२ इ. देवतांनी अनिष्ट शक्तींपासून सर्वांचे रक्षण करणे : ‘सर्व साधक म्हणजे देवताच आहेत’, असे मला जाणवले. ‘साधकांच्या चारही बाजूंनी देवतांचे संरक्षककवच निर्माण झाले आहेे. देवता अनिष्ट शक्तींपासून सर्व साधकांचे रक्षण करत आहेत. देवता अनिष्ट शक्तींशी युद्ध करून त्यांना हाकलून लावत आहेत’, असे मला सूक्ष्मातून दिसले. ‘अंतत: देवता आणि अनिष्ट शक्ती यांंचे युद्ध संपले. सर्व देवतांनी अनिष्ट शक्तींना साखळदंडाने बांधून सच्चिद़ानंद परब्रह्म गुरुदेवांसमोर आणले आहे. त्या गुरुदेवांना शरण आल्या आहेत’, असे दृष्य मला सूक्ष्मातून दिसले.’
३. श्री. मिलिंद मारुति पाटील
३ अ. भगवंताने सर्व साधकांची उत्तम काळजी घेणेे : ‘ब्रह्मोत्सव संपल्यानंतर सर्व साधक सुखरूप घरी पोचले. एवढ्या मोठ्या प्रमाणात साधक आले असतांना त्यांचे रहाणे, खाणे सर्व बारीक-सारीक गोष्टींची इतकी उत्तम काळजी केवळ भगवंतच घेऊ शकतो’, असे मला वाटले.
३ आ. ब्रह्मोत्सवाहून आल्यानंतर कृतज्ञताभाव वाढणे : ब्रह्मोत्सवाहून आल्यापासून मला प्रत्येक गोष्टीविषयी कृतज्ञता वाटत आहे. माझे भावजागृतीचे प्रयत्नही पुष्कळ वाढले आहेत. मला प्रत्येक साधकाविषयी कृतज्ञता आणि प्रीती वाटू लागली आहे.
३ इ. भगवंताने सर्वांनाच त्यांच्या गुण-दोषांसकट स्वीकारले असल्याने सर्वांची उन्नती होणार असणे : ब्रह्मोत्सवापूर्वी माझ्या मनात साधक किंवा घरातील व्यक्ती यांच्याविषयी प्रतिक्रिया येत होत्या. मला इतरांचे स्वभावदोष लगेच दिसायचे. ब्रह्मोत्सव सोहळ्यासाठी सहस्रो साधक आले होते. त्यात कुणी पूर्णवेळ साधना करणारे, तर कुणी साधनेत खंड पडलेले साधक आले होते. भगवंताने सर्वांनाच त्यांच्या गुण-दोषांसकट स्वीकारले आहे. त्यामुळे ‘भगवंत सर्वांचीच उन्नती करून घेणार आहे’, असे माझ्या लक्षात आले.
३ ई. ब्रह्मोत्सवाच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना पाहिल्यापासून मला प्रत्येक साधकाविषयी आपुलकी आणि प्रेमच वाटत आहे. कुणाविषयी पूर्वग्रह राहिला नाही.
३ उ. साक्षात् भगवंताने दर्शन दिल्यानंतर ‘त्याच्याकडे अजून काही मागावे’, असे वाटले नाही.
३ ऊ. ३ गुरूंची संथपणे चाललेली रथयात्रा सतत आठवून भावजागृती होेणे आणि साक्षात् भगवंताला पहाता आल्याने धन्यता वाटणे : ब्रह्मोत्सव सोहळा होऊन २ दिवस झाले, तरीही अजून मला ‘श्रीमन्नारायणनारायण’, हे गीत म्हणणार्या साधिकांचा आवाज आणि संथपणे चाललेली ३ गुरूंची रथयात्रा सतत आठवते. तेव्हा मनाला शांती जाणवते आणि भावजागृती होेतेे. ‘साक्षात् भगवंताला पहाता आले. हा सोहळा अनुभवता आला’, यापेक्षा मोठे भाग्य ते कुठले ? ’
४. कु. संजना कुराडे
४ अ. ब्रह्मोत्सवाच्या आधीच परीक्षा झाल्याने ब्रह्मोत्सवाला जाता येणे : ‘११.५.२०२३ या दिवशी ‘ब्रह्मोत्सव सोहळ्याला जायचे आहे आणि या सोहळ्यामध्ये सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांचे दर्शन होणार आहे’, असे कळले. या कालावधीत माझी परीक्षा होती. पण माझी परिक्षा १०.५.२०२३ या दिवशीच झाल्याने मी ब्रह्मोत्सवाला जाऊ शकले. तेव्हा ‘देवाला आर्तभावाने हाक मारल्यावर देव साहाय्य करतो’, हे मला अनुभवायला मिळाले.
५. सौ. सुजाता वेर्णेकर
५ अ. गुरुदेवांचे दर्शन घेतांना मन भरून येऊन भावजागृती होणे : ‘भगवान श्रीकृष्ण गोपगोपींना भेटायला यायचे. त्याचप्रमाणे आम्हाला गुरुदेवांच्या रुपात प्रत्यक्ष श्रीकृष्णाचे दर्शन झाले. साक्षात् श्रीकृष्णाचे दर्शन घेतांना मन भरून येत होते आणि भावजागृती होत होती. तेव्हापासून ‘देव सतत समोर आहे’, असे वाटते.
५ आ. ब्रह्मोत्सव पहातांना माझे मन शांत आणि निर्विचार झाले.’
(सर्व सूत्रांसाठी दिनांक (३०.५.२०२४)
|