Jayalalithaa’s Assets Seized : जयललिता यांची २७ किलो सोने, ११ सहस्र साड्या आदी संपत्ती तमिळनाडू सरकारला परत !

भ्रष्टाचाराच्या प्रकरणी जप्त केली होती संपत्ती !

तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता

चेन्नई (तमिळनाडू) – कर्नाटक सरकारने तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या जप्त केलेल्या मालमत्ता तामिळनाडू सरकारकडे सोपवल्या आहेत. त्यांच्यावरील बेहिशेबी मालमत्तेच्या खटल्याच्या वेळी त्यांच्याकडे २७.५५८ किलो सोन्याचे दागिने, तर १ सहस्र ११६ किलो चांदी, १ सहस्र ५२६ एकर भूमीशी संबंधित कागदपत्रे आणि २ लाख २० सहस्र रुपये रोख अनधिकृत असल्याचे समोर आले होते. ती सर्व संपत्ती जप्त करण्यात आली होती. बेंगळुरूच्या विशेष न्यायालयाच्या आदेशानंतर ही सर्व मालमत्ता तामिळनाडूला देण्यात आली आहे.

तामिळनाडू सरकारला परत केलेल्या मालमत्तेत सोने आणि हिरे यांचा मुकुट, सोन्याची तलवार, ११ सहस्र ३४४ रेशमी साड्या, ७५० जोड्या चप्पल, १२ हून अधिक घड्याळे, २५० शाली, १२ शितकपाटे (‘रेफ्रिजरेटर’), १० दूरचित्रवाणीसंच, ८ व्ही.सी.आर्. (व्हिडिओ कॅसेट रेकॉर्डर), एक व्हिडिओ कॅमेरा, ४ सीडी प्लेअर, २ ऑडिओ डेक, २४ टेप रेकॉर्डर, १ सहस्र ४० व्हिडिओ कॅसेट्स आणि ५ लोखंडी लॉकर यांचा समावेश आहे. ही सर्व मालमत्ता कर्नाटक विधानसौधाच्या (विधानसभेच्या) कोषागारात ठेवण्यात आली होती.

जयललिता यांचा पुतण्या आणि पुतणी यांनी या मालमत्तेवर दावा करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली होती, जी न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाच्या आदेशानंतर १५ फेब्रुवारीला मालमत्ता हस्तांतरणाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली.

संपादकीय भूमिका

तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी केलेला भ्रष्टाचार आणि साठवलेली मालमत्ता पहाता केंद्र सरकारने भ्रष्टाचारी राजकारणी जिवंत असतांनाच त्यांच्यावर कारवाई करून भ्रष्ट पैशांतून कमावलेली त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्याची मोहीम आता हाती घेतली पाहिजे !