समस्त हिंदु समाज बांधवांची प्रशासनाकडे मागणी

एरंडोल – येथे १३ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दुपारी अंजनी नदीच्या काठी असलेल्या जुन्या पशूवधगृहात गोवंश, तसेच म्हैस या जनावरांचे कत्तल केलेले अंदाजे १५ किलो मांस, अवशेष आणि शिंगे सापडली. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘यामागील आरोपींचे अन्वेषण करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच हे पशूवधगृह तात्काळ उद्ध्वस्त करावे’, अशी मागणी समस्त हिंदु समाज बांधवांनी एरंडोल येथील पोलीस प्रशासन, उपविभागीय अधिकारी, नगर परिषद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कृती का करत नाही ? – संपादक) निवेदनात म्हटले आहे की, या ठिकाणी बर्याच वर्षांपासून बेकायदेशीर पशूवधगृह चालू असून रहिवाशांनी वेळोवेळी तोंडी आणि लेखी तक्रारीही केल्या आहेत; पण त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. अंजनी नदीच्या काठी हे पशूवधगृह असल्याने गोवंशियांच्या रक्ताचे दूषित पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. हे आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. त्यामुळे यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे.