
१. सौ. दमयंती राजेंद्र रोडे, बार्शी
१ अ. ब्रह्मोत्सवाची सजावट साधी असणे; परंतु तेथे पुष्कळ चैतन्य जाणवणे : ‘गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवाला आपण उपमा देऊ शकत नाही; पण तेथे गुरुदेवांनी काटकसर हा गुण दाखवून दिला, उदा. बैठकव्यवस्था, व्यासपीठ, गुरुदेवांचा रथ, मंडप हे साधेपणाने सजवले होते. त्यामुळे कणाकणांत चैतन्य भरून पावले होते. अन्य राजकारणी किंवा संप्रदाय यांचा कार्यक्रम असता, तर तिथे व्यासपीठ फुलांनी सजवून रांगोळ्या आणि पायघड्या घातल्या असत्या. संत आणि सद्गुरु यांची बैठकव्यवस्थाही साधीच होती: पण सूक्ष्मातून सगळेच भव्य-दिव्य वाटत होते.
१ आ. ‘साक्षात् श्रीकृष्ण आपल्यासमोर आहे आणि सर्व जण जयजयकार करत आहेत’, असे जाणवणे : ‘सर्व जण मोठ्या यज्ञासाठी बसले आहेत’, असे मला जाणवत होते. त्या वेळी ‘महाभारतात जिथे यज्ञ झाले, त्या महासभा अशाच असतील’ असे वाटून तसे मला सूक्ष्मातून दिसत होते. ‘साक्षात् श्रीकृष्ण आपल्यासमोर आहे आणि सर्व जण जयजयकार करत आहेत’, असे मला जाणवत होते आणि तसे मला सूक्ष्मातून स्पष्ट दिसत होते.’
२. श्री. तानाजी गोरे, बार्शी
अ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले बसले होते तो रथ पुढे येऊन एका जागेवर थांबल्यावर ‘रथाच्या डाव्या बाजूने आकाशातून रथाकडे दैवी प्रकाश येत होता’, असे मला दिसले.
आ. ‘रथातून क्षात्रतेज आणि धर्मतेज यांच्या लहरी प्रक्षेपित होत आहेत’, असे मला जाणवत होते. ‘रथ एका जागेवर उभा असतांना आकाशातून पक्षांचा थवा रथाच्या समोरून आला आणि उजव्या बाजूने पुढे गेला’, असे मला वाटले. ‘पक्षी प्रदक्षिणा घालण्यासाठी आले होते. ते लयबद्ध पद्धतीने विहार करत होते. त्यांच्याकडून आनंद प्रक्षेपित होत होता. ‘ते उच्च कोटीचा भाव असणारे जीव आहेत’, असे मला वाटत होते.
इ. कार्यक्रम संपल्यानंतर ‘रथाचे दर्शन घ्या’, असे आम्हाला सांगितले गेले. तेव्हा ‘रथामध्ये साक्षात् विष्णुदेव आणि दोन्ही देवी बसल्या आहेत’, असे मला जाणवत होते. तिथे चैतन्य आणि आनंद जाणवत होता.’
३. कु. देवकी जठार, (आध्यात्मिक पातळी ५३ टक्के, वय ५ वर्षे), सोलापूर.
अ. ‘कार्यक्रम स्थळी गेल्यावर मला गुरुदेवांच्या भेटीची ओढ वाढली होती. आई मला म्हणाली, ‘‘आतापर्यंत गुरुदेवांना छायाचित्रातून किंवा सूक्ष्मातून पाहिले. आज तुला थोड्याच वेळात प्रत्यक्ष गुरुदेव दिसणार आहेत.’’ तेव्हा मी आकाशाकडे बोट दाखवून म्हणाले, ‘‘गुरुदेव मला दिसत आहेत. प.पू. बाबा (गुरुदेव) मला पिवळ्या गोलात दिसत आहेत.’’
(सर्व सूत्रांचा दिनांक २४.५.२०२४)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |