परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनमोल सत्संगात साधनेच्या संदर्भात लक्षात आलेली सूत्रे आणि स्वतःत झालेले पालट !

‘एकदा मला नारायणाच्या कृपेने परात्पर गुरुदेवांच्या सत्संगात सहभागी होण्याची अमूल्य संधी लाभली. ‘मी अनंत जन्म जरी घेतले, तरी त्याबद्दलची गुरुमाऊलींप्रती कृतज्ञता पूर्ण होऊच शकत नाही.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ‘प.पू. गुरुदेवांच्या शक्तीमुळे साधकांकडून साधनेचे प्रयत्न होत आहेत’, असे जाणवणे

कु. अपाला औंधकर

एकदा प.पू. गुरुदेव म्हणाले, ‘‘माझी शक्ती हळूहळू न्यून होत असल्याचे कारण असे आहे की, ती सर्व साधकांना मिळत आहे.’’ परात्पर गुरुदेवांचे हे वाक्य ऐकून माझी भावजागृती झाली. ‘आपल्याकडून होणारे साधनेचे प्रयत्न हे खरेच आपले नसून प.पू. गुरुदेवांच्याच शक्तीमुळे ते आपल्याकडून होत आहेत’, याची मला जाणीव झाली.

२. ‘गुरूंची इच्छा आणि आज्ञा एकच असते’, हे सांगणारा सत्संगातील एक प्रसंग !

प.पू. गुरुदेवांच्या सत्संगात कु. सुवर्णा श्रीराम आणि श्री. धैवत वाघमारेदादा आले होते. काही मासांपासून धैवतदादाला कविता सुचत होत्या. त्याने त्याविषयी प.पू. गुरुदेवांना सांगितले. सुवर्णाच्या हाताला अपघात होऊनही ती स्थिर, आनंदी आणि भावस्थितीत होती. हे पाहून गुरुदेवांनी दादाला तिच्यावर कविता करायला सांगितली. त्यानंतर ३० – ४० मिनिटांमध्ये दादाने सुवर्णाताईवर कविता केली आणि सत्संगात म्हणून दाखवली. तेव्हा प.पू. गुरुदेव म्हणाले, ‘‘एवढ्या लवकर कविता तयारही झाली !’’ आणि दादाचे कौतुक केले. त्या वेळी ‘गुरूंची इच्छा आणि आज्ञा एकच असते’, हे माझ्या लक्षात आले. गुरुदेवांच्या कृपेमुळेच धैवतदादाला कविता करता आली. यावरून ‘प.पू. गुरुदेव सामर्थ्यवान आहेत’, हे मला शिकायला मिळाले.

३. स्वतःत जाणवलेले पालट

३ अ. ‘सत्संगात स्वतःविषयी काही न सांगता समष्टीकडून अधिकाधिक शिकायला हवे’, असे वाटणे : यापूर्वीच्या सत्संगात ‘मला काय अनुभूती आल्या ? मला काय शिकायला मिळाले ? आणि मी कुठे न्यून पडले ?’, हे मी प.पू. गुरुदेवांना सांगितले. ‘आता माझ्याविषयी काही सांगायला नको. देवाला सर्व ठाऊक आहे आणि मी समष्टीकडून अधिकाधिक शिकायला हवे’, असे मला वाटले.

३ आ. दैवी बालकांना भेटायला जातांना ‘संतांनाच भेटायला जात आहोत’, असे वाटून त्यांच्याकडून शिकण्याच्या स्थितीत रहाणे : कधी कधी अन्य जिल्ह्यांतून काही दैवी बालके सुटीच्या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करण्यासाठी येतात. प.पू. गुरुदेवांनी मला सांगितले होते, ‘‘तू त्या दैवी बालकांना भेट आणि त्यांच्याशी साधनेविषयी बोल.’’ त्या वेळी ‘मी दैवी बालकांना भेटायला जात नसून संतांनाच भेटायला जात आहे आणि त्यांच्याकडून मला पुष्कळ शिकायला मिळणार आहे’, असे मला वाटते.

‘हे गुरुदेवा, आपण साधकांना आनंदाच्या मोठ्या मेघाखाली ठेवले आहे आणि तो मेघ अत्यंत आनंदाने आनंदाचा वर्षाव करत आहेत. सर्व साधक त्या आनंदात चिंब भिजत आहेत. हा आनंद दिल्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. अपाला औंधकर (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), फोंडा, गोवा.