ठरलेल्या अंदाजानुसार काम होत नसल्याने हिंदु स्वराज्य सेना अध्यक्षांची तक्रार !

वरसई (पेण) येथील रस्त्याच्या कामातील हलगर्जीपणाचे प्रकरण

(प्रतिकात्मक चित्र)

पेण : पेण तालुक्यातील वरसई ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी भागात डांबरीकरणाद्वारे रस्ता सिद्ध करण्यासाठी ‘टेंडर प्रोसेस’ (निविदा) काढण्यात आली होती. त्या अनुषंगाने डि. के. कन्स्ट्रक्शन यांनी या कामाचे ठेकेदार म्हणून राजदांड आदिवासी भागात रस्ता डांबरीकरण करण्याचे काम चालू केले. रस्त्यावर जाड खडी टाकल्यावर डांबर टाकून खडीची बारीक ग्रिट टाकणे आवश्यक आहे; मात्र डांबर न टाकता ठेकेदाराने खडीची बारीक ग्रिट टाकून काम अर्धवट ठेवले. वरसई येथील ‘हिंदु स्वराज्य सेने’चे अध्यक्ष श्री. किरण शिगवण यांनी या प्रकरणी जिल्हा परिषद बांधकाम अभियंता आणि उप अभियंता यांच्याकडे तक्रार प्रविष्ट करून ठरलेल्या अंदाजाप्रमाणे काम करण्याची मागणी केली आहे. (अशी तक्रार का करावी लागते ? बांधकाम अभियंत्यांचे ठेकेदारांच्या कामाकडे लक्ष नाही का ? – संपादक)

शिगवण यांनी म्हटले, ‘‘असे करणे म्हणजे सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचे प्रयत्न चालू असल्याचे लक्षात येते. जिल्हा परिषद बांधकाम सक्षम अधिकारी यांचे राजदांड रस्त्याविषयीच्या कामाकडे लक्ष केंद्रित नाही. सरकारकडून कामात हलगर्जीपणा का चालू आहे ? रस्त्याचे काम योग्य प्रकारे करून आदिवासी नागरिकांना रस्त्यांवरून चालताना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी.’’